https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ५ जुलै, २०२०

लोणच्याची बरणी!

लोणच्याची बरणी!

(१) माणूस जसा आयुष्य जगतो तशीच त्याला बहुधा झोपेतील स्वप्नेही पडत असावी. माझा साधारण अनुभव तसाच आहे. जुन्या हिंदी चित्रपटातील एक अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री मला गावच्या चुलीवर चहा बनवून प्यायला देत  असल्याचे एक गोड स्वप्न मागे पडले होते. हे स्वप्न बायकोला सांगितले तर तिने माझी चेष्टा केली होती. कुठे ती अभिनेत्री आणि कुठे तुम्ही आणि ती तुम्हाला गॕसवर नाही पण चुलीवर चहा करून पाजणार? असली स्वप्ने बघणे सोडा हो असे बायकोने मला सुनावले. पण मी अशी स्वप्ने काय मुद्दाम ठरवून बघतो? ती मला सहज पडतात आणि मी ती बघतो यात माझा काय दोष?

(२) परवा असेच एक झोपेत स्वप्न पडले. मी मोठ्या महागड्या वस्तूंच्या प्रदर्शनात गेलोय. त्यामुळे तिथे श्रीमंतांची गर्दी होती. मला त्या प्रदर्शनात कसा प्रवेश मिळाला हे ते स्वप्नच जाणो. अमिताभ बच्चन हे त्या वस्तू प्रदर्शनाचे खास आकर्षण होते. तिथे मधोमध स्टेज उभे केले होते व तिथे महानायक अमिताभ बच्चन हातवारे करून काहीतरी करीत होते. म्हणून मी तिथे उत्सुकतेने गेलो व थोडा वेळ थांबलो. तिथे सगळा श्रीमंतांचाच घोळका होता. अमिताभ बच्चन साहेबांनी नुसत्या भुवया उंचावल्या की लोक आरडाओरडा करायचे. बच्चन साहेबांनी डोळा मिचकावला की हा आरडाओरडा वाढून जोरात टाळ्या पडायच्या. यात काय कला आहे हा त्यावेळी मला प्रश्न पडला. हे सगळे लोक वेडे झालेत की काय! डोळा मिचकावला तर एवढे काय म्हणून ओरडायचे? मी तिथे उभ्या असलेल्या एकाला हळूच विचारले की, अहो हे चाललंय काय? तर तो म्हणाला की या अगोदर अमिताभ बच्चन यांनी भुवया उंचावल्या ना त्याचे त्यांनी पन्नास लाख कमावले व आताच त्यांनी जे डोळे मिचकावले ना त्याचे त्यांनी एक कोटी कमावले. बापरे, एवढी किंमत असल्या गोष्टींची? हो पण नंतर विचार केला की त्या भुवया उंचावणे, डोळे मिचकावणे या गोष्टी सामान्य माणसाने नाही तर सर्वांचे आवडते कलाकार अमिताभ बच्चन यांनी केल्या. मग त्या गोष्टींची तेवढी किंमत असणारच ना! मी मग लांबूनच अमिताभ बच्चन यांना अदबीने नमस्कार केला व त्या प्रदर्शनातील इतर वस्तू बघायला पुढे सरकलो.

(३) त्या प्रदर्शनात विविध वस्तूंचे वेगवेगळे हॉल होते. मी एकेक हॉल फिरू लागलो. वस्तूंच्या किंमती विचारू लागलो. त्या किंमती ऐकून माझी बोबडीच वळली. कारण माझ्या खिशात फक्त पाचशे रूपये होते व वस्तूंच्या किंमती दोन हजार रूपयांपासून पुढे सुरू होत होत्या. एक पण वस्तू माझ्या लायकीची नाही (की मी त्या वस्तूंच्या लायकीचा नाही) असे मनात येऊन फिरत असताना अचानक एका हॉलमध्ये मला एक छोटी पण सुंदर लोणच्याची बरणी दिसली. मनात म्हटले की ही लोणच्याची बरणी नक्कीच माझ्या बजेट मध्ये असणार. आता हीच बरणी विकत घेऊन बायकोला आश्चर्यचकित करणार. शेवटी ती लोणच्याची बरणी हातात घेऊन मी काऊंटरवर तिची किंमत विचारायला गेलो. कारण त्या बरणीला तिच्या किंमतीचे लेबल चिकटवलेले नव्हते. त्या काऊंटरवरील बाईने त्या बरणीची किंमत मला अडीच हजार रूपये सांगितली. मी तर उडालोच ती किंमत ऐकून. तरीपण धाडस करून त्या बाईला म्हणालोच "मॕडम, इतनी छोटी बरणी की किमत इतनी जादा कैसी, बाहर बाजार मे तो इस बरणी की किमत बहोतही कम होगी"! तर ती बाई मला म्हणाली की "भाईसाब, इस बरणी का किमती मटेरियल और डिझाईन तो देखो, उसकी यह किमत है"!

(४) शेवटी त्या बाईला मी गयावया करून म्हणालो की "मॕडम, मेरे खिसे मे सिर्फ पाचसो रूपये है, उसमे यह बरणी आप मुझे देंगे तो आपकी बहोत मेहरबानी होगी"! त्यावर ती बाई म्हणाली "ऐसा नही होता भाईसाब"! मी नाराज होऊन त्या हॉलच्या बाहेर पडलो. तेंव्हा त्याच हॉलमधून माझ्याबरोबर एक सूटाबुटातील माणूसही बाहेर पडला. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला "मै आपका सब सुन रहा था, आपके पास सिर्फ पाचसो रूपये है यह मुझे मालूम पडे है, मै इधरही बाजूमे रहता हूं, मेरे घर मे उस बरणीसे भी अच्छी बरणी है जो मैने एक महिना पहले खरेदी की है, एकदम नयी है, उसकी किंमत उस हॉलवाली बरणीसे भी जादा है, लेकिन मै तो और नयी ले सकता हूं, आप तो स्वाभिमानी है, आप मेरे से वह बरणी फोकट मे लेनेवाले नही यह मुझे मालूम है, आप जो भी किंमत अदा करेंगे उसमे वह बरणी मै आपको बेचूंगा"! मी त्या गोष्टीला तयार झालो आणि आम्ही त्या भल्या माणसाच्या घरी निघालो आणि तेवढयात माझे स्वप्न भंग पावले.

(५) वरील दोन स्वप्ने काय दर्शवितात तर ते माझे मन दर्शवितात. मला पडणारी स्वप्ने हा माझ्या मनाचा आरसा आहे. त्यात मी स्वतःला पहात असतो. अभिनेत्रीच्या स्वप्नात मला तीही दिसते आणि तिच्याबरोबर मला गावची चूलही दिसते. अभिनेत्री हे मला हव्या असलेल्या श्रीमंतीचे प्रतीक, तर चूल हे माझ्या गरिबीचे अर्थात माझ्या मर्यादेचे प्रतीक! दुसऱ्या स्वप्नात सुध्दा तीच गोष्ट पण वेगळ्या स्वरूपात दिसते. महागड्या वस्तूंच्या प्रदर्शनात माझे फिरणे हे मला हव्या असणाऱ्या श्रीमंतीचे प्रतीक, तर माझ्या खिशातील पाचशे रूपये हे माझ्या गरिबीचे, अर्थात माझ्या मर्यादेचे प्रतीक!

-ॲड.बी.एस.मोरे©६.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा