https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

मैं तो चला जिधर चले रस्ता!

जेंव्हा सदसद्विवेकबुद्धीचे दोन तुकडे होतात!

मानवी मनाच्या लोखंडासारख्या जड भौतिक वासना व हवेसारख्या हलक्या आध्यात्मिक भावना यांच्या भरकटण्यावर नियंत्रण ठेवणारी व त्या दोघांत समन्वय व संतुलन साधणारी स्वतंत्र बुद्धी हीच सदसद्विवेकबुद्धी होय. ही स्वतंत्र बुद्धी जेंव्हा कोमात जाते किंवा काही काळापुरती रिकामी होते तेंव्हा तिचे दोन तुकडे होतात. सदसद्विवेकबुद्धीचा एक तुकडा जड वासनांबरोबर वाहत जातो व दुसरा तुकडा हलक्या भावनांबरोबर वाहत जातो व हे दोन्ही तुकडे मनाबरोबर भरकटले जातात. वासनिक व भावनिक मनावरील सदसद्विवेकबुद्धीचा ताबा सुटणे यालाच बुद्धीचे भरकटणे म्हणतात. अशा अवस्थेत वासनांध व भावना वेडे मन हे बुद्धीचा ताबा घेते व बुद्धीच्या दोन तुकड्यांना मनाप्रमाणे नाचवते. स्वतंत्र कार्य करणाऱ्या सदसद्विवेकबुद्धीचे दोन तुकडे झाले की काय होते तर माणूस एकतर इहवादी बनतो किंवा देवभोळा किंवा अती नैतिक होतो. खरं म्हणजे इहवाद (मटेरियलिजम) हे निसर्गाचे पूर्ण विज्ञान नसून ते बुद्धीचे जड वासनेबरोबर भरकटणे होय. तसेच देवभोळेपणा किंवा अती नैतिकता (स्पिरिच्युअलिजम) ही आध्यात्मिकता नसून ते बुद्धीचे हलक्या भावनेबरोबर भरकटणे होय.

-ॲड.बी.एस.मोरे©६.९.२०२०

टीपः

माझ्या या लघु लेखाला १९७२ साली प्रदर्शित झालेल्या धडकन या चित्रपटातील संजय खान या नटावर चित्रित केलेले "मैं तो चला जिधर चले रस्ता" हे गाणे प्रातिनिधीक म्हणून घेतले आहे. आपल्या मनाला निश्चित ध्येय नसेल तर आपले मनही असेच जिथे रस्ता फुटेल तिथे भरकटते. आपली सदसद्विवेकबुद्धी जेंव्हा रिकामी होते व तिचे दोन तुकडे होतात तेंव्हा मग मन जिकडे धावेल तिकडे बुद्धीचे हे दोन तुकडेही भरकटलेल्या अवस्थेत धावत जातात. कारण मनाला निश्चित ध्येय सांगणारी व त्या ध्येयाच्या दिशेने योग्य मार्ग दाखविणारी स्वतंत्र   सदसद्विवेकबुद्धी जाग्यावर नसते. मग  काय, मैं तो चला जिधर चले रस्ता!

-ॲड.बी.एस.मोरे©६.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा