https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

सुसंस्कृतपणा व कायदा!

सुसंस्कृतपणा व कायदा!

(१) भौतिक वासनेच्या खालच्या पातळीवरून आध्यात्मिक भावनेच्या वरच्या पातळीवर उंचावताना मानवी मनाची ना खाली ना वर अशी अवस्था होते. मनाच्या अशा गोंधळलेल्या, संभ्रमित अवस्थेत मध्यवर्ती भूमिका घेऊन विवेक बिंदू निश्चित करताना मानवी बुद्धीची ओढाताण होते या बौद्धिक कसरतीचा अनुभव अनेक माणसे वेळोवेळी घेत असतात. 

(२) भौतिक वासनेचा पूर्णपणे त्याग करून आध्यात्मिक भावनेच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचणे म्हणजे साधुसंत होणे. असे साधुत्व मिळविणे म्हणजे सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होणे होय. भौतिक वासनांविषयी जेंव्हा माणसाच्या मनात विरक्ती निर्माण होते तेंव्हाच माणूस सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होण्याचा निर्णय घेतो. असे संन्यासी होणे हे नैसर्गिक आहे का या मुद्यावर वाद निर्माण होऊ शकतो. पण भौतिक वासनांबद्दल विरक्ती निर्माण होऊन येणारे साधुत्व व भौतिक वासना आणि आध्यात्मिक भावना यांच्यात संतुलन साधत निर्माण होणारा मनाचा सुसंस्कृतपणा यात खूप फरक आहे. प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या उच्च मानवी भावना आध्यात्मिक भावना होत असे माझे वैयक्तिक मत आहे.

(३) भौतिक वासना व आध्यात्मिक भावना या दोन्हीही गोष्टी जर मानवासाठी नैसर्गिक आहेत तर मग दोन्हीही नैसर्गिक गोष्टींना एकत्रित ठेऊन त्यांचा नीट म्हणजे संतुलित सांभाळ करणे ही मानवी कृतीही नैसर्गिकच झाली. मग याचा अर्थ एवढाच निघतो की सुसंस्कृत वर्तन हेच मानवासाठी नैसर्गिक वर्तन आहे. तरीही शेवटी भौतिक वासनेचा पूर्ण त्याग करून फक्त आध्यात्मिक भावनेला चिकटून राहात संन्यासी होणे हे नैसर्गिकदृष्ट्या कितपत योग्य आहे हा वादाचा मुद्दा राहतोच. 

(४) विवाहबद्ध होऊन वासना व भावना यात संतुलन साधत प्रजोत्पादन करणे व सांसारिक जबाबदाऱ्याही पार पाडणे याला मानवी मनाचा सुसंस्कृतपणा म्हणता येईल. पण काही विशेष वैयक्तिक कारणामुळे काहीजण विवाहच करीत नाहीत किंवा विवाह करूनही नंतर घटस्फोटाने एकटे राहण्याचा निर्णय घेतात. हा काही अंशी संन्यासी होण्याचाच प्रकार झाला असे माझे वैयक्तिक मत आहे. हे मत एकटे राहणाऱ्या लोकांना कदाचित आवडणारही नाही. कारण मानवी मनाची माणुसकी काय किंवा मानवी मनाचा सुसंस्कृतपणा काय हे ठरवताना मानवी बुद्धीचा कस लागतो. वेगवेगळ्या माणसांची बुद्धी याबाबतीत वेगवेगळी चालते आणि मग त्यातून खूप वादविवाद होतात. 

(५) अशा वादविवादातून समाजात गोंधळ, अराजक निर्माण होऊ नये म्हणून समाजाच्या सामूहिक बुद्धीने ठरवलेला सुसंस्कृतपणा हा समाजाचा कायदा झाला व तो कायदा हाच मनुष्यासाठीचा नैसर्गिक कायदा म्हणून मान्य करण्यात आला. मानवी सुसंस्कृतपणा निश्चित करणाऱ्या अशा कायद्याला समाजमान्यता मिळविण्याची प्रक्रिया हीच लोकप्रतिनिधींकडून कायदे मंडळात कायदा बनविण्याची प्रक्रिया होय. 

(६) या कायद्याचे दोन भाग पाडण्यात आले. पहिला भाग म्हणजे समाजाच्या विवेकबुद्धीने निश्चित केलेले मनुष्याचे सुसंस्कृत वर्तन जे वासना व भावना यांच्यात सुवर्णमध्य साधते. कायद्याच्या या पहिल्या भागाला दिवाणी कायदा म्हणतात. दुसरा भाग म्हणजे मानवी सुसंस्कृतपणाची मध्यवर्ती पातळी सोडून वासनेच्या खालच्या पातळीवर उतरणाऱ्या मानवी मनाला रोखणारा फौजदारी कायदा. हा फौजदारी कायदा मानवी मनाला असंस्कृत बनू देत नाही (भ्रष्टाचार करणे हे असंस्कृतपणाचे लक्षण होय) व असंस्कृतपणाहूनही खालची पातळी म्हणजे जंगली पातळी गाठू देत नाही (अत्याचार, खून, बलात्कार, दरोडा यासारख्या हिंसक गोष्टी करणारे वर्तन हे जंगलीपणाचे लक्षण होय). संन्यासी होण्यास मात्र कोणताच कायदा अडवू शकत नाही. कारण संन्यासी माणूस समाजालाच काय तर निसर्गालाही कोणताही त्रास देत नसतो. थोडक्यात काय तर सामाजिक कायदा हा मानवी सुसंस्कृतपणा निश्चित करतो!

-ॲड.बी.एस.मोरे©१.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा