वेळ व शक्ती वाया चालली!
या फेसबुकवर मित्र असलेल्या मंडळींपैकी किती जण हाय प्रोफाईल श्रीमंत जीवन जगत आहात? मला वाटते आपण बहुतेक जण गरीब व मध्यमवर्गीय आहोत. आपल्या पैकी कोणाचा सेलिब्रिटी लोकांकडे असतो तसा ३००० चौ. फुटांएवढा किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाचा आलिशान बंगला, फ्लॅट व त्यासोबत तेवढेच मोठे कार्यालय मुंबईत आहे काय? आपण त्या लोकांएवढ्या चैनी करीत आहोत का? तसेच आपण त्यांच्या सारखे करमणूक नावाची चैन असलेल्या उद्योगधंद्यात सतत व्यस्त राहून लाखो, करोडो रूपये कमवत आहोत का? मला वाटते आपल्यापैकी कोणीच एवढे मोठे नाही आहोत. मग आपण का बरे या लोकांचे तथाकथित मोठे विषय उगाच चघळत बसलो आहोत? आपल्याला गेले पाच ते सहा महिने घरात कोरोना लॉकडाऊनने अडकवून ठेवले आहे. आपली रोजीरोटी सद्या पूर्ण बंद आहे. आपल्यापैकी काही माणसे घरी बसून कामधंदा नसल्याने तणावाने जग सोडून गेली आहेत. आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या या अत्यावश्यक विषयांना ही मोठी माणसे किती महत्व देतात? मग आपण त्यांच्या विषयांना एवढे महत्व का देत आहोत? आपण का बरे प्रभावित होत आहोत त्यांच्या विषयांनी? त्यांची तथाकथित मोठी कर्मे त्यांना तसलीच फळे देत असतील तर आपण आपल्यासाठी त्रासदायक असलेली ती फळे का चिवडीत बसलो आहोत? याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या डोळ्यांवर, कानांवर याच बातम्यांनी मिडियाकडून सतत होत असलेला वर्षाव! बघा बाबांनो, नीट विचार करा या गोष्टीचा की आपण आपला वेळ व आपली शक्ती या आपल्यासाठी त्रासदायक व निरर्थक असलेल्या गोष्टींवर वाया तर घालवत नाही आहोत ना?
-ॲड.बी.एस.मोरे©१०.९.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा