माझ्या पोस्टस वाचकांच्या मनात नैराश्य निर्माण करतात काय?
मी माझे संपूर्ण जीवन प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत जगत आलोय. जीवनातील माझे काटेरी अनुभव सत्य आहेत. पण त्यातही काही गुलाबी अनुभव माझ्या वाट्यास आले व ते गुलाबी अनुभवही मी अधूनमधून शेअर करीत असतो. पण सुख जवाएवढे, दुःख पर्वताएवढे अशीच माझ्या जीवनाची कथा आहे व माझी हीच कथा मी तुकड्या तुकड्यांनी आत्मचरित्र म्हणून शेअर करतो. जे खरे आहे ते खरे आहे, त्यात काय लपवायचे? जीवनातील कटू वाईट अनुभव लपवून फक्त चांगल्या गोष्टींचे प्रदर्शन करणारे आत्मचरित्र हे आत्मचरित्र होऊ शकत नाही. माझ्या अशा सरळस्पष्ट लिखाणामुळे कदाचित माझ्या पोस्टस वाचकांना नकारात्मक नैराश्यमय वाटतही असतील. पण काही लोक माझ्यासारखे जीवन जगले किंवा जगत आहेत त्यांना माझ्या याच पोस्टस सकारात्मक उर्जा देणाऱ्या वाटत असतील. कारण प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत मी ताठ मानेने कसा जीवन जगलो व जगत आहे हे त्यांना कळत असेल व त्यातून त्यांना लढण्याची उर्जा मिळत असेल. नक्की तसे होत असेल का हे मी सांगू शकत नाही. कारण एकच पोस्ट काही जणांना नकारात्मक नैराश्यमय वाटेल तर काही जणांना सकारात्मक उर्जात्मक! हा प्रत्येकाच्या स्वानुभवाचा व नजरेचा फरक असतो. माझ्या पोस्टसमध्ये ना नैराश्य असते ना उन्माद! मला अनुभवास आलेले सत्य मी अगदी जसेच्या तसे लिहितो. माझी फक्त भाषा शैली वेगळी आहे एवढेच! कोणास काय वाटेल याचा विचार करून मी कधी लिहीत नाही. कारण मी तसा विचार करून लिहायला लागलो तर माझ्या लिखाणातील माझी मूळ नैसर्गिकताच नष्ट होईल. बाकी माझ्या लिखाणातून कोणी काय बोध, काय संदेश घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
-ॲड.बी.एस.मोरे©६.७.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा