औपचारिक वाढदिवस शुभेच्छा मला नकोशा वाटतात!
सर्वसामान्य माणसाचा वाढदिवस साजरा होऊन होऊन तरी कसा साजरा होणार तर घरातील कुटुंब सदस्य आपुलकीने केक आणणार व तो घरातच कापणार व नंतर सर्व मिळून एखाद्या साध्या हॉटेलात जेवायला जाणार. काही मंडळी मात्र हॉटेल मालकाची आगाऊ परवानगी घेऊन हॉटेलातच केक कापतात व नंतर तिथे जेवतात. केक कापणे ही वाढदिवस साजरा करण्याची इंग्रजी पद्धत. तसे पाहिले तर घरात पुरणपोळी, श्रीखंड किंवा बासुंदी पुरी हे गोड जेवण केले तर ते केक पेक्षा कितीतरी भारी. पण हल्ली बहुतेक सर्वांना तो केकच आवडतो.
खरं तर वाढदिवस साजरा करणे हे सेलिब्रिटी लोकांनाच शोभते. सगळा झगमगाट असतो तिथे. पण म्हणून काय सर्वसामान्यांनी वर्षातून फक्त एकदाच येणारा त्यांचा वाढदिवस साजरा करू नये?
पण माझा मुद्दा दुसराच आहे व तो म्हणजे कुटुंबाबाहेरील लोकांच्या वाढदिवस शुभेच्छांचा. ही शुभेच्छा देणारी मंडळी वर्षभर एकमेकांचे तोंडही बघत नाहीत. पण नेमकी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी पुढे येतात. काही लोकांच्या तर हेही नशिबी नसते म्हणा. सर्वसाधारण अनुभव असा आहे की सदनिकांच्या सोसायटीत राहणारी माणसे वर्षभर समोरून गेली तरी एकमेकांशी कधी आपुलकीने बोलत नाहीत. पण सोसायटीच्या वार्षिक कार्यक्रमात मात्र औपचारिक गप्पागोष्टी करतात व कार्यक्रम संपला की पुन्हा वर्षभर येरे माझ्या मागल्या. सर्वसामान्य माणसाच्या वाढदिवसाचेही तसेच आहे. वर्षभर कधी फोन करून आपुलकीने न बोलणारी माणसे (त्यांना जर वाढदिवसाची तारीख माहित असेल तर) वाढदिवसाला मात्र फोन करून किंवा व्हॉटसॲप संदेशातून औपचारिकपणे शुभेच्छा देतात. अशा औपचारिक वाढदिवस शुभेच्छा मला नकोशा वाटतात.
-©ॲड.बी.एस.मोरे, २७.६.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा