https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

मुंबई लोकलसाठी मनसे आंदोलन!

मुंबई लोकल रेल्वे चालू करण्यासाठी मनसेचे अनोखे सविनय कायदेभंग आंदोलन!

आज सोमवार दिनांक २१ सप्टेंबर, २०२० च्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांच्या मनातील खळबळ उघड करून मुंबई लोकल रेल्वे चालू करण्यासाठी सविनय कायदेभंगाचे अनोखे आंदोलन केले. मनसे पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी आज फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच चालू ठेवलेल्या मुंबई लोकल ट्रेन्समधून विनापरवानगी प्रवास करून व काही ठिकाणी शांततामय मार्गाने तो प्रयत्न करून महात्मा गांधीच्या मार्गाने सत्याग्रह केला व अन्यायकारक कायद्याच्या विरोधी सविनय कायदेभंग करण्याच्या महात्मा गांधीनी आम्हा भारतीयांना शिकवलेल्या मार्गाचा छान अवलंब केला. खरं तर, मनसेच्या खास खळ्ळ खट्याक स्टाईल आंदोलन करण्याच्या पद्धतीला बाजूला करणारे मनसेचे हे आंदोलन खरंच कौतुकास्पद आहे. एक वकील म्हणून मी या प्रश्नावर माझे कायदेशीर मत यापूर्वीच्या माझ्या दोन फेसबुक पोस्टसने जाहीरपणे मांडले होते. तसेच मी मा. राजसाहेब ठाकरे यांचा मनसे चाहता असल्याने या दोन्ही पोस्टस मी मनसेच्या फेसबुक पेज/  ग्रूप्सवर टाकल्या होत्या. माझी ती हाक मनसे नेतृत्वापर्यंत कुठेतरी पोहोचली असावी. तसेच मनसेने या प्रश्नावर जो जाहीर सर्व्हे घेतला होता त्यातही मी माझे मत हेच मांडले होते की आता बस्स झाले, लोकल ट्रेन्स चालू करा. लोकांनीही या मनसे सर्व्हेला भरभरून प्रतिसाद देऊन माझ्या मताप्रमाणेच मते मांडली होती. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे मनसेचे आजचे हे अनोखे सविनय कायदेभंग आंदोलन! मी स्वतः वकील असल्याने या आंदोलनात सामील झालो नाही. परंतु या आंदोलनातील मनसे मागणी ही पूर्णपणे कायदेशीर असल्याने माझा तिला पूर्ण  म्हणजे १००% जाहीर पाठिंबा आहे. या मनसे मागणीत कोणता कायदा दडला आहे हे जर कोणाला समजून घ्यायचे असेल तर त्यांनी  माझे याविषयी लिहिलेले पूर्वीचे दोन फेसबुक लेख जरूर वाचावेत जे मी याखाली पुनःप्रसिद्ध करीत आहे. मला आशा आहे की, मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाची सरकार योग्य ती दखल घेईल व मुंबई लोकल प्रवास योग्य त्या नियमांनुसार सर्वसामान्यांसाठी लवकरच निदान या महिनाअखेर तरी खुला करील.

जय महाराष्ट्र! जय मनसे!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.९.२०२०

लोकल ट्रेन्स सरकारने चालू केल्यावर लोक शारीरिक अंतर कसे राखतील?

हा प्रश्न "हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो" या माझ्या पूर्वीच्या पोस्टवर बऱ्याच लोकांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे गांभीर्य आहेच. कारण मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे तूफान गर्दी व दरवाज्याला लटकत जाणे. पण किती दिवस आपण असेच घरी बसणार? आपल्याला आता कोरोनाचे गांभीर्य कळले आहे. आता कामासाठी घराबाहेर पडल्यावर तोंडाला मास्क लावणे, सॕनिटायझरची छोटी बाटली जवळ ठेवणे व शारीरिक अंतर ठेऊन चालणे, प्रवास करणे ही काळजी आपल्यालाच  घ्यायला हवी. जे घेणार नाहीत त्यांना कोरोना चिकटेल. सरकार यात काय करणार? सगळ्या गोष्टी सरकारवर ढकलून देणे सोडले पाहिजे. गर्दी टाळून शिस्तीने लोकल ट्रेनमध्ये चढले पाहिजे. आपण मास्क लावायला आता शिकलो आहोत. आता लोकलचा प्रवास शारीरिक अंतर राखून शिस्तीने कसा करायचा हेही कोरोना आपल्याला शिकवेल. माणसे उपाशीपोटी मरण्यापेक्षा थोडा धोका स्वीकारून आपल्याला आता कामासाठी घराबाहेर पडावेच लागेल. म्हणूनच लोकल ट्रेन्स लवकर चालू करा असा माझा सरकारकडे आग्रह आहे. आपणास माझे हे म्हणणे पटत नाही का?

-ॲड.बी.एस.मोरे©५.९.२०२०

टीपः

माझा या विषयावरील पूर्वीचा लेख पुन्हा एकदा वाचा. तो खालीलप्रमाणेः

हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

मी वकील असलो तरी मीही बौद्धिक कष्ट करतो. व्यावसायिक आहे म्हणून मी कष्टकरी नाही असे कृपया समजू नका व मला कष्टातून वगळू नका. कामगारापेक्षा दयनीय अवस्था झालीय माझी. गेले पाच ते सहा महिने झाले एक पैशाची कमाई नाही वकिलीतून. घरीच बसलोय आतून लॉक लावून कारण बाहेर लॉकडाऊन आहे. मला मुंबईला जायचे आहे कमाई करायला. कृपया लोकल ट्रेन्स चालू करा. सर्वांनी असा जोर लावा की सरकारला उपाशी पोटाची जाणीव झाली पाहिजे. मी लोकल ट्रेन मधून तोंडाला स्वच्छ मास्क लावून व खिशात सॕनिटायझरची छोटीशी बाटली ठेऊन व शारीरिक अंतर राखून प्रवास करीन. पापी पेट का सवाल है. हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

या पोस्टचा अर्थ एवढाच की नियमांत बसवून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा. गर्दीचे नियोजन व सोशल डिस्टसिंग, मास्क, रेल्वे स्टेशन्सवर सॕनिटायझर सोय या सर्व गोष्टी नियमांत बसवायला हव्यात व मग लोकल सुरू करायला हवी. पण याला आणखी किती वेळ लावणार? सरकार काय कोर्टाशिवाय जागे होत नाही काय? आपण आवाज नाही निदान चुळबूळ तरी करायला हवी की नको. ऊठसूठ रिट रिट! त्या न्यायालयीन आदेशांना अर्थच उरणार नाही पुढे अशाने. आपण कोरोनावर लस येईपर्यंत  दोन चार वर्षे घरीच घाबरून बसू शकत नाही. आताही धोका स्वीकारून कामाला जाणारी माणसे आहेतच ना. काय करतील बिच्चारी! घरी उपाशी मरण्यापेक्षा काळजी घेऊन कामाला गेलेले बरे हाच विचार करून ती बाहेर पडलीत. काय  करायचेय त्या बसेसना घेऊन? बदलापूर, कल्याण, डोंबिवलीचे चाकरमानी दीड तासाचा मुंबई लोकल प्रवास काय बसने एवढया लांबून करणार? लाखो लोकांना घेऊन जाणारी लोकल. किती बसेस आहेत सरकार कडे लाखो लोकांना ६० ते ७० कि.मी. लांब अंतरावरून मुंबईला घेऊन जायला? लोकलला पर्याय नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा