मला पुन्हा नव्याने जीवन जगायचेय माझ्या सुधारलेल्या नव्या रूपात!
शाळा, कॉलेजच्या औपचारिक शिक्षणातून व वकिली व्यवसायातील अनुभवातून मी खूप शिकलोय. परंतु गेले पाच ते सहा महिने या कोरोना महामारीने व कोरोना लॉकडाऊनने जे शिक्षण मला दिले त्याला तोड नाही. उगवता सूर्य, त्याचा दिवस, मावळता सूर्य, अंधारी रात्र, रात्रीचा चंद्र आणि यांच्या मधोमध असलेल्या पृथ्वीवरील माझे अस्तित्व व वास्तव्य याचा नवीनच अर्थ मला याच भयाण काळात चांगला कळला. पूर्वीही माणसे मरत होती. पण कामात व्यस्त असल्याने त्यांचे मरण जीवनाचा सखोल अर्थ सांगत नसायचे. आता मात्र गेली पाच ते सहा महिने अर्थप्राप्ती करून देणारे कामच नसल्याने मन मोकळे झाल्याचा अर्थात मुक्तीचा वेगळाच अनुभव घेतोय. स्वतःचे आत्मपरीक्षण करीत जगाचा विचार करायला मला भरपूर वेळ मिळाला. माणसांचे या काळातील मृत्यू व त्यांची या काळातील अत्यंत भीतीग्रस्त दयनीय अवस्था खूप काही शिकवून गेली. जगातील कितीतरी निरर्थक गोष्टींवर माणूस उगाचच वाद घालत बसतो व जीवन तणावग्रस्त करून घेतो हेही याच काळाने नीट विचारांती कळले. या काळाने खरंच माझ्यात खूप सुधारणा घडवून आणलीय. मी आता वाट बघतोय ती हा कोरोना विषाणू या जगातून कसा व कधी नष्ट होईल व त्याच्यापासून माणूस कधी पूर्णपणे भयमुक्त होईल याची! कारण मला आता पुन्हा नव्याने जीवन जगायचेय माझ्या सुधारलेल्या नव्या रूपात!
-ॲड.बी.एस.मोरे©८.९.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा