https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

मेल्यावरही चांगल्या आठवणीत रहावे!

मेल्यावरही चांगल्या आठवणीत राहण्यासाठी चांगले जगायला हवे!

(१) जगात माणसे येतात, जातात पण जगाचे व्यवहार थांबत नाहीत. जग काय किंवा निसर्ग काय ही एक फार मोठी संस्था आहे. राष्ट्र ही छोटी संस्था तर जग ही मोठी संस्था! राष्ट्र हे अनेक नागरिकांचे बनते तर जग हे अनेक सजीव, निर्जीव पदार्थांचे बनलेले आहे. राष्ट्राचा कायदा असतो तसा जगाचा (निसर्गाचा) सुद्धा कायदा असतो. राष्ट्रध्वज हे राष्ट्राचे भावनिक प्रतीक असते. त्याचप्रमाणे काही लोकांसाठी  देव हे जगाचे (निसर्गाचे) प्रतीक आहे. मीही देवाला निसर्गाचे प्रतीक मानणाराच आस्तिक आहे.

(२) इथे ही गोष्ट महत्त्वाची आहे की, ज्याप्रमाणे राष्ट्रध्वजाच्या प्रतीकात राष्ट्राविषयीची चांगली भावना दडलेली असते त्याचप्रमाणे देवाच्या प्रतीकात जगाविषयीची (निसर्गाविषयीची) चांगली भावना दडलेली असते. पण राष्ट्राचे सर्व नागरिक ज्याप्रमाणे चांगले नसतात त्याप्रमाणे जगातील (निसर्गातील) सर्व सजीव, निर्जीव पदार्थ चांगले नसतात. त्यांच्यात विषारी किंवा विध्वंसक गुण असतात. ज्याप्रमाणे दुर्गुणी नागरिकांमुळे राष्ट्राविषयीच्या चांगल्या भावनेला ठेच पोहोचते व या चांगल्या भावनेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज अपमानित होतो, डागाळला जातो, अगदी त्याचप्रमाणे विषारी पदार्थ व दुर्गुणी प्राणीमात्रांमुळे जगाविषयीच्या किंवा निसर्गाविषयीच्या चांगल्या भावनेला खोल ठेच पोहोचून या चांगल्या भावनेचे प्रतीक असलेला देव अपमानित होतो, डागाळला जातो.

(३) महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली भावना जिवंत असते म्हणून चांगली प्रतीकेही जिवंत असतात. जिवंत राष्ट्र हे राष्ट्रध्वजाच्या प्रतीकात जिवंत असते व जिवंत जग (निसर्ग) हे देवाच्या प्रतीकात जिवंत असते. राष्ट्रीय व्यवहारांत जसा राष्ट्रध्वज सोबतीला असतो त्याप्रमाणे जगाच्या (निसर्गाच्या) व्यवहारांत देव सोबतीला असतो. पण राष्ट्रध्वज सोबतीला ठेऊन राष्ट्रद्रोह करणारे काही दुर्गुणी नागरिक असतात त्याप्रमाणे देवाला सोबतीला घेऊन वाईट कर्मे करणारी माणसेही असतात. वाघ, सिंहासारख्या हिंस्त्र प्राण्यांना देव कळत नाही. कारण चांगल्या वाईटातला फरकच त्यांना कळत नाही. पण माणसाला हा फरक कळतो म्हणून त्याच्या मनात चांगल्या भावनेतून देव निर्माण होतो व तो देव जगात चांगल्या गोष्टींचे जतन व वाईट गोष्टींचे निर्दालन करण्याचा प्रयत्न करतो.

(४) जगात माणसे येतात तशी जातातही, पण त्यांच्या जाण्याने जग (निसर्ग) नावाची संस्था बंद पडत नाही, तिचे व्यवहार बंद पडत नाहीत.  याचे कारण म्हणजे गेलेल्या माणसांची जागा जगात नव्याने आलेली माणसे घेतात. माणूस काय किंवा जगातील इतर पदार्थ, वनस्पती व प्राणी काय त्यांच्यात सतत परिवर्तन होतच असते. नवीन गोष्टी जुन्या होतात, जुन्या गोष्टी नष्ट पावतात व त्यांची जागा पुन्हा नवीन गोष्टी घेतात. हे रहाटगाडगे, चक्र सतत चालूच आहे.

(५) माणसाचे जगणे या रहाटगाडग्यात काही काळापुरतेच असते. माणूस मेल्यावर त्याचा चेहरा जगाच्या व्यवहार पटलावरून नाहीसा होतो. जवळची नातेवाईक मंडळी त्याचा चेहरा फोटोत घालून ठेवतात तर महापुरूषांचे चेहेरे लोक चित्रांत, पुतळ्यांत जतन करून ठेवतात.  जगात जगताना लोकांच्या चांगल्या भावनेला ठेच पोहोचणार नाही व या चांगल्या भावनेवर आधारित असलेली प्रतीके डागाळली जाणार नाहीत याची काळजी घेत चांगले जीवन जगून आदर्श निर्माण करणारी माणसे लोकांच्या कायम स्मरणात राहतात. म्हणून मेल्यावरही चांगल्या आठवणीत राहण्यासाठी चांगले जगायला हवे!

-ॲड.बी.एस.मोरे©२४.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा