https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १९ जुलै, २०२०

बुद्धीला प्रश्न पडले नाहीत तर ती गंजते!

बुद्धीला प्रश्न पडले नाहीत तर ती गंजते!

(१) बुद्धीला प्रश्न पडतात तेंव्हा ती त्या प्रश्नांचा मागोवा घेत त्यांची उत्तरे शोधते व अशी उत्तरे शोधत आयुष्याचे धडे शिकत जाते. आपली ज्ञानेंद्रिये आपल्या मेंदूतील बुद्धीला माहिती पुरवतात तर आपल्याला होणाऱ्या वासना, भावना यांच्या जाणिवा याही आपल्या बुद्धीला माहिती पुरवतात. माहिती हे बुद्धीचे खाद्य असते. हे खाद्य मिळाले नाही तर बुद्धी उपाशी राहून मरेल. हे खाद्य बुद्धीचे कच्चे अन्न असते.  ते खाण्यास म्हणजे ज्ञान या अर्थाने वापरण्यास योग्य होण्यासाठी बुद्धी त्यावर प्रक्रिया करते. प्रश्न सुरू करून बुद्धी त्या प्रक्रियेचे इंजिन सुरू करते. बुद्धीला प्रश्न पडणे हेच बुद्धीच्या जिवंत पणाचे लक्षण असते. बुद्धीला जर प्रश्न पडले नाहीत तर ती गंजते. शालेय शिक्षण हे मूलभूत प्रश्नोत्तरांचे शिक्षण असते तर कॉलेज शिक्षण हे गंभीर प्रश्नोत्तरांचे शिक्षण असते. निसर्ग हीच मोठी शाळा व हेच मोठे कॉलेज आहे. म्हणून औपचारिक शाळा, कॉलेजात न शिकणारी माणसेही निसर्गाच्या शाळा, कॉलेजात सतत अनौपचारिक शिक्षण घेत असतात.

(२) मी कमला मिल या कापड गिरणीच्या खर्च (कॉस्टिंग) खात्यात कारकून म्हणून कामाला लागलो तेंव्हा मी कॉमर्स शाखेचा पदवीधर (बी.कॉम.) होतो. परंतु कापसावर होणारी प्रक्रिया, तो प्रक्रिया खर्च काय असतो याची बिलकुल माहिती नव्हती. म्हणजे बी.कॉम. पदवीतून मिळालेले माझे ज्ञान जुजबी होते. मग हळूहळू कॉस्टिंग खात्याच्या वरिष्ठांची बोलणी खात कापूस खरेदी खर्च, कापसापासून धागा बनविण्याचा खर्च, धाग्यापासून कापसाचे तागे बनविण्याचा खर्च, मग त्या ताग्यांची धुलाई, रंगरंगोटी, डिझाईन वगैरे करण्याचा खर्च, या संपूर्ण प्रक्रियेत घाम गाळणाऱ्या कामगारांचा पगार, मग या सगळ्या खर्चांची गोळाबेरीज करून त्यावर केंद्रीय कर म्हणजे उत्पादन शुल्क (एक्साईज)अधिक केल्यावर येणाऱ्या एकूण कापड खर्चात कापड गिरणी मालकाचा नफा अधिक करायचा व मग कापडाची विक्री किंमत काढायची. या विक्री किंमतीवर मग पुढे कापड दूकानदार विक्री कर लावून ग्राहकाला कापड विकायचे. अशी ती लांबलचक प्रक्रिया होती. तिचे ज्ञान त्या कॉस्टिंग खात्यात कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यावरच मला प्राप्त झाले. बी.कॉम. पदवी नसलेले काही वरिष्ठ लोक त्या खात्यात माझे बॉस होते कारण त्यांना त्या  कामाचे प्रॕक्टिकल ज्ञान होते.

(३) नंतर मी बऱ्याच कंपन्यांत नोकऱ्या केल्या. तिथे विविध प्रकारचे ज्ञान मिळविले. मग कंपनी  सेक्रेटरी (इंटर) पूर्ण करून कंपनी सेक्रेटरीला मदतनीस म्हणून सेक्रेटरीयल प्रॕक्टिसचेही थोडे काम केले. मग पुढे एलएल.बी. करून वकिली करीत जगाचेही भरपूर ज्ञान मिळविले. परंतु माझ्या बुद्धीने मिळविलेले हे ज्ञान खूपच अपुरे आहे. म्हणून तिला सतत प्रश्न पडतात मग ते प्रश्न विज्ञानाचे असोत, धर्माचे असोत, निसर्गाचे असोत, देवाचे असोत, अर्थकारणाचे असोत, राजकारणाचे असोत, कलेचे असोत की क्रिकेट  सारख्या खेळांचे असोत. माझ्या बुद्धीवर या सर्व प्रश्नांचा सतत भडिमार चालू असतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न माझी बुद्धी सतत करीत असते.

(४) खरं तर, सगळ्यांनाच असे प्रश्न पडले पाहिजेत. तुम्ही ते विचारले पाहिजेत. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणारा एकच गुरू सापडू शकत नाही. कारण निसर्गाच्या सर्व शाखांचे पूर्ण ज्ञान असणारा गुरू या जगात असूच शकत नाही. म्हणून मी कोणालाही गुरू करून घेतला नाही. बाकी आयुष्यात बरेच गुरू भेटले ज्यांनी मला काही गोष्टी शिकवल्या. पण माझा खरा गुरू एकच आणि तो म्हणजे निसर्ग. त्या निसर्गात देव आहे असे मानून मी त्या देवालाच उलट प्रश्न करतो. आता देवाला मी असे उलट प्रश्न केल्यावर काहीजण उगाच भावनिक का होतात हेच मला कळत नाही. आपण ज्याच्या वर प्रेम करतो, ज्याच्या वर विश्वास टाकतो त्यालाच प्रश्न करणार नाही तर मग कोणाला करणार? लहान मुले आईवडिलांनाच प्रथम प्रश्न विचारणार ना! मग मी वयाने कितीही मोठा झालो, जगातील काही जुजबी ज्ञान मिळवले तरी निसर्गापुढे म्हणा किंवा निसर्गातील देवापुढे म्हणा मी लहान मूलच ना!

(५) तुम्हीच निवडून दिलेल्या तुमच्या सत्ताधारी लोकांना उलट प्रश्न केले नाहीत तर ते तुम्हाला गृहीत धरतील, तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तुमच्या बोडक्यावर बसतील. म्हणून त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. कारण आपण त्यांना आपले मायबाप समजतो. त्यांनीही मुले असे प्रश्न का करतात म्हणून रागावू नये. पण काही मुले खोडकर असतात. ती उगीच चेष्टा करायची म्हणून काहीतरी प्रश्न कुत्सितपणे विचारत राहतात. हे असले उद्योग खरेच चुकीचे आहेत. काही माणसे उगाच वाद घालायचा म्हणून केवळ वादासाठी वाद घालतात. हे तर अतिशय निंदनीय आहे.

(६) साधारण साठी ओलांडली की माणसाचा मृत्यूकडे प्रवास सुरू होतो. माझे वय सद्या ६४ चालू आहे. म्हणजे या प्रवासात मी पुढे येऊन पोहोचलोय. पण माझ्या बुद्धीला सतत प्रश्न पडतच राहतात. समाजमाध्यमांवर माझ्या  लेखांतून, छोट्या छोट्या विचार वाक्यांतून मी या प्रश्नांना उघड करतो. माणूस हा मरेपर्यंत शिकतच असतो. पण बरेच प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरीत राहतात. म्हणून माणूस हा मरताना ज्ञानाच्या बाबतीत अतृप्त राहूनच मरतो. मानवी बुद्धी ही जिज्ञासू असते म्हणून ती सतत प्रश्न करते. तिला प्रश्न विचारू द्या! तुम्ही जर तिला प्रश्न विचारताना अडवले, रोखले तर ती गंजून जाईल!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा