https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

विचारपुष्पांची ओंजळ!

विचारपुष्पांची ओंजळ, विविध विषयांवरील चौफेर लिखाण असलेले एक सुंदर पुस्तक!

(१) विचारपुष्पांची ओंजळ हे २२९ पानांचे पुस्तक माझे फेसबुक मित्र श्री.सुधीर ना. इनामदार यांनी मला सोलापूरवरून माझ्या डोंबिवलीच्या घरी स्पीड पोस्टने पाठवून दिले. गेले आठवडा त्या पुस्तकाचे वाचन चालू होते. आज शिक्षक दिनी (५ सप्टेंबर २०२०) रोजी या पुस्तकाचे वाचन संपले हा एक सुंदर योगायोग! माझी श्री. इनामदार यांच्याशी फेसबुकवरच बहुतेक दोन वर्षापूर्वी मैत्री झाली. ते वयाने माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठे आहेत त्यामुळे परिपक्वता या निकषावर माझ्या जवळच! शिवाय ते सोलापूर न्याय खात्यातून प्रबंधक (अधिकारी वर्ग १) या उच्च पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत व मी वकील त्यामुळे कायदा व न्याय या विषयाच्या निकषावर आणखी जवळीक! शिवाय ते मूळ सोलापूरचे स्थायिक व पंढरपूर त्यांचे आजोळ आणि माझे बालपण पंढरपूरी गेले आहे. ती गावच्या मातीची ओढ ही मैत्री आणखी जवळ करीत गेली. आणि शेवटचा निकष म्हणजे तेही फेसबुक लेखक आणि मीही फेसबुक लेखक! या सर्व गोष्टींमुळे ही फेसबुक मैत्री तशी थोडी हटकेच!

(२) हे पुस्तक म्हणजे श्री. इनामदार यांच्या फेसबुक लिखाणाचे संकलन आहे. वैयक्तिक नातेसंबंध इथपासून ते न्याय खात्यातील त्यांचे नोकरीचे विविध अनुभव, सामाजिक जाण व संवेदनशीलता असल्याने विविध सामाजिक विषय, भारतातील विविध ठिकाणी केलेल्या प्रवासाचे वर्णन, बालपणीचे त्यांचे गरिबीचे दिवस इत्यादी विविध विषयांवरील चौफेर लिखाणामुळे हे पुस्तक नुसते वाचनीयच नव्हे तर ज्ञान वर्धक व मनाला प्रगल्भ, परिपक्व करणारे झाले आहे. काही लेख वाचताना तर जणूकाही तो अनुभव मीच घेतोय असा भास झाला. विशेष करून पान क्रमांक २१० व २११  वर असलेला त्यांचा "आर्थिक विवशता" हा लेख तर अक्षरशः माझाच बालपणीचा अनुभव आहे. लेखक इनामदार यांचे वडील सोलापूर येथील लक्ष्मी मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करीत होते तर माझे वडील मुंबईतील व्हिक्टोरिया मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करीत होते. त्यावेळी मिलच्या सोसायटी कडून मिळणारे रेशन, मिलमधील सावकारी कर्ज वगैरे गोष्टी मीही प्रत्यक्षात अनुभवल्या आहेत. हा लेख मला स्वतःचाच वाटला म्हणून मी तो इथे पोस्ट करीत आहे.

(३) हे पुस्तक म्हणजे प्रस्तुत लेखकाचे एक छोटेसे आत्मचरित्रच आहे असे मला वाटते. कसलाही संकोच न करता त्यांनी त्यांचा जीवनपट या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्या वाचकांसाठी उघड केला आहे. पण त्यामध्ये आत्मप्रौढी बिलकुल नाही. ज्ञानाने प्रगल्भ, अनुभवाने संपन्न, बालपणी गरिबी अनुभवली तरी आता उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाचा उच्च आर्थिक स्तर व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी म्हणून सरकारी पेन्शनची सुरक्षितता अनुभवत पुण्याजवळ तळेगाव-दाभाडे येथील लॕटिस या सुंदर गृहसंकुलात २ बीएचके सदनिकेतील व त्या सुंदर परिसरातील सुखवस्तू जीवन, एक मुलगा सोलापूरात व दोन मुली पुण्यात उच्च विद्याविभूषित, हुशार व प्रेमळ नातंवडे, चांगले प्रेमळ नातेवाईक या एवढ्या चांगल्या गोष्टी जवळ असूनही अहंकाराचा लवलेशही नाही. मनाने सरळसाधा व प्रामाणिक माणूस! हे या लेखकाचे व माझ्या फेसबुक मित्राचे थोडक्यात वर्णन!

(४) योगायोगाने आज ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे व या पुस्तकाचे लेखक श्री. सुधीर ना. इनामदार यांनी त्यांच्या ज्ञान प्रगल्भ व अनुभव संपन्न जीवनपटातून माझा आणखी एक शिक्षक होण्याचे काम केले आहे. म्हणजे तेही माझे गुरूजी झाले. या पुस्तकाने माझे ज्ञान आणखी प्रगल्भ झाले, अनुभव आणखी संपन्न झाला व विचार आणखी परिपक्व झाले. फेसबुकचा वापर कसा करायचा व फेसबुक लिखाणाचे लोकांच्या लक्षात राहील असे सुंदर छापील पुस्तक कसे बनवायचे हे श्री. सुधीर ना. इनामदार यांच्याकडूनच शिकावे. मीही फेसबुक वर लिहित असतो. माझेही गेल्या पाच वर्षांत  ५०० च्या वर लेख व असंख्य विचार वाक्ये फेसबुकवर लिहून झालीत. पण त्या प्रदीर्घ लिखाणाचे मला पुस्तक काही बनवता आले नाही ही माझी वैयक्तिक खंत आहे. श्री. सुधीर ना. इनामदार यांच्याकडून प्रेरणा घेतल्याने  कदाचित माझ्या फेसबुक लिखाणाचीही पुस्तके  बनतील अशी आशा व्यक्त करून मी या सुंदर पुस्तकावरील माझे मनोगत इथेच संपवतो. या पुस्तकाच्या लेखकास व माझ्या या फेसबुक मित्रास उत्तम आरोग्य व भरपूर आयुष्य लाभो व त्यांच्याकडून समाज प्रबोधनाचे काम असेच आणखी होत राहो ही परमात्म्याजवळ प्रार्थना!

-ॲड.बी.एस.मोरे©५.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा