https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

देव भौतिक आहे!

निसर्गातला देव (निसर्गराजा) आध्यात्मिक नसून भौतिक आहे!

(१) मानवी शरीर हे जर भौतिक आहे तर मग निसर्गाची रचना व व्यवस्थाही ही सुद्धा भौतिक मानण्याशिवाय पर्याय नाही. याच तर्काने मानवी शरीराचा राजा (मेंदू) हा जर भौतिक तर मग निसर्गाचा राजा (देव) हा सुद्धा भौतिक आहे असेच मानावे लागेल. तसे भौतिक आहे म्हणून तर मानवी मेंदू हा निसर्गातून दोन मुख्य भौतिक गोष्टी वसूल करण्यात सतत व्यस्त आहे. त्या म्हणजे भौतिक सुखाचे आर्थिक लाभ आणि भौतिक शांतीची राजकीय सुरक्षितता!

(२) कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळण्यासाठी जर देवापुढे प्रार्थना केली जात असेल तर अशी प्रार्थना ही राजकीय सुरक्षिततेतून भौतिक शांती मिळावी म्हणून केलेली स्वार्थी प्रार्थना होय व अशा मुक्तीसोबत अर्थचक्र चालू होऊन भौतिक गोष्टी खरेदी करण्यासाठी पैशाची सोय व्हावी अशी अपेक्षा देवाकडून करीत तशी प्रार्थना जर देवापुढे केली जात असेल तर तीही आर्थिक लाभातून भौतिक सुख मिळावे म्हणून केलेली स्वार्थी प्रार्थना होय. आता या दोन्ही प्रार्थनेमध्ये जर मनुष्याचा भौतिक स्वार्थ दडला आहे तर मग अशा देव प्रार्थनेत कोणती आध्यात्मिकता आहे? भौतिक सुख व शांतीचा ध्यास असलेली देव प्रार्थना ही कदापि आध्यात्मिक होऊ शकत नाही.

(३) भौतिक सृष्टीतील मानव समाजात काही माणसे अशी आहेत की त्यांना प्रेम, करूणा यासारख्या भावनांचा ओलावा देत (या ओल्या भावनांना हृदय असे संबोधण्यात येते) दिवाणी (सिव्हिल) बुद्धीचा (शांत डोक्याचा) हळूवार, हलका धक्का देत त्यांच्याबरोबर आर्थिक सुखाची देवाणघेवाण करावी लागते अर्थात असे आर्थिक व्यवहार करावे लागतात. पण अशा आर्थिक व्यवहारांत केवळ माणुसकीचा भावनिक ओलावा (हृदय) दडलाय म्हणून असे व्यवहार हे आध्यात्मिक होऊ शकत नाहीत. ते भौतिकच होत! त्यांना फार तर कोमल भौतिक आर्थिक व्यवहार म्हणता येईल.

(४) पण भौतिक सृष्टीतील मानव समाजात काही माणसांना माणुसकीचा ओलावाच कळत नाही. त्यांची वृत्ती हिंस्त्र प्राण्यांप्रमाणे जंगली झालेली असते. उदा. खून, बलात्कार यासारखे गुन्हे करण्यात पटाईत झालेले सराईत गुन्हेगार. अशा गुन्हेगारांना दिवाणी (सिव्हिल) स्वरूपाचा आर्थिक व्यवहार काय कळणार? अशा जंगली  लोकांना फौजदारी (क्रिमिनल) बुद्धीचा (तापट डोक्याचा) जड हातोडा जोरात मारूनच चांगले  वठणीवर आणावे लागते. असे व्यवहार कठोर भौतिक राजकीय व्यवहार होत.

(५) निसर्गातील भौतिक देवाने निर्माण केलेली निसर्गाची भौतिक रचना व भौतिक व्यवस्था आध्यात्मिक नसून ती भौतिक आहे कारण तो देवच (निसर्गराजा) भौतिक आहे! नावे बदलून अर्थात भौतिकतेला आध्यात्मिकता चिकटवून मनुष्य जर मानसिक समाधान मिळवू पहात असेल तर ते समाधान खोटे आहे. हा प्रकारच मुळी सत्यापासून फारकत घेऊन आभासात जगण्याचा प्रकार होय. मनुष्याच्या आभासी आध्यात्मिकतेत भौतिक सुख व शांतीसाठी चालणारी त्याची धडपड आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

(६) निसर्ग व भौतिकता यांना एकमेकांपासून अलग करता येणार नाहीत. पण तरीही निर्जीव पदार्थांची भौतिकता, अर्धसजीव वनस्पतींची भौतिकता, मानवेतर सजीव पक्षी, प्राण्यांची भौतिकता व पर्यावरणाच्या सर्वोच्च पातळीवर उत्क्रांत झालेल्या मनुष्याची भौतिकता यात फरक आहे. मानवी भौतिकता ही मानवेतर सजीवांप्रमाणे फक्त वासनांध भौतिकता नव्हे. कारण मनुष्याच्या मूळ भौतिक वासनांना प्रेम, करूणा यासारख्या पूरक अशा कोमल, नैतिक भावना चिकटलेल्या आहेत. या पूरक नैतिक भावनांचे नामकरण आध्यात्मिक भावना असे केल्याने त्यांना चिकटलेली मूळ भौतिक वासना नष्ट होत नाही. त्यामुळे असे नामकरण करणे चुकीचे होय. अर्थात मानवी मनातील नैतिक भावना या सुद्धा भौतिकच होत हे विसरता कामा नये.

(७) निसर्ग रचनेचा निर्माता व निसर्ग व्यवस्थेचा व्यवस्थापक आणि नियंत्रक असल्याशिवाय म्हणजे निसर्गात देव असल्याशिवाय हे भौतिक जग आपोआप निर्माण होऊच शकत नाही व ते आपोआप चालूच शकणार नाही असे माझे तार्किक मत असल्याने निसर्गात देव आहे या मतावर मी ठाम आहे. पण निसर्गातला हा देव (निसर्गराजा) आध्यात्मिक नसून भौतिक आहे असेही माझे वैयक्तिक मत आहे. ते मत आहे त्यामुळे इतर लोक त्याच्याशी सहमत होतीलच असे नाही. कारण मतमतांतरे असू शकतात.

-ॲड.बी.एस.मोरे©२३.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा