https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २५ जून, २०२४

संथ जीवन योग!

संथ जीवन योग!

महापूरात रौद्र स्वरूप धारण करून जोरात वाहणारी नदी किंवा सुनामी आणणारा रौद्र समुद्र कोणाला आवडेल? हिंस्त्र प्राणी असोत की माणसे सर्वसाधारणपणे सजीव सृष्टी अशांत, रौद्र वातावरण नाकारते व संथ, शांत जीवन स्वीकारते. खरं तर संथ व शांत जीवन हाच सृष्टीतील प्रत्येक जिवाचा मूलभूत नैसर्गिक हक्क आहे. मूलभूत हक्काच्या मोठमोठया गप्पा मारणारा, त्यावर तावातावाने वादविवाद करणारा माणूस मात्र या हक्कावर स्वतःच्या  हव्यासी करणीने गदा आणतोय.

माणसाला निसर्गाने सारासार विचार करण्याची बुद्धी दिलीय ना मग ही बुद्धी गहाण ठेवून माणसाने त्याची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात का वाढवली हा पहिला प्रश्न व मुद्दाही. या वाढलेल्या लोकसंख्येचे वाईट परिणाम म्हणजे जगण्यासाठी प्रचंड प्रमाणात वाढलेली स्पर्धा. मग या स्पर्धेने जीवनात निर्माण केलेली घाईगर्दी. श्वास कोंडून टाकणारी गर्दी व या गर्दीची पळा पळा कोण पुढे पळे तो ही घाई. 

माणसाचे आयुष्य ते केवढे पण त्याने केवढा मोठा पसारा वाढवून ठेवलाय तथाकथित विकासाचा. कसला विकास? मूठभर लोकांच्या चैनीचा विकास व त्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर धावणारी सर्वसामान्य लोकांची गर्दी. याच गर्दीचे मूठभर श्रीमंत भांडवलदार मंडळींकडून शोषण केले जाते व धूर्त राजकारणी मंडळींकडून भूलथापा देऊन गोल फिरवले जाते व गोल फिरवून पुन्हा या गर्दीला तिच्या मूळ स्थितीवर आणून सोडले जाते. सर्वसामान्य माणसाच्या शारीरिक व बौद्धिक कष्टाची किंमत कोण ठरवणार तर हे मूठभर भांडवलदार व त्यांच्याशी खाजगी भागीदारी करणारे धूर्त राजकारणी. मी साम्यवाद किंवा भांडवलवाद या दोन्ही वादांचा पुरस्कर्ता नाही. 

मी संथ जीवन योग या मूलभूत हक्काची पाठराखण करणारा हाडाचा वकील आहे व हा हक्क जो कायदा देऊ शकतो त्या कायद्याचा पुरस्कर्ता आहे. माझी वकिली मी याच मूलभूत हक्कासाठी मर्यादित ठेवली. मला बाहेर ही क्रांती करणे शक्य झाले नाही. पण निदान स्वतःपुरती तरी मी ही क्रांती केली. त्यासाठी मी, पत्नी व मुलगी असे छोटे कुटुंब निर्माण केले व आमच्या कौटुंबिक गरजा मर्यादित केल्या, चैनीचे तर नावच नाही. या मर्यादित जीवन जगण्याला कुटुंब सदस्यांकडून मोलाची साथ लाभली व म्हणून ही वैयक्तिक क्रांती शक्य झाली. हेच मर्यादित जीवन, हेच अध्यात्म व हाच संथ जीवन योग मी आयुष्यभर जगलो व जगत आहे. 

मूठभर भांडवलदार व राजकारणी मंडळींना त्यांच्या चैनबाज संकुचित जीवन विकासासाठी सर्वसामान्य माणसांची धावणारी गर्दी हवी आहे हे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीला कधी कळणार? जीव गुदमरून टाकणारी गर्दी व जोरात धाव धाव धावायला लावणारी जीवघेणी स्पर्धा या भयानक चक्रात सर्वसामान्य माणूस सापडलाय. या माणसाला संथ जीवन योगाची आवश्यकता आहे कारण असे संथ व शांत जीवन हाच त्याचा मूलभूत नैसर्गिक हक्क आहे. हा हक्क डावलणारे कोण हे कळण्यासाठी सामान्य माणसाला थोडे तरी अंतर्मुख व्हावे लागेल. आयुष्यात येऊन गर्दीचा भाग बनून रहायचे व त्या गर्दीबरोबर घाईघाईत धाव धाव धावायचे याला जीवन म्हणत नाहीत. असल्या जीवनावर का शतदा प्रेम करावे? गर्दीचे, घाईचे जीवन म्हणजे अशांत व अस्थिर जीवन. हे असले जीवनच मानसिक आजारांचे मूळ कारण आहे. यातून सामान्य माणूस लवकर बाहेर पडो व त्याला संथ जीवन योगाचा आनंद मिळो व शांती लाभो हीच माझी सदिच्छा! 

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा