व्यवहार ज्ञान घेऊन व्यवहारी बना!
अन्न, वस्त्र, निवारा ही मनुष्याच्या जीवनावश्यक गरजा भागविणारी मूलभूत साधने! ही साधने निसर्गात कच्च्या स्वरूपात सापडतात. म्हणजे जमीन, हवा, पाणी व सूर्यप्रकाश यांच्या सोबत नैसर्गिक बी बियाणे या गोष्टी निसर्गात फुकट सापडतात ज्यातून अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत साधनांची पक्क्या स्वरूपात निर्मिती करता येते. म्हणजे निसर्ग माणसाला कच्चे भांडवल फुकट पुरवतो. त्याबदल्यात निसर्गाला हवे असतात ते माणसाचे बौद्धिक व शारीरिक श्रम. मानवी श्रम व निसर्गाकडून मिळणारे फुकटचे कच्चे भांडवल यांच्यात भौतिक व्यवहाराची देवाणघेवाण होत असते व ती व्यावहारिक देवाणघेवाण नैसर्गिक असते ज्यात व्यवहार असतो. निसर्गाबरोबरचा हा मूलभूत भौतिक व्यवहार पार पाडल्यानंतर पुढे सुरू होते ती आंतरमानवी व्यावहारिक देवाणघेवाण व या देवाणघेवाणीचे सामाजिक माध्यम असते तो म्हणजे पैसा. आंतरमानवी भौतिक व्यवहार हा मुख्यत्वे पैशाच्या माध्यमातून होतो. निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार व माणूस व माणूस यांच्यातील पूरक भौतिक व्यवहार यांचे नियमन दोन कायद्यांकडून होते ते म्हणजे निसर्गाचा मूलभूत नैसर्गिक कायदा व मानव समाजाचा पूरक सामाजिक कायदा. मानवी जीवन टिकून राहण्यासाठी स्री व पुरूष यांच्यातील लैंगिक पुनरूत्पादन हा सुद्धा निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार होय. कारण स्त्री व पुरूष निसर्गानेच निर्माण केले आहेत व त्यांच्यात लैंगिक वासना ही सुद्धा निसर्गानेच निर्माण केली आहे म्हणजे कच्चे भांडवल हे निसर्गानेच पुरवले आहे. या कच्च्या भांडवलावर होणारा स्त्रीपुरूषातील लैंगिक व्यवहार हा निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार होय. पण याच निसर्ग प्रेरित मूलभूत भौतिक व्यवहारातून मानव समाजाची निर्मिती झाली. मग पुढे या मूलभूत भौतिक लैंगिक व्यवहाराचे सामाजिक नियमन करणे गरजेचे झाले. त्यातून वैवाहिक संबंध यासारखे पूरक भौतिक व्यवहार निर्माण झाले व मग या पूरक भौतिक व्यवहारांचे नियमन करण्यासाठी त्याप्रकारचे पूरक सामाजिक कायदे निर्माण झाले. निसर्गाचा मूलभूत भौतिक कायदा काय किंवा समाजाचा पूरक भौतिक कायदा काय हे कायदे निसर्ग व माणूस व त्याबरोबर माणूस आणि माणूस यांच्यातील भौतिक व्यवहारांचे अर्थात भौतिक व्यावहारिक देवाणघेवाणीचे नियमन करतात. या भौतिक व्यवहारांत जे काही देवाचे अध्यात्म घुसले आहे ते आभार प्रदर्शनाचे अध्यात्म आहे म्हणजे निसर्गाकडून मनुष्याला जे आयते, फुकट कच्चे भांडवल मिळते त्याबद्दल निसर्गराजा किंवा निसर्गातील देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे अध्यात्म आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. पण शेवटी या सगळ्याच्या पाठीमागे निसर्गाचा भौतिक व्यवहार आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून व्यवहार ज्ञान घेऊन व्यवहारी बना!
-ॲड.बी.एस.मोरे©२७.९.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा