https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

माझी वैज्ञानिक आस्तिकता!

माझी वैज्ञानिक आस्तिकता!

कोरोना महामारीने माझ्या आस्तिकतेला वेगळे प्रमाण मिळाले. कोरोनाने मला नास्तिक जरी बनविले नसले तरी माझी आस्तिकता आणखी वैज्ञानिक केली हे मात्र खरे आहे. निसर्ग व देव आणि विज्ञान व धर्म यातील फरक कोरोनामुळे नष्ट झाला. यावर्षीची आषाढी एकादशीची यात्रा शुकशुकाटात संपन्न झाली व मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची महापूजा मास्क लावून केली गेली. त्यातून निव्वळ मानसिक अध्यात्म उपयोगाचे नाही हे मनाला पटले. आता तर गणेशोत्सव दहीहंडी उत्सव या गोष्टी सुध्दा कोरोनामुळे प्रभावित झाल्या आहेत. मंदिर, मशीद, चर्च व इतर प्रार्थनास्थळे तर या कोरोनाने अगोदरच बंद करून टाकली आहेत. यातून काय निष्कर्ष निघतो? यातून हाच निष्कर्ष निघतो की नुसत्या मानसिक शांतीने काही होत नसते. कारण मन हा शरीराचाच भाग असतो व तो शारीरिक भाग म्हणजे आपला मेंदू. आधी पोटोबा, मग विठोबा अशी म्हणही आहे मराठीत. या म्हणीचा अर्थ एवढाच की उपाशी पोटी तुम्ही आध्यात्मिक शांती मिळवू शकत नाही. एकादशीचा उपवास हा एक दिवसाचा असतो. इतर धर्माचे काही उपवास महिनाभर चालतात. पण शरीराला पूर्ण उपाशी ठेवणारे ते उपवास नसतात. दररोज एक वेळचे जेवण त्यात असतेच. महिनाभर पूर्ण उपाशी राहून कोणीही देवाची आध्यात्मिक भक्ती करू शकत नाही. हे जर खरे आहे तर मग नुसते अध्यात्म उपयोगाचे नाही हेच यातून सिध्द होते. माझ्या मते अध्यात्म हे मूलभूत निसर्गधर्माला पूरक असे टॉनिक आहे. पण ते टॉनिक निसर्गधर्माचा पूर्ण आधार होऊ शकत नाही. आधी शरीर व मग मन हाच निसर्गाचा प्राधान्यक्रम दिसत आहे. आता ही गोष्ट नीट कळल्याने व मनालाही नीट पटल्याने माझी आस्तिकता ही आता गॉड पार्टिकल (देवांश) या वैज्ञानिक संकल्पनेकडे वळली आहे. जर निसर्गाच्या किंवा विश्वाच्या निर्मितीमागे व तसेच  नियंत्रणामागे हे गॉड पार्टिकल असेल तर या गॉड पार्टिकलचे अध्यात्म मी माझ्या मनात घेण्याऐवजी या गॉड पार्टिकलचे रसायन मी अगोदर माझ्या शरीरात घेईन. कारण हे रसायन माझ्या शरीरात आले की त्याबरोबर आपोआप त्या रसायनातले अध्यात्मही माझ्या मनात येईल. पण या सर्व जर तर च्या गोष्टी आहेत. गॉड पार्टिकल ही एक संकल्पना आहे. तिचे विश्वातील किंवा निसर्गातील अस्तित्व अजून सिद्ध व्हायचे आहे. पण तोपर्यंत जे सत्य दिसतेय त्यावर भाष्य नको का करायला? मला काही गोष्टी स्पष्टपणे दिसत आहेत. जगण्याला आवश्यक असणारी रसायने धूर्तपणे स्वतःच्या ताब्यात ठेऊन पोकळ शांतीच्या प्रवचनांचा पाऊस लोकांच्या मनावर पाडणाऱ्या काही ढोंगी लोकांचा मला राग येतो. सत्य दडवून ही मंडळी लोकांना फसवत आहेत हे बघवत नाही. पण मी काही करू शकत नाही. मी माझ्या स्वतःपुरते जे वैयक्तिक धोरण अंगिकारले आहे ते लोकांना सांगणे हे मी माझे कर्तव्य समजतो. मी नास्तिक नाही, पण माझी आस्तिकता ही वैज्ञानिक आहे, ती गॉड पार्टिकलच्या संकल्पने भोवती फिरत आहे व तिला गॉड पार्टिकल मधील रसायनात जास्त रस आहे एवढेच मी नमूद करू इच्छितो!

-ॲड.बी.एस.मोरे©४.७.२०२०

टीपः हिग्ज या शास्त्रज्ञाने बोसॉन पार्टिकल्स हेच गॉड पार्टिकल्स असे सांगितले तर याला विरोध करताना सर्न या शास्त्रज्ञाने असे बोसॉन पार्टिकल्स ब्रम्हांडात अस्तित्वातच नाहीत असे सांगितले. मी मात्र ब्रम्हांडात अत्यंत सूक्ष्म वस्तुमान (Mass), प्रचंड मोठी भौतिक, रासायनिक व मानसिक शक्ती (energy) व तसेच गुणधर्म (property) असलेला एखादा सूक्ष्म अणु (atom) असणार व तो अणु हाच गॉड पार्टिकल (देवांश) असणार या संकल्पनेवर नुसती धार्मिक श्रध्दा नाही तर वैज्ञानिक विश्वास ठेवून आहे व माझ्या या वैज्ञानिक संकल्पनेनुसारच मी वैज्ञानिक आस्तिक आहे. -ॲड.बी.एस.मोरे©४.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा