https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, ४ जुलै, २०२०

पक्षपातीपणा!

पक्षपातीपणा (नेपोटिजम)!

(१) कितीजणांना पक्षपातीपणाचा अनुभव आलाय आणि किती जण या पातीचा अनुभव घेत आहेत? आता काही लोक मला म्हणतील की या वकिलाला झालेय काय? ६४ वय, केस पांढरे, डोक्याला टक्कल या सर्व गोष्टी जवळ आल्यावर सुध्दा याला सुबुद्धी कशी येत नाही? सद्या लोक कोरोनाच्या दहशतीखाली कसेबसे जीव मुठीत घेऊन जगत आहेत आणि याला हा बिनकामाचा विषय सुचतोच कसा? आता या काही लोकांना मी एवढेच म्हणेल की, बाबांनो आजूबाजूला नीट डोळे फिरवून बघा म्हणजे तुमच्या डोळ्यांना कोरोनाच्या पक्षपातीपणाचा हलकटपणा थोडा तरी दिसेल. हा नीच कोरोना काही जणांना जाम त्रास देतो, इतका की त्याला यमसदनालाच पाठवतो. पण काही जणांवर याची जाम मेहेरबानी असते. म्हणजे असे की काही जणांच्या शरीरात तो घुसतो पण थोड्या गुदगुल्या करतो आणि हळूच निघून जातो. म्हणजे सर्दी, ताप, खोकला असली काही लक्षणेच दाखवत नाही. हा या नीच कोरोनाचा पक्षपातीपणा नव्हे काय? म्हणून तर सद्याच्या कोरोना काळातच हा विषय घेतलाय मी तुमच्या विचारविनिमयासाठी!

(२) आपल्या देशातून राजेशाही गेली आणि लोकशाही आली. राजे लोकांचा रूबाब व त्यांना सरकारकडून मिळणारे तनखे आपल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी बंद केले. पण खरंच राजेशाही गेली का हो? याच इंदिरा गांधीच्या काळात जमीनदारी विरोधी कायदा आला. पण खरंच जमीनदारी संपली का हो? लोकशाहीत मतदार हा राजा असतो म्हणे. पण खरंच मतदार हा राजा असतो का? तसे असते तर संसद, विधानसभेत सर्वसामान्य मतदारच खासदार, आमदार बनून बसले असते ना! पण असे काहीच प्रत्यक्ष व्यवहारात होत नाही हे कोणालाही दिसेल आणि यामागचे प्रमुख कारण काय तर काही लब्धप्रतिष्ठित लोकांचा पक्षपातीपणा!

(३) वेगवेगळ्या उस्तादांच्या गायन शैलीनुसार व त्यांच्या राहत्या शहरांवरून संगीत क्षेत्रात पारंपरिक घराणेशाही निर्माण झाली. संगीत  क्षेत्रात ग्वालीअर, किराणा, जयपूर, आग्रा, दिल्ली आणि पतियाळा अशी सहा प्राचीन घराणी आहेत. यातील किराणा घराणे सोडले तर इतर पाच घराणी ही शहरांची नावे आहेत हे कळते. पण हा किराणा प्रकार काय आहे हे नीट कळले नाही म्हणून गुगलचे सर्च इंजिन फिरवले तर किराणा हे सुध्दा एका उस्तादांचे जन्मस्थान आहे असे कळले. मला काय फक्त किराणा दुकानातून किराणा माल आणतात एवढेच माहित होते. असो, तो संगीताचा विषय फार मोठा आहे. आपला आजचा विषय हा पक्षपातीपणाचा आहे व या पातीचा संबंध घराणेशाहीशी कसा आहे व ही घराणेशाही किती अन्यायकारक आहे हा आहे.

(४) आपल्याच घराण्याचे नाव पिढ्यानपिढ्या पुढे राहिले पाहिजे व मग त्यासाठी दुसऱ्यांची घराणी आपल्या घराण्याच्या खाली म्हणजे हाथ के नीचे राहिली पाहिजे या स्वार्थी भावनेचा संकुचित विचार पक्षपातीपणाला खतपाणी घालतो. हाच पक्षपातीपणा माणसांतील स्पर्धा गलिच्छ पातळीवर आणून टाकतो. स्पर्धा ही नेहमी निकोप म्हणजे न्याय (फेअर) व आरोग्य दायी (हेल्दी) असावी. काहीजणांनाच न्याय व काहीजणांनाच्याच आरोग्याची काळजी घेणारी स्पर्धा ही पक्षपातीपणावर आधारित असते. स्पर्धेचे नीट नियोजन व नियंत्रण करण्यासाठी पूर्वी मक्तेदारी विरोधी कायदा होता. त्याचेच नामकरण पुढे स्पर्धा कायदा असे झाले. पण नावात बदल करून ना मक्तेदारी संपली ना स्पर्धा निकोप झाली. 

(५) तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, वकिली घ्या, वैद्यकीय घ्या, अभियांत्रिकी घ्या, कला घ्या, राजकारण घ्या किंवा आणखी काही कोणते घ्या, तुम्हाला सगळीकडे घराणेशाही व त्यातून निर्माण होणारा पक्षपातीपणा दिसेल. इंग्रजीत या पक्षपातीपणाला नेपोटिजम म्हणतात. मी वकील असल्याने वकिली क्षेत्रात कशाप्रकारचा पक्षपातीपणा चालतो हे प्रत्यक्ष अनुभवामुळे सांगू शकतो. सुरूवातीच्या काळात नवोदित वकिलाला सिनियर वकिलाच्या हाताखाली (हाथ के नीचे) खूप मेहनतीची उमेदवारी करावी लागते. पण या सिनियर वकिलाचाच मुलगा जर नवोदित वकील असला आणि दुसरा कोणी नवोदित वकील त्या सिनियर वकिलाच्या हाथ के नीचे काम करीत असला तर मग सिनियरचा वकील मुलगा व बाहेरचा वकील मुलगा या दोघांमध्ये त्या सिनियर वकिलाकडून दुजाभाव केला जातो. सख्खी मुले व सावत्र मुले यांच्यात जसा दुजाभाव केला जातो तसाच हा काहीसा प्रकार असतो. 

(६) वकिली क्षेत्रात न्यायाधीशांची व नामांकित वकिलांची मुले यांचा रूबाब काही वेगळाच असतो. आमच्यासारखी गरीब घराण्यातून (आमच्या सारख्यांचे पण घराणे असते ना) मोठ्या कष्टाने वकील झालेली मुले जेंव्हा कोर्टात वकिली करण्याचे धाडस करतात तेंव्हा त्यांना खालच्या मानेनेच वकिली करावी लागते. याला काही अपवाद असतीलही. पण मी इथे सर्वसाधारण अनुभव सांगतोय. मी झाबवाला या सोप्या भाषेत कायदा समजावून सांगणाऱ्या लेखकाची कायद्याची जुनी पुस्तके जुन्या लॉ बुक स्टॉलमधून विकत घेऊन व ती वाचून एलएल.बी. झालोय. गंमत अशी झाली की मी मुंबई हायकोर्टात सुद्धा माझी वकिली सुरू करण्याचा प्रयत्न झाबवला लेखकाची जुनी पुस्तके हातात घेऊनच केला. पण मी जेंव्हा अंगावर वकिलाचा नवीन गाऊन चढवून पण हातात मात्र कायद्याची ती जुनी झाबवाला पुस्तके घेऊन हायकोर्टात फिरू लागलो तेंव्हा  मोठमोठया कायदा लेखकांची जाडजूड पुस्तके व फाईली हातात घेऊन या कोर्ट रूममधून त्या कोर्ट रूममध्ये फिरणारी मोठ्या वकिलांची मुले (काही तर इतर न्यायालयांत न्यायाधीश म्हणून काम पहाणाऱ्या न्यायाधीशांची मुले होती) जी हायकोर्टात रूबाबात कारनेच आलेली होती ती माझ्या हातातील झाबवाला लेखकाची ती जुनी पुस्तके बघून एकमेकांकडे डोळे मिचकावीत गालातल्या गालात हसू लागली. मला ती तशी का हसत आहेत हे त्यावेळी कळलेच नाही. पण एक गरीब घराण्यातील मुलगा कष्टाने वकील होऊन धाडसाने हायकोर्टात वकील म्हणून आलाय याचे कौतुक वाटण्याऐवजी त्या मोठ्या  लोकांच्या मोठ्या मुलांना माझे हसू येणे हाही पक्षपातीपणाचाच एक भाग होता. आणि हे सर्व नैसर्गिकच आहे असाही निर्लज्जपणे काहीजण युक्तिवाद करतात. मग तशा बऱ्याच गोष्टी नैसर्गिक आहेत ना! क्रूरपणा, स्वैराचार इत्यादी गोष्टीही नैसर्गिकच आहेत. मग मानवी विवेक व सुसंस्कृतपणा ही नैसर्गिक गोष्ट नव्हे काय? 

(७) पक्षपातीपणा हा काही फक्त एकाच प्रकारच्या व्यवसाय, उद्योग, धंद्यात नसतो. तो  वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय, उद्योग, धंद्यात सुध्दा असतो. अर्थकारणात विविध व्यवसाय, उद्योग, धंदे असतात. पण एखाद्या विशिष्ट व्यवसाय, उद्योग, धंद्यालाच अती महत्व दिले जाते. उदाहरणार्थ, अनेक वर्षे अभ्यास करून व्यवसाय करणाऱ्या वकील, डॉक्टर, इंजिनियर यांच्यापेक्षा चित्रपट कलाकार, क्रिकेट खेळाडू मोठे होतात, इतके मोठे की सेलिब्रिटीच! हा काय प्रकार आहे? माझ्या मते हा लोकांनी केलेल्या पक्षपातीपणाचाच प्रकार आहे. असो, अशा पक्षपातीपणाविरूध्द मी एकटा काय लढा देणार? असेच चालणार असेल तर मग चालू द्या तसेच! पण ढोंगीपणाचा पडदा हटवून सत्य उघडे केल्याने काहीजणांचा जर तिळपापड होणार असेल तर त्यालाही माझा नाइलाज आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©५.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा