https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १८ जून, २०२४

जीवघेणी स्पर्धा!

अबब, केवढी ही लोकसंख्या वाढ व केवढी मोठी ही जीवघेणी स्पर्धा!

महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरतीत १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज म्हणजे एका जागेसाठी सरासरी १०१ अर्ज, यातील ठाणे पोलीस दलातील ८०५ जागांसाठी ४६ हजारांहून अधिक अर्ज म्हणजे सरासरी प्रत्येक एका जागेसाठी ५७ अर्ज अशी लोकसत्ता दिनांक १८ जून २०२४ ची बातमी वाचून डोके गरगर फिरले. हे फक्त राज्यातील पोलीस दलातील भरती स्पर्धेचे चित्र. भारतात इतरत्र किती भयंकर परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. आणि काही महान लोक योगासने, मनःशांती प्रयोगांच्या क्लासेसची जाहिरात करीत आहेत. इथे हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळण्याची भ्रांत आणि म्हणे योगासने करा, मनःशांती मिळवा? आजूबाजूला आग लागलेली असताना मनःशांती कशी मिळेल? हल्लीची मुले, मुली याच जीवघेण्या स्पर्धेने निर्माण केलेल्या तणावाखाली जगत आहेत. परीक्षेत थोडे जरी गुण कमी पडले तरी नैराश्येने आत्महत्या करीत आहेत. असली भयानक परिस्थिती आजूबाजूला असताना असल्या संघर्षाला सामोरे जाण्याची गरज नसणारे काहीजण मजा करीत आहेत. खरं तर चैनीचे जीवन जगणाऱ्या लोकांनाच योगासने, मनःशांती वगैरे गोष्टींची गरज आहे. उपाशी राहणाऱ्या, भयानक वास्तव परिस्थितीने निर्माण केलेल्या तणावाखाली जगणाऱ्या लोकांना कसले योगासन आणि कसली मनःशांती? चैनीत जगणाऱ्या काही लोकांनी या गोष्टी खुशाल कराव्यात पण इतरांना या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करू नये.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा