https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २६ जून, २०२४

दडपणाखाली जगताना!

दडपणाखाली जगताना!

जन्मापासून मरणापर्यंत माणूस जेवढा दडपणाखाली जगतो तेवढे दडपण घेऊन सृष्टीतील इतर कोणते सजीव जगतात? जंगलात ज्यांच्या डोक्यावर वाघ, सिंहाच्या जीवघेण्या हल्याची टांगती तलवार, भीतीची छाया सतत असते ते दुर्बल प्राणी सुद्धा माणसांनी स्वतःवरच निर्माण केलेल्या कृत्रिम दडपणांची भीती घेऊन जगत नसतात.  

माणसांनी माणसांवर लादलेल्या दडपणांची यादी शांतपणे विचार करून तयार करा. मी यालाच चिंतन व ध्यानधारणा म्हणतो. यात देवाला मध्ये आणायचे नाही. कारण ही ध्यानधारणा वेगळी आहे, हा योग वेगळा आहे. माणूस जन्मला की सुरूवातीची साधारण तीन वर्षे सोडली की बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा व महाविद्यालय (केजी टू पीजी म्हणजे किंडर गार्डन ते पोस्ट ग्रॕज्यूएट) असे शैक्षणिक अभ्यासाचे दडपण सुरू होते. हे दडपण दूर होते ना होते तोपर्यंत उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय करून आर्थिक कमाई करताना स्पर्धेत उतरून संघर्ष करण्याचे दडपण सुरू होते जे मरेपर्यंत चालू रहाते.

हे आर्थिक कमाईचे दडपण सुरू असताना मध्येच कुठून तरी सत्तेचा किडा डोक्यात वळवळू लागतो व त्यानंतर सुरू होते राजकारणाचे व राजकीय स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या राजकीय संघर्षाचे दडपण. ही सर्व दडपणे चालू असताना मध्येच विवाहाची हुरहूर लागते व माणूस लग्न करून मोकळा होतो. मग सुरू होते संसाराची मोठी जबाबदारी व या जबाबदारीतून निर्माण होणारे मुलांच्या शिक्षणाचे, ती बिघडू नयेत म्हणून त्यांना योग्य संस्कार देऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे दडपण, त्यांचे विवाह होऊन ती मुले आर्थिकदृष्ट्या पायावर सक्षमपणे उभी राहण्याचे व विवाह करून त्यांच्या संसारात स्थिर होण्याचे दडपण व इतर बरीच संसाराची दडपणे ज्यांची यादी संपता संपत नाही कारण माणूस आपल्या कुटुंबाविषयी फारच संवेदनशील असतो.

मानवी मनावरील दडपणांची यादी इथेच संपत नाही. भांडवलशाही शोषणाचे दडपण, वेळेचे दडपण, लोक काय म्हणतील याचे दडपण, समाजाने लादलेल्या अनेक धर्मांचे व त्या धर्मांतील आंतरधर्मीय विवाद, धार्मिक युद्धांचे दडपण, सांस्कृतिक रूढी, परंपराचे दडपण, समाजातील वर्णव्यवस्था, जातीपातींचे दडपण, वंशवाद, प्रांतवाद,भाषावाद यांचे दडपण, अंधश्रद्धा फेकून देताना अंधश्रद्ध लोकांच्या रागाचे दडपण, किचकट समाज कायद्याचे दडपण, बाहेर फिरताना खिशातील पैशाचे पाकिट कोणीतरी मारणार नाही ना, आपला मोबाईल फोन कोणीतरी पळवून तर नेणार नाही ना हे दडपण, रस्ता ओलांडताना एखादे वाहन सिग्नल तोडून अंगावरून तर जाणार नाही ना या भीतीचे दडपण, एखाद्या भिकाऱ्याला भीक दिली नाही तर परोपकार, करूणेच्या भावनेतून चुकल्याची भावना मनात निर्माण होते त्या भावनेचे दडपण, अहो इतकेच काय घरातील गॕस, लाईट, पाणी यांच्या बटणांचे दडपण. बटण नीट लागलेय ना, शाॕर्ट सर्किट, गॕस स्फोट होणार नाही ना, पाणी फुकट वाया जाणार नाही ना, ही भीतीयुक्त दडपणे घरातही चालूच असतात. वर पुन्हा नैसर्गिक आपत्ती, आजार यांचे दडपण चालूच असते. परमेश्वराचे ध्यान करून, योगासने करून ही दडपणे बिलकुल दूर होत नाहीत हे वास्तव आहे.

ही दडपणे (मी इथे लिहिलेल्या या कृत्रिम दडपणांची यादी अपूर्ण आहे) कृत्रिम म्हणजे मानवनिर्मित आहेत. यात नैसर्गिक दडपणाचा भाग फार थोडा आहे. नीट विचार केला तर कळेल की, ही मानवनिर्मित कृत्रिम दडपणे माणूस सोडून सृष्टीतील इतर कोणत्याही सजीवाला नाहीत. ही कृत्रिम दडपणे झुगारून देऊन खऱ्या स्वातंत्र्याचा व खऱ्या मुक्तीचा आनंद माणसाला त्याच्या आयुष्यात ठरवूनही मिळत नाही कारण ही दडपणे मानवी मनावर मरेपर्यंत चालूच राहतात. या सर्व दडपणांची ओझी आयुष्यभर डोक्यावर घेऊन जगणाऱ्या माणसाच्या सहनशक्तीची कमालच म्हणायची! 

-©ॲड.बी.एस.मौरे, २६.६.२०२४

वि.सू./टीपः

"दडपण, आता विराम आत्महत्येला" या मराठी चित्रपटाची प्रतिमा माझ्या या लेखाला केवळ प्रातिनिधीक चित्र म्हणून लावलेली आहे. हा चित्रपट मी बघितलेला नाही व त्याचा माझ्या या लेखाशी काहीही संबंध नाही. जर या चित्रपटातील सामाजिक संदेश माझ्या लेखातील काही भागाशी जुळत असेल तर तो केवळ एक योगायोग समजावा. दडपण चित्रपट निर्मात्याच्या कलात्मक प्रतिमेवरील स्वामीत्व हक्क (कॉपीराईट) माझ्या प्रातिनिधीक कृतीने बाधित होत नाही. तरी सामाजिक कर्तव्य म्हणून त्या निर्मात्याविषयी सौजन्य व्यक्त करतो.

-ॲड.बी.एस.मोरे, २६.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा