https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

आधी पोटोबा, मग विठोबा?

आधी पोटोबा, मग विठोबा?

आधी पोटोबा, मग विठोबा ही म्हण मराठीत  प्रचलित आहे. तिच्या मागे खूप मोठा अर्थ दडला आहे. आपले शरीर, त्या शरीरात मन व त्या मनात आत्मा ही साखळी काही लोकांच्या डोक्यातच जात नाही. मनुष्याचा मेंदू व इतर प्राण्यांचा मेंदू यात फार फरक आहे. मानवी मेंदू   हा मोठा मेंदू व छोटा मेंदू या दोन भागांत आहे. आपला छोटा मेंदू आपल्या नकळत आपल्या शरीराच्या अनैच्छिक क्रिया पार पाडत असतो. त्याचे कार्य मोठ्या मेंदूशी संलग्न असले तरी ते बहुतांशी स्वतंत्र असते. आपला मोठा मेंदू मात्र तो काय करतोय याची आपल्याला जाणीव करून देत असतो. तो जाणीवपूर्वक आपल्या नुसत्या शरीराच्याच नव्हे तर आपल्या जाणिवेत असलेल्या मनाच्याही ऐच्छिक क्रिया पार पाडत असतो. जिथे जाणीव तिथे मन! छोटा मेंदू जर जाणीवच करून देत नाही तर मग त्याला मन आहे हे कसे म्हणावे? म्हणूनच माझ्या मते, आपले मन हे जाणीवपूर्वक ऐच्छिक शारीरिक व ऐच्छिक मानसिक क्रिया पार पाडणाऱ्या आपल्या मोठ्या मेंदूतच असते. मोठ्या मेंदूत असलेल्या या मनाच्या जाणिवा माझ्या मते दोन प्रकारच्या असतात. एक असते ती भौतिक जाणीव म्हणजे तहान, भूक, लैंगिक समाधान यासारख्या कनिष्ठ पातळीवरील शारीरिक वासनांची प्राथमिक जाणीव व दुसरी म्हणजे प्रेम, करूणा, देव, धर्म, देश यासारख्या उच्च पातळीवरील मानसिक भावनांची दुय्यम परंतु श्रेष्ठ जाणीव! ही श्रेष्ठ जाणीव मानवी नैतिकता व ज्यांची देवावर भावनिक श्रद्धा आहे त्यांची देवधार्मिक आध्यात्मिकता यांच्याशी निगडीत असते. मोठ्या मेंदूतील मानवी मनाची ही दुय्यम पण उच्च स्तराची श्रेष्ठ जाणीव हाच तर आत्मा आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. हा आत्मा नसेल तर माणूस हा माणूस रहात नाही. तो जनावर होतो. आपण ज्याला माणुसकी वगैरे म्हणतो ही याच आत्म्याची उच्च स्तरीय श्रेष्ठ जाणीव व अभिव्यक्ती आहे हेही माझे वैयक्तिक मत आहे. मग आधी पोटोबा व मग विठोबा या म्हणीचा अर्थ काय तर अगोदर शारीरिक गरजा भागवायच्या व त्यानंतरच मानसिक भावनांचा आदर करायचा. म्हणजे अगोदर आपल्या  मनाच्या शारीरिक वासनांची तृप्ती करायची व नंतर मनात असलेल्या आत्म्याच्या आध्यात्मिक  भावनांचे समाधान करायचे. पण असे करून चालेल काय? म्हणजे आपल्या शरीराची भूक किंवा लैंगिकता यांची तृप्ती करताना आत्मा हळूच बाजूला काढून ठेवायचा व मग शारीरिक तृप्ती झाली की मग आत्म्याचे भजन करायचे. याचा अर्थ असाही होईल की एखाद्याने वारकरी संप्रदायाची विठ्ठल माळ गळ्यात घालायची व मटण खाऊ वाटले की ती विठ्ठल माळ हळूच गळ्यातून काढून खुंटीला अडकवायची, मग मटण खायचे व नंतर अंघोळ करून शुद्धीकरण  भास करून घेत गळ्यात पुन्हा ती विठ्ठल माळ घालायची. यालाच आत्म्याला तात्पुरते खुंटीवर टांगणे असे म्हणतात. मनुष्याचे वासनिक मन व भावनिक आत्मा या दोन गोष्टी जाणीवपूर्वक ऐच्छिक काम करणाऱ्या मोठ्या मेंदूतून अलग करता येत नाहीत. कारण त्या संलग्न असतात. वासनिक मन व आध्यात्मिक आत्मा यांना जोडणारा एक दुवा मोठ्या मेंदूत असतो ज्याला सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. जनावरांच्या मेंदूत फक्त बुद्धी असते व ती त्यांच्या वासनिक मनाशी निगडीत असते. त्यांना आध्यात्मिक आत्माच नसतो व त्यामुळे सदसद्विवेकबुद्धी असण्याचा तिथे प्रश्नच नसतो. म्हणून जीवो जीवस्य जीवनम हा नियम फक्त जनावरांना लागू होतो. तो उच्च पर्यावरणीय पातळीवरील माणसांना लागू होत नाही. तसे जर असते तर जगात कधीही माणुसकी दिसली नसती. सर्व माणसे हिंस्त्र झाली असती व त्यांनी एकमेकांना खाल्ले असते. ही हिंस्त्र वृत्ती एखाद्या माणसात जेंव्हा जागृत होते तेंव्हा समजावे की त्याची सदसद्विवेकबुद्धी काही काळ नाहीशी झाल्याने अशा माणसाने स्वतःचा आत्मा खुंटीला टांगून ठेवलाय. स्त्री व पुरूष जेंव्हा विवाह करतात तेंव्हा त्यांच्या लैंगिक वासना व आध्यात्मिक भावना यांचा संगम होतो. विवाहात दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या व एकमेकांशी निगडीत असतात. या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडणारी वैवाहिक  सदसद्विवेकबुद्धी पती व पत्नी दोघांतही असेल तरच त्यांचा विवाह कायम टिकतो, नाहीतर मग घटस्फोट होतो. काही मानसशास्त्रज्ञ बुद्धीचे वासनिक बुद्धी व भावनिक बुद्धी असे दोन भाग करून मग वासनिक बुद्धीचे मोजमाप इंटेलिजन्स क्वोशंटने (आय. क्यू.) करतात व भावनिक बुद्धीचे मोजमाप इमोशनल क्वोशंटने (इ.क्यू.) करतात. पण दोन्ही बुद्धी या एकत्रच काम करतात व त्यांची सदसद्विवेकबुद्धी बनते त्या सदसद्विवेकबुद्धीचे मोजमाप कोण व कसे करणार? म्हणून म्हणतोय की मन व आत्मा या दोन गोष्टी व तसेच त्यांना नेहमी एकत्र ठेवणारी सदसद्विवेकबुद्धी यांना अलग करता येत नाही. कोणी तसे अलग केले की माणूस हा माणूस रहात नाही. तो जनावर होतो. मनाचे ऐहिक सुख व दुःख व त्यासोबत असलेल्या आत्म्याचे आध्यात्मिक समाधान व शांती या गोष्टी जिथे एकत्र नांदतात तिथे माणूस होतो. म्हणून आधी पोटोबा व मग विठोबा ही मराठी म्हण माझ्या  सदसद्विवेकबुद्धीला पटत नाही. पोटोबा व विठोबा दोन्हीही गोष्टी एकत्रच हव्यात अर्थात मन व आत्मा हे दोघेही एकत्रच नांदले पाहिजेत अशी माझी सदसद्विवेकबुद्धी मला सांगते.

-ॲड.बी.एस.मोरे©४.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा