https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

कुछ तो लोग कहेंगे!

कुछ तो लोग कहेंगे!

(१) मी कोणतीही एक विचारधारा घेऊन जगत नाही. जगातील सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असताना माझ्या बुद्धीला जे कळते, जे पटते ते मी माझ्या बुद्धीनुसार बोलत व लिहित असतो. त्यात दररोज सुधारणा होत असते. त्यामुळे कालची मांडणी आज बदलते व उद्याही बदलू शकते. पण सत्य हे सत्यच असते. त्याची फक्त मांडणी बदलत असते. ज्ञानाची प्रगल्भता व अनुभवाची परिपक्वता यानुसार मांडणीतला हा फरक होत असतो.

(२) मला प्राथमिक शाळेपासून लिखाणाची सवय आहे. कित्येक गोष्टी मी लहानपणापासून लिहून ठेवल्या. पण जसजसे ज्ञान प्रगल्भ होत गेले व अनुभव परिपक्व होत गेला तसतशा त्या लिहून ठेवलेल्या गोष्टी हवेत दूर उडून गेल्या. माझ्या जुन्या डायऱ्या आता या जगात कुठे आहेत हे त्या डायऱ्यांनाच ठाऊक! मी तरी त्या किती सांभाळणार! लहानपणीच काय पण पुढे तरूणपणीही एवढ्याशा छोट्या घरात राहणारा मी माझ्याच लिखाणाचा ढीग कुठे कुठे म्हणून साठवून ठेवणार! लग्न झाल्यावर अनेक घरे बदलली व मग टेम्पोतून घरसामान हलवताना कितीतरी जुन्या डायऱ्या, वह्या गहाळ झाल्या. वकिली सुरू केल्यावर मात्र मोठ्या वह्या घेऊन त्यात लिखाण करू लागलो. त्यातल्या काही हस्तलिखित वह्या आज एका कपाटात आहेत. पण त्यातली पाने आज चाळताना माझ्या लिखाणात कितीतरी बदल झालाय हे मलाच जाणवते.

(३) पाच वर्षापूर्वी मला दर्शना नावाच्या एका लेडी लिगल असिस्टंटने फेसबुकवर लिहा सर असे सुचवले. मग तिनेच माझे फेसबुक खाते उघडून दिले. तोपर्यंत मला समाजमाध्यम वगैरे गोष्टी माहित नव्हत्या. तेंव्हापासून मी फेसबुक वर लिहितोय. पेनाने हस्तलिखिते लिहूनही खूप कंटाळा आला होता. मोबाईलमध्ये कलर नोट हे ॲप डाऊनलोड केले व मग त्या नोट पॕडवर बोटाने लिहायला शिकलो. तिथे लेख लिहून झाला की मग तो बोटानेच सिलेक्ट करून कॉपी करायचा व फेसबुकवर पेस्ट करायचा. अशाप्रकारे माझे फेसबुक लिखाण सुरू झाले.जवळजवळ १००० लेख लिहिले व अनेक विचार वाक्ये लिहिली.

(४) पण फेसबुक मित्र झालेल्या काही पोरकट, टवाळखोर लोकांनी माझ्या लिखाणाची चेष्टा केली व त्यामुळे वैतागून जाऊन मी माझी पूर्वीची दोन फेसबुक खाती बंद केली. पण माझ्या त्या कृतीमुळे माझे लिखाण सिरियसली वाचणाऱ्या माझ्या बऱ्याच चांगल्या फेसबुक मित्रांवर अन्यायही झाला. काहींनी मला तसे स्पष्टपणे बोलूनही दाखवले व त्यांची नाराजी व्यक्त केली. तेंव्हा मग मी लॉकडाऊनच्या काळातच दोन महिन्यापूर्वी हे तिसरे फेसबुक खाते उघडले आहे. आता हे तिसरे खाते कसेही करून टिकवावे असे ठरवले असताना पुन्हा त्याच जुन्या वाईट अनुभवाची पुनरावृत्ती होऊ लागली. म्हणून मग काल त्यावर एक लेख लिहून मी माझे हे तिसरे खाते सार्वजनिक वरून खाजगी केले व त्यावर सरळ एक टॕग लाईन लिहून टाकली. "माझे फेसबुक खाते सुज्ञ लोकांसाठी आहे, टवाळखोरांना इथे प्रवेश नाही" हीच ती टॕगलाईन!

(५) आता मला असे का वागावे लागले याबद्दल माझ्या आयुष्यातील फक्त तीनच उदाहरणे इथे नमूद करतो. पहिले उदाहरण मला स्वतःला आलेल्या फेसबुकवरील अनुभवाचे. मी काही लिहिले की एकजण माझ्या पोस्टसवर सारख्या विचित्र कमेंटस करायचा. मला उलटसुलट प्रश्न विचारायचा. मी त्याच्या प्रत्येक कमेंटवर त्याला स्पष्टीकरण द्यायचो व अधूनमधून झापायचो. त्यावर त्याच्याकडे उत्तर नसायचे. मग त्याने खोडसाळपणे माझ्या फेसबुक इनबॉक्स मध्ये घाणेरडे व्हिडिओ, अश्लिल चित्रे पाठवायला सुरूवात केली. मी त्याला झापला व हे प्रकार बंद कर असे खडसावले. पण त्याने त्याचा तो खोडसाळपणा चालूच ठेवला. मग मात्र मला त्याला ब्लॉक करावेच लागले. या मूर्खांना हे कळत कसे नाही की मला जर या ६४ वयात असे व्हिडिओज, अशी चित्रे पहायची असतील तर त्या गुगलवर खजिना पडलाय ना अशा गोष्टींचा! पण ही नीच वृत्तीची माणसे! यांना एखादी व्यक्ती काही चांगली गोष्ट करतेय हे बघवत नाही.

(६) आता दुसरे उदाहरण माझ्या बायकोला आलेल्या अनुभवाचे. गणपती, दसरा, दिवाळी अशा सणांना माझी बायको आमच्या दारात सुंदर रांगोळी काढायची. अजूनही काढते. आम्ही जेंव्हा बैठ्या चाळीत रहायचो तेंव्हा माझ्या बायकोने रांगोळी काढून घराचा दरवाजा लावून घेतला व नंतर काही तासांनी दरवाजा उघडून बघितला तर ती रांगोळी कोणीतरी मुद्दामहून पायाने पुसलेली असायची व त्यावर खोडसाळपणे दगडेही टाकलेली असायची. पण हे असे कोण व का करतेय हेच आम्हाला कळत नसायचे.

(७) आता तिसरे उदाहरण माझ्या वडिलांचे. माझे वडील राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे डॕशिंग पुढारी होते. त्यांचे वक्तृत्व खूप छान होते. ते ज्या मिलमध्ये नोकरी करायचे तिथे त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. पण त्यांच्या काही विरोधकांना ही गोष्ट बघवत नसायची. मग असे काही नीच वृत्तीचे लोक त्या मिलच्या संडासात माझ्या वडिलांच्या चारित्र्यावर खोटे आरोप करीत खडूने घाणेरड्या कमेंटस लिहायचे व अश्लिल चित्रेही काढायचे. मग ती बातमी संपूर्ण मिलमध्ये पसरायची. माझ्या वडिलांचे अनुयायी त्यावर चवताळून जायचे व वडिलांना म्हणायचे तुम्ही फक्त सांगा मग बघा आम्ही त्या लोकांना कसे फोडून काढतो ते! त्यावेळचे ते खळ्ळ खट्याकच होते! पण माझे वडील त्या लोकांना शांत करीत सांगायचे की, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा मग फक्त एक काम करा. त्या हलकट लोकांनी त्या ज्या काही घाणेरड्या कमेंटस लिहिल्या आहेत, अश्लिल चित्रे काढली आहेत ती साबणाने, पाण्याने पुसून टाका. हे ऐकून माझ्या वडिलांचे अनुयायी तसेच करायचे.

(८) आजचा जमाना हा डिजिटल जमाना आहे. पण अॉनलाईन व्यवहार सुरू झाल्याने लोकांची नीच वृत्ती बदलली का? माझ्या वडिलांचे यश न बघवून त्यांना बदनाम करणारी अश्लिल चित्रे मिलच्या संडासात काढणारी ती माणसे काय व आजच्या काळात मला फेसबुक इनबॉक्स मध्ये अश्लिल व्हिडिओ, अश्लिल चित्रे पाठवणारी ती व्यक्ती काय, काही फरक आहे का या हलकट, नीच वृत्तीत? फक्त माध्यम बदलले, पण वृत्ती तीच राहिली.

(९) काही लोकांच्या अशा नीच वृत्तीवर, त्यांच्या ढोंगी स्वभावावर मी माझ्या कडक लिखाणातून जेंव्हा हल्ला चढवतो तेंव्हा माझेच काही चांगले मित्र मला अमर प्रेम या गाजलेल्या जुन्या हिंदी चित्रपटातील त्या फेमस गाण्याची आठवण करून देतात. आनंद बक्षी यांनी लिहिलेले, आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले, किशोर कुमार यांनी त्यांच्या सुंदर आवाजात गायलेले व राजेश खन्ना या सुपर स्टारने त्या चित्रपटात शर्मिला टागोर या नायिकेला पेश केलेले ते गाणे काय म्हणते तर "कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बातों में, कहीं बीत न जाए रैना"! अरे कसे सोडणार या नीच लोकांना? आज कुछ तो लोग कहेंगे और कल कुछ तो लोग करेंगे भी! हे कुछ जे असते ना ते खूप टोचणारे असते. गुलाबाचे फूल सुंदर, सुगंधी असते म्हणून त्याच्या सोबत असणारे काटे कोण अंगाला टोचून घेते काय? ते काटे बाजूला काढून फेकूनच देतात ना. अगदी तसेच फालतू कमेंटस करणाऱ्या टवाळखोरांना मी माझ्या फ्रेंड लिस्ट मधून खड्यासारखे बाजूला काढून त्यांना ब्लॉक करणार व माझे लिखाण त्यातला अर्थ नीट समजून घेऊन जे वाचतात त्यांना मी गुलाबाप्रमाणे माझ्याजवळ ठेवणार. हाच त्या "कुछ तो लोग कहेंगे" या गाण्याचा मी माझ्या स्वतःसाठी काढलेला अर्थ!

-ॲड.बी.एस.मोरे©४.७.२०२० 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा