https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

आयुष्याच्या ओंजळीत निसर्गाचे दान?

आयुष्याच्या ओंजळीत विविधतेने नटलेल्या अवाढव्य निसर्गाचे काय आणि किती भरून घेणार?

निसर्गाचा प्रचंड मोठा पसारा हा विविधतेच्या अनेक तुकड्यांत विखुरलेला आहे. यातील एकेक तुकडाच इतका मोठा आहे की या सर्व तुकड्यांनी बनलेला निसर्ग प्रचंड मोठा झाला आहे. किती प्रकारचे विविध सजीव व निर्जीव पदार्थ आणि या पदार्थांच्या किती ज्ञान शाखा! बापरे, यातील काय म्हणून व किती उचलणार? निसर्गाने भरभरून दिले पण दुबळी मनुष्याची झोळी! ही झोळी खरं तर निसर्गानेच दुबळी बनविली आहे ओंजळीएवढे आयुष्य मनुष्याला देऊन! या छोट्याशा ओंजळीत काय आणि किती मावणार अवाढव्य निसर्गाच्या विविध तुकड्यांचे? उपाशी माणसाला जेवणाचे ताट न देता अन्नधान्याचे कोठार व मोठी फळबागच दान दिली तर तो काय आणि किती खाईल? एवढ्या मोठ्या प्रमाणातील हे अन्नपदार्थ बघून त्या माणसाला त्या पदार्थांविषयी नक्कीच वीट, किळस, मळमळ, तिटकारा निर्माण होईल.  म्हणून मग निसर्गातील किती गोष्टींच्या मागे लागायचे, त्यांचा किती लोभ करायचा अर्थात कुठे थांबायचे हे माणसाला कळले पाहिजे. तसे नाही कळले तरी निसर्ग थांबवतो! उदाहरणार्थ, उपाशी माणसाला खायला बिस्कीटचा मोठा पुडा दिला तर पहिले बिस्कीट खाताना त्याला जो आनंद मिळेल तो हळूहळू पुढील बिस्कीटे खाताना कमी कमी होत जाईल व पुढे पुढे तर बिस्कीट खाण्याची त्याची इच्छाच नष्ट होईल. अशा अती तृप्त अवस्थेला संपृक्तता म्हणतात. तृप्ती, समाधान अवस्था ठीक पण त्यापलिकडे असलेली अती तृप्ती, अती समाधानाची स्थिती  किळसवाणी होय. एखाद्या निवडक गोष्टीचा ध्यास घेऊन तिचा अभ्यास करणे वेगळे व त्या गोष्टीचा लोभ जडून तिचे वेड लागणे वेगळे! कुठे थांबायचे ही अक्कल माणसाला आली नाही तर ती अक्कल निसर्ग शिकवतो!

-ॲड.बी.एस.मोरे©२६.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा