https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १६ जून, २०२४

निसर्गाचे मेंदूमन हीच निसर्गाची वैज्ञानिक व आध्यात्मिक महाशक्ती?

निसर्गाचे मेंदूमन हीच निसर्गाची वैज्ञानिक व आध्यात्मिक महाशक्ती?

मानवी शरीर अनेक अवयवांनी बनले आहे. या सर्व अवयवांत मेंदू हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रमुख अवयव आहे. या प्रमुख अवयवाला माहिती पुरवणारे डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा हे पाच अवयव मेंदूसाठी ज्ञान गोळा करणारे अवयव असल्याने त्यांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. त्यानंतर हृदय, किडनी यासारखे महत्वाचे अवयव येतात व नंतर इतर अनेक अवयव येतात. या सर्व अवयवांची मिळून शरीर व्यवस्था बनली आहे. शरीराचा मेंदू हा प्रमुख अवयव पाच ज्ञान अवयवांकडून/ज्ञानेंद्रियांकडून  मिळालेल्या माहितीच्या आधारावर शरीराच्या संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो.

मानवी शरीर अवयवांच्या शरीर व्यवस्थेचा धागा पकडून निसर्ग हे प्रचंड मोठे शरीर आहे असे मानले व ग्रह, तारे, इतर पदार्थ यांना या शरीराचे अवयव मानले तर मग या अवयवांची निसर्ग व्यवस्था समोर येते. आता पुढील महत्वाचा प्रश्न हा की या निसर्ग व्यवस्थेचे नियंत्रण करणारा निसर्गाचा मेंदू हा प्रमुख निसर्ग अवयव कुठे शोधायचा? त्यासाठी निसर्ग शरीराचे डोके व या डोक्याची कवटी शोधावी लागेल. कारण या कवटीतच निसर्गाचा मेंदू असणार.

मानवी शरीराचा मेंदू हा प्रमुख अवयव हा या शरीराचा एक मांसल भाग आहे जो माणसाच्या डोक्याच्या कवटीत असतो. मेंदू नावाच्या या मांसल भागाची पेशी, रासायनिक व विद्युत रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. मेंदू नावाच्या मांसल भागाच्या या गुंतागुंतीच्या रचनेतच मानवी मन असते. हे मेंदूमन म्हणजे सूक्ष्म मानसिक शक्तींचे गुंतागुंतीचे जाळे आहे ज्याची एक विशिष्ट कार्यशैली आहे.

निसर्गाचे डोके, त्या डोक्याची कवटी व त्या कवटीतील निसर्गाचा मेंदू सापडल्याशिवाय त्या निसर्ग मेंदूची रचना, त्या रचनेतील निसर्गाचे मेंदूमन व त्या मेंदूमनाची कार्यशैली कशी कळेल? निसर्गाच्या मेंदूमनाची कार्यशैली दोन प्रकारची आहे का? म्हणजे एक वैज्ञानिक कार्यशैली व दोन आध्यात्मिक कार्यशैली? तसे असेल तर वैज्ञानिक कार्यशैलीच्या भागाचे नामकरण निसर्ग मन व आध्यात्मिक कार्यशैलीच्या भागाचे नामकरण निसर्ग आत्मा (परमात्मा) असे करावे का? मानवी मनाचे सुद्धा दोन भाग आहेत. ते म्हणजे तार्किक मन (लाॕजिकल माईंड) व भावनिक मन (इमोशनल माईंड). तशीच काहीशी विभागणी निसर्ग मनाची असेल का? म्हणजे निसर्ग मनाचा एक भाग हा वैज्ञानिक भाग व निसर्ग मनाचा दुसरा भाग हा आध्यात्मिक भाग? मग माणसांनी एका बाजूने निसर्ग विज्ञानाच्या माध्यमातून निसर्ग मनाच्या वैज्ञानिक भागाचा सराव (प्रॕक्टिस) व दुसऱ्या बाजूने अध्यात्म धर्माच्या माध्यमातून निसर्ग मनाच्या आध्यात्मिक भागाचा सराव (प्रॕक्टिस) करावा का? निसर्गाचे मेंदूमन हीच निसर्गाची वैज्ञानिक व आध्यात्मिक महाशक्ती असे मानावे का?

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा