मिडिया ट्रायल व कायदा!
मी तुम्हाला घडलेली एक सत्यकथा सांगतोय. एका केसची ही सत्य गोष्ट आहे व ती प्रत्यक्षात घडली आहे. नवीनच लग्न झालेले! नवरा एका कॉलेजमध्ये प्राध्यापक तर बायको बारावी पर्यंत शिकलेली एक गृहिणी! नातेवाईकांनी ठरवून केलेले हे लग्न! पण शिक्षण व वैचारिक तफावत होती दोघांत! क्षुल्लक कारणांवरून दोघांत भांडणे व्हायची व त्याचा आवाज बाहेर जायचा. बायको तापट स्वभावाची अपरिपक्व स्त्री होती. प्राध्यापक नवऱ्याला खूप त्रास होत होता. पण आज सुधारेल, उद्या सुधारेल म्हणून तो शांत राहिला. आपल्या मुलीचा स्वभाव कसा आहे हे तिच्या आईवडिलांना चांगले ठाऊक होते. पण लग्न जमवताना तिच्या स्वभावाचा अंदाज येणे हे केवळ अशक्य होते. हळूहळू आपण फसलो आहोत हे प्राध्यापक नवऱ्याच्या लक्षात येऊ लागले. त्याने आपल्या व तिच्या नातेवाईकांना तिच्या स्वभावाची कल्पना दिली. पण सर्वांनी नवीन संसार आहे. भांड्याला भांडे लागणारच असे म्हणून त्या नवऱ्याला शांत केले. एके दिवशी कॉलेजला जाताना बायकोने वांग्याची भाजी जेवणात दिली. ती एकदम बेचव झाली म्हणून नवरा तिच्यावर भडकला. मग साध्या वांग्याच्या भाजीवरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. ते भांडण शेजाऱ्या पाजाऱ्यांनीही ऐकले. मग प्राध्यापक नवरा तणतणत कॉलेजला निघून गेला आणि इकडे त्याच्या बायकोने डोक्यात राग घेऊन घरात गळफास लावून आत्महत्या केली. नवरा कॉलेजवरून घरी आल्यावर बायको आतून दाराची कडी उघडेना म्हणून त्याने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी दरवाजा बाहेरून ढकलून ढकलून तोडला व मग सर्वांनी घरात बायकोचे फासावर लटकलेले शरीर पाहिले. प्राध्यापक नवरा तर डोक्यावर हात मारून सुन्न होऊन रडत बसला. कोणीतरी पोलीसांना कळवले. पोलीसांनी मृतदेह खाली उतरवून त्याचा पंचनामा केला व ॲम्ब्युलन्स बोलवून शव विच्छेदनासाठी तो मृतदेह जवळच्याच सरकारी रूग्णालयात पाठवला. चौकशीसाठी प्राध्यापक नवऱ्यास पोलीस स्टेशनला नेण्यात आले. पोलीसांनी सुरूवातीला आकस्मित मृत्यू अशी नोंद करून चौकशीला सुरूवात केली. तोपर्यंत ही बातमी मुलीच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली. मुलीकडचे सर्व नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये येऊन "हा नवराच आमच्या मुलीला सारखा हुंड्यासाठी छळत होता, याच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करा" असे म्हणून रडू लागले. काही नातेवाईक "आता मुलगी तर गेलीय, पण याला सोडायचा नाही" असे म्हणू लागले. मग पोलीसांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांचे जबाब घेतले. तर सगळ्यांनी "यांची सारखी भांडणे होत होती" अशी साक्ष दिली. मग गळ्याला फास लागल्याने मृत्यू असा शव विच्छेदनाचा अहवाल आला. पोलीसांनी प्राध्यापक नवऱ्याचे म्हणणे ग्राह्य न धरता भांडणे होत होती या प्राथमिक अंदाजावर संशयावरून नवऱ्यावर "आत्महत्येस प्रवृत्त करणे" हा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. नवरा प्राध्यापक असल्याने मिडियाने आकाश पाताळ एक केले. पुढे ती केस कोर्टात चालली. शेवटी कोर्टाकडून तो नवरा निर्दोष सुटला. कारण त्यांच्यात भांडणे होत होती याशिवाय नवऱ्याविरूद्ध कोणताच पुरावा नव्हता. पण केसचा निकाल लागेपर्यंत त्या प्राध्यापक नवऱ्याची कॉलेजची चांगली नोकरी गेली होती व समाजात खूप बदनामी झाली होती. तो प्राध्यापक आता कसाबसा सावरला आहे. दुसरीकडे नोकरीला लागला आहे. फक्त वांग्याची भाजी एवढा मोठा अनर्थ घडवू शकते. अशा केसेस होत असतात. काही केसेस मध्ये आरोपी गुन्हेगार असतातही. पण काही केसेस मध्ये ते निष्पापही असतात. पण कोर्टाकडून हे सर्व ठरेपर्यंत माध्यमे जेंव्हा संवेदनशील केसेस मध्ये स्वतःच न्यायालये बनून आरोपी गुन्हेगारच आहे असे समाजापुढे ठसवण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा त्यांच्यावर कोर्टाने बंधन आणले पाहिजे. राज्य पोलीस असो किंवा सी.बी.आय. असो, या यंत्रणांनी आरोपपत्र तयार होऊन ते रितसर फौजदारी कोर्टात दाखल होईपर्यंत त्यांची चौकशी पूर्णपणे गुप्त ठेवली पाहिजे. चार्जशीट दाखल होईपर्यंत मिडियाला त्यांच्या समांतर चौकशी नुसार व तर्कानुसार समाजाला काय सांगायचे ते सांगू द्यावे पण काही झाले तरी पोलीस चौकशी ही गुप्तच राहिली पाहिजे. फौजदारी खटला हा कोर्टात खुला चालतो. त्या खटल्याचे रिपोर्टिंग मिडियाने करणे वेगळे व खटला रितसर उभा रहायच्या अगोदर मिडिया ट्रायल घेणे यात फरक आहे. वर उल्लेखित एका खऱ्या केसचे उदाहरण देऊन एक वकील या नात्याने मी एवढेच म्हणेल की, मिडिया हा लोकशाहीचा चौथा खांब आहे हे मान्य केले तरी कायद्याच्या प्रक्रियेवर या मिडियाचा प्रभाव पडेल अशा कोणत्याही कृत्यापासून मिडियाला रोखलेच पाहिजे!
-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा