https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

कोरोना लॉकडाऊन व माझी घसरलेली वकिली!

कोरोना लॉकडाऊन व अर्थप्राप्तीचे कायदेशीर काम हे दोनच विषय सद्या मला महत्त्वाचे!

सद्या कोरोना लॉकडाऊन व पैशाची भ्रांत एवढे दोनच विषय माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत व मुंबईच्या लोकल ट्रेन्स सुरू होत नाहीत तोपर्यंत तरी मला काम मिळणे कठीण आहे. सद्या या लोकल ट्रेन्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी चालू आहेत. वकील अत्यावश्यक सेवेत मोडत नाही असे हायकोर्टाने जाहीर केलेय. मी कोर्टाच्या बाहेरही कायदा सल्ला व दस्तऐवज बनविणे ही पार्ट टाईम प्रॕक्टिस करू शकतो. इथे डोंबिवली मुक्कामी स्थानिक पातळीवर ते काम मिळत नाही. त्यासाठी मला मुंबईलाच जायला हवे. मला तिकडेच अशाप्रकारचे थोडेफार काम मिळू शकते. म्हणून मी मुंबई लोकल ट्रेन सुरू व्हायची आतुरतेने वाट बघतोय. बाकी आता मला इतर गोष्टींत रस वाटत नाही. माणूस असा बिझी हवा की त्याला त्या कामातून थोडे तरी पैसे मिळाले पाहिजेत. गेली पाच ते सहा महिने मी निर्लज्जासारखा विवाहित मुलीच्या पैशावर जगत घरी बसून आहे. स्वाभिमानी माणसाला हे असे जगणे महाकठीण! आयुष्यात मी कधीही कोणाची मदत घेतली नाही. मी जे कमावले ते स्वतःच्या कर्तुत्वावर! बालपणी आईवडील व म्हातारपणी मुलगी असा मात्र माझ्या मदतीचा भाग झालाय. आईवडिलांचे ठीक आहे कारण आपण त्यावेळी लहान असतो. पण मी ज्ञानाने व अनुभवाने ६४ वर्षे वयाचा टप्पा गाठल्यावर मुलीच्या मदतीवर जगणे हे माझ्या स्वाभिमानी मनाला पटत नाही. वकील मंडळी व वकील संघटनांचीही मदतही मी सविनय नाकारली. ती इतर गरजूंना द्या असे मी त्यांना सांगितले. माझे ज्ञान कमकुवत झालेले मी सहन करू शकत नाही. सद्या एकदम बेकार अवस्था झालीय! मला अॉनलाईन कामे जमत नाहीत. कायद्याचे मोठमोठे दस्तऐवज असतात. फेसबुकवर लेख लिहिणे मला सोपे आहे. पण या उतार वयात ते अॉनलाईन वकिलीचे काम मला अवघड आहे. माझी वकिलीची स्टाईल जुनी आहे. हल्लीचे तरूण वकील या अॉनलाईन वकिलीत हुशार आहेत. तीच तर माझी गोची आहे! मी क्लायंटसोबत प्रत्यक्ष समोरासमोर बसून केस ऐकून क्लायंटला पटकन कायदेशीर सल्ला देऊ शकतो. पण त्यासाठी समोरासमोर बसून केस चर्चा महत्त्वाची असते. मग त्या चर्चेत (कॉन्फरन्स) मी दिलेल्या सल्ल्यानुसार कंपनीचाच टायपिस्ट तिथे हजर असतो. मग मी सांगेन त्याप्रमाणे तिथे कोर्टाचे प्रोसिंडिंग्ज, दस्तऐवज बनतात. मी मुख्यतः कायदेशीर दस्तऐवज व कोर्टाचे सिव्हिल प्रोसिडिंग्ज ड्राफ्ट करतो व चर्चेतून कायदेशीर सल्ला देतो. हाच तर माझा अनेक वर्षांचा मोठा अनुभव आहे. मुंबईत सॉलिसिटर फर्म्स असे काम करतात. मी सॉलिसिटर नसलो तरी माझे काम त्याच स्वरूपाचे आहे. लिगल ड्राफ्टिंग व कोर्ट ब्रिफिंग कामात मी तज्ञ आहे. असे उच्च कायदेशीर काम फक्त मुंबईतच मी मिळवलेय व यापुढेही ते मी मिळविणारच! कृपया ही माझ्या कामाची जाहिरात आहे असे कोणीही समजू नये. मन मोकळे करावे वाटले म्हणून थोडे सविस्तर लिहिले आहे. एवढे मात्र खरे की हा सद्याचा काळ मलाच नाही तर सगळ्यांसाठीच खूप कठीण आहे. मिडियात मात्र दुसरेच विषय घोळून घोळून चवीने चघळले जात आहेत. मला तर तो टी.व्ही. बघू वाटत नाही की वर्तमानपत्र उघडून वाचू वाटत नाही. मला वाटतेय की, अॉक्टोबर महिन्यापासून हळूहळू गाडी रूळावर येईल. तोपर्यंत आशेने वाट बघतोय!

-ॲड.बी.एस.मोरे©७.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा