https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २ जुलै, २०२०

आजपासून फेसबुक खाते खाजगी!

आजपासून माझे खाते पुन्हा खाजगी!

फेसबुकवरील एका हितचिंतकाने मला सावध केले होते की माझे फेसबुक खाते खाजगी आहे ते तसेच राहूद्या, ते सार्वजनिक करू नका, नाहीतर पुन्हा पूर्वीच्या जुन्या खात्यांप्रमाणेच उपद्रव होईल. पण मी त्यांचे ऐकले नाही व पुन्हा समाजवीर होण्याचा मोह होऊन मी माझे हे तिसरे खाते सुध्दा सार्वजनिक केले. त्याचा उपद्रव शेवटी सुरू झालाच. मी नुसते खाते सार्वजनिकच नाही केले तर पुन्हा योग्य ती चाळणी न करता कोणाच्याही फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारत गेलो. मित्रसंख्या वाढवून घेणे हा दुसरा मोह त्याला कारणीभूत ठरला. त्याचा भयंकर दुष्परिणाम आज मला दिसून आला. मी आज कोरोना नियंत्रण करण्यासाठी जाहीर झालेली संचारबंदी व जमावबंदी यांच्यातील फरक सांगणारा एक छोटा कायदेशीर लेख फेसबुकवर लिहिला व आता संचारबंदी जाहीर झाल्याने लोकांनी कोरोनाबरोबर पोलीस कारवाईचीही काळजी घ्यावी असे त्या लेखात लिहिले. तर एका मराठी मित्रानेच फिदीफिदी हसण्याचे चिन्ह माझ्या त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून टाकले व "तुम्हाला हे पसंत नसेल तर १४४ कलमाविरूध्द कोर्टात जा" असे मलाच उलट सुनावले. त्या व्यक्तीला मी ताबडतोब अनफ्रेंड व ब्लॉक करून टाकले आहे. माझ्या समाजमाध्यमावरील लिखाणाला आता काही अर्थच उरला नाही. माझ्या सखोल अभ्यासपूर्ण लिखाणाचे गांभीर्य नसलेली काही तथाकथित फेसबुक मित्र मंडळी जर माझीच चेष्टा मस्करी करायला धजावत असतील तर मग मी माझ्या या सामाजिक लिखाणाचा अट्टाहास पुन्हा पुन्हा का करावा? मला तर वरवर गुळमुळीत लिहिणे जमत नाही. मी माझ्या खास भाषा शैलीत सत्य लिहिण्याचा प्रयत्न करावा व पुन्हा माझेच हसू करून घ्यावे, हे सर्व कशासाठी? हे काही लोक गंभीर विषयावर हसूच कसे शकतात? यांना माझ्या कायद्याच्या ज्ञानाची गंमत वाटते काय? बरं, माझ्या ज्ञानाची ज्या कोणाला गंमत वाटत असेल त्यांनी मला ताबडतोब अनफ्रेंड करावे असे अगोदरच्या फेसबुक पोस्टने मी जाहीर करून टाकले आहे. एखाद्याच्या पोस्टसवर पोकळ कमेंटस व कुचेष्टापूर्ण हास्यचिन्हे टाकण्यासाठीच गंमत म्हणून फ्रेंड रिक्वेस्टस पाठविणाऱ्या लोकांना त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना मी कसे ओळखणार? काय निकष लावावेत मी अनोळखी माणसांच्या फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना? सद्या मी दोनच निकष लावलेत आणि ते म्हणजे वकील व मराठी माणूस यांना प्राधान्य! पण माझ्या आजच्या  गंभीर पोस्टवर फिदीफिदी हास्यचिन्ह टाकून वरील विचित्र कमेंट करणारी व्यक्ती ही सुध्दा मराठीच होती ना! माझ्या या नवीन खात्यावर नव्याने मित्र झालेल्या लोकांच्या असल्या चित्रविचित्र प्रतिक्रियांची वाट बघत बसू का म्हणजे अशी कुचेष्टेची प्रतिक्रिया आली रे आली की मग लगेच अशा व्यक्तीला अनफ्रेंड व ब्लॉक करता येईल. यासाठी समाजमाध्यमावर अभ्यासपूर्ण लिखाण करायचे का? आता माझे हे तिसरे खाते पण अशा काही लोकांमुळे बंद करायची वेळ आली तर मात्र खूप कठीण झालेय असले फुकटचे समाजकार्य असेच म्हणावे लागेल. असो, पुढे या समाजमाध्यमाचा वापर कसा करायचा, माझे हे फेसबुक खाते इतर बहुसंख्य लोकांप्रमाणे फक्त आणि फक्त करमणूक व विरंगुळा (हवा पाण्याच्या गप्पा मारणारा टाईमपास) यासाठीच ठेवायचे का याचा मी जरूर गांभीर्याने विचार करीन. तूर्तास तरी हे खाते सार्वजनिक वरून खाजगी करून टाकत आहे म्हणजे माझ्या पोस्टस कोणाला कुठेही शेअर करता येणार नाहीत. या निर्णयाने माझ्या काही चांगल्या मित्रांवर अन्याय होईल, पण त्याला माझा नाईलाज आहे. माझ्या ज्या हितचिंतक मित्राने फेसबुक खाते सार्वजनिक करू नका असा मैत्रीपूर्ण सल्ला दिला त्या हितचिंतक मित्राचे खूप खूप आभार व मनस्वी धन्यवाद!

-ॲड.बी.एस.मोरे©३.७.२०२०

टीपः ६४ वर्षाच्या वकिलाला कायदा शिकवताय तुम्ही? ग्रेट! रामराम! ( माझ्या पोस्टवर विचित्र कमेंट करणाऱ्या त्या व्यक्तीला मी ब्लॉक करून माझ्या पोस्टवर तिने केलेल्या  कमेंटसमधील त्या व्यक्तीचे नावही मी डिलीट करून टाकले आहे. मला उगाच पुढील वाद नकोत. पण तरीही त्या व्यक्तीच्या काही कमेंटस तिच्या नावासह डिलीट झाल्या नाहीत. बहुतेक तिला ब्लॉक केल्याने तसे होत असावे). -ॲड.बी.एस.मोरे©३.७.२०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा