https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

देवा, सर्वांना सुखी व शांत ठेव!

देवा, सगळ्यांना सुखी व शांत ठेव!

(१) निसर्गात देव आहे व तो निसर्गाचा निर्माता व नियंता आहे असे मानून "देवा, सगळ्यांना सुखी व शांत ठेव" अशी सर्वस्वार्थसमभावी प्रार्थना कितीजण करत असतील? मुद्दा हा आहे की, अशी प्रार्थना करून सर्व जग व त्या जगातील सर्व प्राणीमात्र व सर्व माणसे सुखी व शांत होऊ शकतात का?

(२) वनस्पतीजन्य प्राण्यांना मारून मांसाहारी हिंस्त्र प्राणी वनस्पतीजन्य प्राण्यांच्या मांसावर जगतात तेंव्हा वरील प्रार्थना अशी हिंसा रोखू शकत नाही हे सत्य आहे. तसेच तुम्ही दुसऱ्यांचे कितीही भले चिंता, दुसरी माणसे तुमचे हित जपतीलच याची शास्वती नाही. तुम्ही इतरांच्या शांतीची प्रार्थना कराल, पण तुमच्या अशांतीचे कारण बनणाऱ्या उपद्रवी माणसांचे तुम्ही काय कराल?

(३) माणूस हळूहळू उत्क्रांत झाला व मानवी संस्कृतीही हळूहळू विकसित झाली. उत्क्रांती ही झटपट क्रांतीची प्रक्रिया नव्हे. निसर्गाच्या विज्ञानाविषयी सुशिक्षित झालेला माणूस हा निसर्गाच्या व समाजाच्या पर्यावरणाविषयी सुसंस्कृत असेलच असे नाही. तसे असते तर मग मानव समाजाला पर्यावरणीय रक्षणाचे व सामाजिक सुसंस्कृतपणाचे कायदे करावेच लागले नसते.

(४) तुमच्या चांगुलपणाकडे अर्थात तुमच्या सुसंस्कृतपणाकडे पाठ फिरवून असंस्कृतपणा इतकेच नव्हे तर हिंसक गुन्हेगारीपणा दाखवून तुमच्यावर उलटणाऱ्या माणसांबरोबर तुमचे वर्तन कसे असेल? मानसिक समाधान म्हणून सर्वस्वार्थसमभावी प्रार्थना ठीक, पण प्रत्यक्ष व्यवहार हे अशा आध्यात्मिक देव प्रार्थनेवर आधारित असू शकत नाहीत.

(५) खरं तर, निसर्गात देव आहे असे मानून चालले तरी तो देव तुम्हाला देवभोळे व्हा असे सांगत नाही तर व्यवहारी व्हा असेच सांगतो. या व्यवहाराचे मूलभूत नैसर्गिक तत्व काय तर जशास तसे वागणे. तुमच्यावर अन्याय करून सुसंस्कृतपणाने जगण्याचा तुमचा हक्क जर कोणी बळाने हिसकावून घेऊ लागला तर तुम्ही त्याच्यापुढे देवाची प्रार्थना करीत बसणार की त्याला तुमचा जशास तशाचा हिसका दाखवून वठणीवर आणणार? फौजदारी कायदा तर हेच शिकवतो ना!

(६) स्वभाव गुणधर्मानुसार समाजात सुसंस्कृत, असंस्कृत व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेली अशी तीन प्रकारची माणसे असतात. आंतरमानवी संबंधातून निर्माण होणाऱ्या नात्यांचेही तीन प्रकार निरीक्षण व अभ्यासातून माझ्या लक्षात आले आहेत. पहिला प्रकार म्हणजे वीट येऊन संपृक्त अवस्था प्राप्त झालेली मृत नाती, दुसरा प्रकार म्हणजे सद्या अचल पण भविष्यात चल होऊ शकणारी संभाव्य उर्जेची अचल नाती व तिसरा प्रकार म्हणजे प्रेम व व्यवहाराच्या संततधारेने खेळती राहिलेली वाहत्या उर्जेची चल नाती!

(७) आंतरमानवी नातेसंबंधातील वरील तीन प्रकारचे वर्गीकरण मी मनुष्य स्वभावाच्या गुणधर्मानुसार केले आहे. पदार्थांच्या गुणधर्मा नुसार वागणे म्हणजे जशास तसे वागणे. असे गुणधर्मीय वर्तन हेच जर निसर्गाचे नैसर्गिकत्व आहे तर मग तेच निसर्गातील देवाचे देवत्व आहे असे तार्किक अनुमान निघते.

(८) या निसर्ग नियमाला जर निर्जीव पदार्थ, मानवेतर सजीव पदार्थ व माणूस हे सगळेच जण बांधील आहेत तर मग निसर्गातील देव या नियमापासून कसा मुक्त राहील? देवाची भक्ती किंवा अध्यात्म हे सुद्धा या नियमापासून मुक्त होऊ शकत नाही किंवा अपवाद होऊ शकत नाही असे मला वाटते.

(९) म्हणून प्रभो गुणधर्मा असेच निसर्गातील देवाचे नामस्मरण करीत जशास तसे नियमाने गुणधर्मीय वर्तन करणे हीच निसर्गातील देवाची भक्ती होय, देवपूजा होय असे माझे वैयक्तिक मत आहे. मी निसर्गातील देवाला निसर्गाचा आधार मानत असल्याने निसर्गाच्या विज्ञानातच मी देवाचा धर्म बघतो. माझ्या या वैयक्तिक मताशी सगळेजण सहमत होणार नाहीत हे मला माहित आहे. पण हे माझे वैयक्तिक मत असल्याने त्यावर वादविवाद घालू नयेत ही नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा