https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

ओम फट स्वाहा (झपाटलेला)!

उलट संबंध (क्रॉस कनेक्शन) व विजोड संबंध (मिस मॕचिंग/इल मॕचिंग)!

(१) तुमच्या मनाची अंतःप्रेरणा (तुमचा आतला आवाज) व तुमच्या मनावर प्रभाव टाकणारे पर्यावरणातील बाह्य घटक (जसे सभोवतालची नैसर्गिक व सामाजिक परिस्थिती, तुमच्या आजूबाजूला घुटमळणारी व तुमच्यावर प्रभाव टाकणारी माणसे) यांची सुसंगती लागली नाही की तुमच्या मनात गोंधळ निर्माण होतो. इतकेच नव्हे तर या असंगतीमुळे तुम्हाला काही वेळा वेड लागण्याची पाळी येते. यातूनच मराठीत  "असंगाशी संग प्राण कंठी" अशी एक म्हण निर्माण झालीय.

(२) तसे प्रत्येकाला काहीना काहीतरी वेड असतेच (पूर्ण शहाणे असलेल्या लोकांनी मला कृपया या वाक्याबद्दल माफ करावे). मला तर मंत्रचळ हा मानसिक आजार खूप दिवसांपासून आहे. मंत्रचळाला इंग्रजीत ओसीडी म्हणजे अॉब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसअॉर्डर म्हणतात. परिपूर्णतेच्या (परफेक्शनच्या) हट्टातून मला हा आजार लागला. यात केलेली गोष्ट नीट झालीय की नाही हे पुन्हा पुन्हा तपासून घेण्याची मनाला सवय लागते. अती व्यवस्थितपणाची माझी ही सवयच ओसीडीमध्ये रूपांतरीत झालीय हा माझा स्वतःचा कयास! कारण मी कोणत्याही मानसतज्ज्ञाकडे याची चौकशी करायला गेलो नाही. माझे मन मानसिकदृष्ट्या ९५% तंदुरूस्त आहे. त्याच्या जोरावर मला त्रास देणाऱ्या या ५% ओसीडीवर मी स्वतःच मात केलीय. मला भीती आहे की या ५% ओसीडीवर मोठा विजय मिळविण्यासाठी मानसतज्ज्ञाने लिहून दिलेल्या गोळ्या घ्यायचो व माझ्या मनाची ९५% ताकद घालवून बसायचो.

(३) मनाला त्रास देणारी दुसरी गोष्ट म्हणजे काम करता करता मन मध्येच रिकामे (ब्लॕन्क) होणे किंवा शून्यात जाणे. हायकोर्टात वकिली करताना सिनियर वकिलांकडून मी एखादी केस नीट समजावून घेताना मध्येच ब्लॕन्क व्हायचो. सिनियर वकील बोलत रहायचे आणि मी मात्र काही क्षण शून्यात गेलेलो असायचो. सिनियर वकिलांच्या लक्षात ही गोष्ट आली की ते बाजूला बसलेल्या इतर वकिलांना म्हणायचे "गेला, हा आता स्वर्गात गेला"! मग काही वेळाने मी पुन्हा भानावर यायचो व सिनियर वकिलांची माफी मागून म्हणायचो "सर सॉरी, लिंक तुटली". मग वैतागून ते सिनियर वकील मला म्हणायचे की, "माझ्या ओळखीचे एक चांगले मानसतज्ज्ञ आहेत, त्यांना दाखवून एक गोळी चालू करू व मग तुझा हा त्रास दूर होईल". तेंव्हा त्या तरूण वयातही मी पटकन बोलायचो "सर, फक्त तेवढे सोडून बोला, मी मध्येच ब्लॕन्क झाल्यावर तुम्ही सुद्धा प्लिज थोडा पॉज घ्या व मग पुढे आपण आपली केसची गाडी सुरू करू"! ते ऐकून माझे ते सिनियर हसायचे व गंमतीने म्हणायचे की "घेतो बाबा तुझ्यासाठी पॉज, कारण तू स्वतःचेच खरे करणार, हटयोगी आहेस तू"!

(४) हल्ली या कोरोना लॉकडाऊनच्या काळात अधूनमधून मला वेडाचे सौम्य झटके येतात. मी कधीही झोपतो, कधीही ऊठतो, कधीही खातो. माझ्या दिनचर्येला काहीच ताळमेळ राहिला नाही. कधीकधी झोप लागल्यावर चित्रविचित्र स्वप्ने पडतात. असेच एक स्वप्न मला हल्लीच पडले. एके दिवशी माझी कोरोना टेस्ट केली जाते व मग माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येतो. मग एका रूग्णालयात मला ॲडमिट केले जाते. तिथे माझ्यावर काहीतरी उपचार केले जातात. मी तिथे कसल्या तरी गोळ्या खातो. दोन दिवसांनी मी धाप टाकू लागतो. मला श्वास घ्यायला फार त्रास होऊ लागतो. मग मी श्वास अडकून मरतो. त्यानंतर माझ्या मृतदेहाला प्लास्टिकमध्ये गुंडाळून पांढऱ्या कपड्यातील काहीजण ॲम्ब्युलन्समधून एका स्मशानभूमीत घेऊन जातात. पण माझा मृतदेह ॲम्ब्युलन्स मध्ये चढवण्यापूर्वी माझी बायको व मुलगी रूग्णालयाच्या डॉक्टर्स व नर्सेसला गयावया करून रडत रडत सांगतात की एकदा तरी माझे तोंड त्यांना बघू द्या. पण त्या दोघींना सरळ बाजूला करून माझा मृतदेह अॕम्ब्युलन्स मधून त्या भयाण स्मशानभूमीत नेला जातो. माझा तो मृतदेह दोन माणसे स्ट्रेचर वरून विद्युतदाहिनीत ढकलतात. मी आत गेल्यावर अगोदरच विद्युत दाहिनीत पेटलेल्या आगीच्या ज्वाळांनी माझा मृतदेह लपेटला जाऊन तो जळू लागतो. अशी भयानक स्वप्ने मला अधूनमधून हल्ली पडतात. याचे कारण म्हणजे टी.व्ही. व वृत्तपत्रातील कोरोना संदर्भातील सातत्याने चालू असलेल्या भीतीदायक बातम्यांचा भडीमार!

(५) काल मी दुपारी २ ला झोपलो तो रात्री ९ लाच उठलो. म्हणजे सलग ७ तास निवांत झोप. पण झोपेची वेळ विचित्र. मग अंघोळ वगैरे करून रात्री ११ वाजता चहा नाष्टा केला. मग रात्री ११ ते पुन्हा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत जागणे. सगळे विचित्र चाललेय. त्यातच काल पुन्हा झोपेतच आणखी एक विचित्र स्वप्न मला पडले. मागे मी महेश कोठारे यांचा झपाटलेला हा चित्रपट पाहिला होता. त्यात भुताचा आत्मा घेऊन फिरणारे एक बाहुले दाखवलंय. ते काही लोकांच्या छातीवर बसून हृदयाला गुदगुल्या करायचे. काल झोपेत पडलेल्या माझ्या स्वप्नात तेच तात्या विंचू भुताचे बाहुले आले व माझ्या छातीवर बसून मला गुदगुल्या करू लागले. मी जाम घाबरलो. छातीच्या खालीच माझे हृदय असल्याने ते हृदय जोरात धडधडू लागले. मी घामाने ओलाचिंब झालो. त्या स्वप्नाने मी इतका घाबरलो की जागाच झालो. त्यानंतर नीट उठून बसल्यावर नीट विचार केला की हे स्वप्न खरे असायला हवे होते. म्हणजे मी हृदयाला झटका बसून पटकन मेलो असतो. त्या कोरोनाच्या संसर्गाने मरून प्लास्टिकमध्ये जळण्यापेक्षा हे सहज मरण किती उत्तम! खरंच मला काही माणसे झोपेतच मरतात त्यांचा हेवा वाटतो. असेच मरण मला दे म्हणून मी परमात्म्याला हल्ली प्रार्थना करीत असतो.

(६) या लेखाचा सार काय की, आयुष्यात कधी कोणाशी क्रॉस कनेक्शन किंवा मिस मॕचिंग संबंध निर्माण झाले की अशा कुसंगतीतून प्राण कंठाशी येतात. मग "नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे" हे मराठी गीत गुणगुणत रहावे असे वाटू लागते. या २०२० साली आपल्या सगळ्यांचेच कोरोनाशी असे क्रॉस कनेक्शन लागून प्राण कंठाशी आणणारे मिस मॕचिंग संबंध निर्माण झाले आहेत असे मला वाटते!

-ॲड.बी.एस.मोरे©८.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा