#challenge
फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर आपल्या घरातील स्त्रियांचे फोटो पुरूषांनी शेअर करावेत की करू नयेत, एक आव्हान!
ज्या लोकांना आपल्या बायको, मुली, सूना, आया बहिणींचे फोटो फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर एक आव्हान व मर्दुमकी म्हणून बिनधास्त टाकायचेत त्यांनी ते खुशाल टाकावे. कोणी फेसबुक इनबॉक्स मध्ये काय केले हे बघण्यापेक्षा अशा व्यक्तीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलेल्या गोष्टी पटतायत का बुद्धीला ही गोष्ट महत्त्वाची. माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. हलकट टोळीच्या हनी ट्रॕपमध्ये मीही एकदा सापडलो. आता लोक म्हणतील काका पण चाबरट आहेत. मग कशाला मोठ्या गोष्टी करतात आणि लोकांना शहाणपण शिकवतात. पण मीही माणूस आहे. मी फसलो, चुकलो पण घाबरलो नाही. भले भले चुकतात त्यात माझे काय? चुकलो म्हणजे चुकलो? पण मी आता आदळाआपट करीत नाही तर माझ्या चुकीतून लोकांना सावध करतो. काय केले असेल त्या हनी ट्रॕप टोळीने! माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला माझे बायको बरोबरचे जे फोटो फेसबुकवर टाकले होते तेच मला व्हॉटसॲपवर पाठवून देऊन मला पैसे मागितले. मग मी ते संभाषण वगैरेचे स्क्रीन शॉटस घेऊन डोंबिवली पोलीस स्टेशन व ठाणे सायबर गुन्हे शाखेस लगेच ईमेलने लेखी तक्रार केली. आता ती टोळी मी त्यांच्या धमकीला जुमानले नाही म्हणून माझ्या बायकोच्या फोटोंचा कदाचित गैरवापरही करतील. मग विचार आला की बायकोचे फोटो फेसबुकवर टाकले नसते तर बरे झाले असते. मी नंतर माझ्या बायकोचे ते सगळे फोटो फेसबुकवरून डिलिट केले. माझ्या मुलीने तर मला सक्त ताकीद दिलीय की तिचे फोटो कधीही फेसबुक किंवा कोणत्याच समाज माध्यमावर टाकायचे नाहीत म्हणून. मुलगी एम.बी.ए. व मोठ्या कंपनीची व्यवस्थापक आहे. पण ती जेंव्हा मला हे सांगते तेंव्हा ती मागासलेल्या विचाराची झाली का? फेसबुकवर काही नासके आंबे घुसले आहेत. एक नासका आंबा खरंच आंब्याची अख्खी करंडी नासवतो. विषाची परीक्षा का घ्या? तरीही जर कोणाला आपल्या घरातील स्त्रियांचे फोटो फेसबुकवर टाकण्यात कौतुक वाटत असेल तर त्यांनी घरातील त्या स्त्रियांची परवानगी घेऊन खुशाल टाकावेत. पण तत्पूर्वी फेसबुकवर अशाही गोष्टी चालतात याचीही त्यांना कल्पना द्यावी. बाकी आपण सूज्ञ आहातच!
-ॲड.बी.एस.मोरे©२४.९.२०२०
Your Answer is Correct Sir 🙏🙏
उत्तर द्याहटवा