सामाजिक सुसंस्कृतपणा व कायदा!
जंगली जनावरांच्या हिंस्त्र वर्तनाचा हळूहळू त्याग करीत जाऊन मानवी वर्तन सुधारत गेले व ते सुसंस्कृत झाले. निसर्ग विज्ञानाविषयी सुशिक्षित होणे व सामाजिक दृष्ट्या सुसंस्कृत होणे यात फरक आहे. सुशिक्षित माणूस हा सुसंस्कृत असतोच असे नसते. तसे असते तर सुशिक्षित माणसांनी सामाजिक गुन्हे केलेच नसते. सामाजिक सुसंस्कृतपणाचे मी तीन भाग पाडले आहेत. पहिला भाग हा उच्च श्रेणीचा स्वर्गीय भाग म्हणजे सुसंस्कृत भाग, दुसरा भाग हा मध्यम श्रेणीचा अर्ध स्वर्गीय व अर्ध नरकीय भाग म्हणजे असंस्कृत भाग व तिसरा भाग हा कनिष्ठ श्रेणीचा नरकीय भाग म्हणजे गुन्हेगारी भाग! यातील सुसंस्कृत भागाला प्रोत्साहन देण्याचे व असंस्कृत भागाचे नियंत्रण करण्याचे काम दिवाणी कायदा (सिव्हिल लॉ) करतो तर गुन्हेगारी भागाचे नियंत्रण करण्याचे काम फौजदारी कायदा (क्रिमिनल लॉ) करतो. आता हे तीन भाग पुढील तीन उदाहरणांसह स्पष्ट करतो. स्वैराचारी लैंगिक वृत्तीला लगाम घालून विवाह बंधनात राहणारी किंवा एकटे राहूनही स्वैराचार न करणारी माणसे सुसंस्कृत होत, विवाह करूनही जोडीदाराला फसवून विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणारी माणसे असंस्कृत होत व एखाद्याच्या इच्छेविरूद्ध लैंगिक बलात्कार करणारी माणसे गुन्हेगार होत. सामाजिक सुसंस्कृतपणा हा नरकापासून स्वर्गापर्यंतचा अत्यंत अवघड प्रवास असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण सुसंस्कृतपणा हा कधीही एकतर्फी असू शकत नाही, जसे प्रेम हे एकतर्फी असू शकत नाही. सुसंस्कृतपणाची मैत्री असंस्कृतपणाशी कधीही होऊ शकत नाही मग सुसंस्कृतपणाने गुन्हेगारीला जवळ करणे हा तर टोकाचा प्रश्न जो तेंव्हाच निर्माण होतो जेंव्हा सुसंस्कृतपणाच्या चांगुलपणाला हिंस्त्र गुन्हेगारीचे आव्हान निर्माण होते. मानव समाज हा सुसंस्कृत, असंस्कृत व गुन्हेगार अशा तीन वर्गात विभागला गेला आहे. तसे नसते तर मग दिवाणी कायद्याबरोबर फौजदारी कायद्याची गरज मानव समाजाला भासलीच नसती. वरील तीन वर्गात विभागल्या गेलेल्या मानव समाजात राहताना जशास तसे या धोरणाचा नाइलाजाने अवलंब करावा लागतो. या धोरणानुसार कधी कोमल तर कधी कठोर वागावे लागते. संपूर्ण सुसंस्कृतपणा असलेली आदर्श समाजव्यवस्था अजून खूप दूर आहे. अर्थात स्वर्ग अजून खूप लांब आहे.
-ॲड.बी.एस.मोरे©२६.९.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा