https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ७ जुलै, २०२०

आभासाकडून सत्याकडे!

आभासाकडून सत्याकडे!

आजच "आभासी दर्शन" ही फेसबुक पोस्ट लिहिलीय. समाज माध्यम हे एक आभासी जग आहे वगैरे वगैरे खूप काही लिहिले जातेय. मी सुध्दा या आभासी जगातून खूप शिकलो व मग सावरलोही! पण याच समाज माध्यमावर मी सत्य लिहून लिहून या आभासी जगाला सत्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याला काही अंशी यशही आले. आभासी जगात उमटणारे माझे सत्य हा माझा प्रत्यक्ष जीवन अनुभव आहे. त्यात जिवंतपणा आहे. नाहीतरी मी आभासी जगात मिसळूच शकत नाही. माझ्याकडून म्हणून तर काल्पनिक कथा, कादंबऱ्यांचे जास्त वाचन झाले नाही व आता तर त्यापासून दूरच आहे.

मी परवा अशी पोस्ट लिहिली होती की "माझ्या पोस्टस या नैराश्यजनक असतात काय?" त्या माझ्या पोस्टला व्हॉटसअप वर माझ्या एका फेसबुक मित्राने पाठविलेले हे उत्तर वाचा आणि मग तुम्हीच ठरवा की समाज माध्यम हे १००% आभासी जग आहे का ते!

"साहेब, आपल्या पोस्ट्स आमच्या मनात कधीच नैराश्य निर्माण करत नाहीत तर उलट तुमच्या लिखाणात जगण्याची उमेद तयार होते. मी माझा स्वभाव आपणांस सांगितलाच आहे. पण आपणंच मला लढण्याची व जगण्याची उमेद दिलीत. त्या उमेदीच्या जोरावर आज माझं कुटुंब छोटा व्यवसाय करत आहे. एक आठवडा झाला आम्ही कांदा पोहे, इडली, मेंदूवडा, शिरा असा छोटासा व्यवसाय सुरु केला आहे. आज कमाईचे कोणतेही साधन नसल्याने तो व्यवसाय सुरु केला आहे. फक्त महापालिकेचा थोडा त्रास होतो ह्या व्यवसायात  माझी पत्नी व मुलांचा ही सहभाग आहे. पत्नीची इच्छा शक्ती व आपण मला दिलेली हिंमत यामुळे हे शक्य होत आहे. आज तुम्ही वकील असताना देखील स्वाभिमानाने जगत आहात. कोणताही आपला बडेजाव नसतो. साहेब, आपले मार्गदर्शन असेच होत रहावे. मी आपला खूप आभारी आहे. जर लॉक डाऊन संपला व माझा हा व्यवसाय चालू राहिला तर साहेब आपण अवश्य तिथे भेट द्या मी स्वतःला फार नशीबवान समजेन....."

आता वरील उत्तर वाचून मला सांगा की, मी अल्प प्रमाणात का होईना पण याच आभासी समाज माध्यमाला सत्यात उतरवलेय की नाही?

-ॲड.बी.एस.मोरे©८.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा