https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १८ जून, २०२४

तथ्ये व मिथके यांच्या संगतीत!

तथ्ये व मिथके यांच्या संगतीत जगणारा माणूस!

मानवी मेंदू निसर्गाने असा बनवलाय की तो जन्मापासून मरेपर्यंत विद्यार्थी राहतो. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावस्थेत सर्व माणसांची ज्ञान शाळा सर्वसाधारणपणे एकच असते पण त्यानंतर पुढे महाविद्यालयीन व त्यापुढेही उच्च शिक्षणावस्थेत या ज्ञानशाळा निसर्गाच्या विविध ज्ञान शाखांनुसार बदलतात.

उच्च शैक्षणिक ज्ञानशाळांतून प्राप्त केलेल्या विविध ज्ञान शाखांतील विशेष ज्ञानानुसार माणसांच्या कार्यशाळाही विज्ञान संशोधन क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र, कायदा क्षेत्र, व्यवस्थापन क्षेत्र अशा बदलतात. जी माणसे उच्च शिक्षण घेत नाहीत अशा अल्पशिक्षित माणसांना एकतर सगळ्या कार्यशाळांतून कामगार, कारकून म्हणून काम करावे लागते किंवा त्यांच्याकडे नेतृत्व गुण असेल तर त्यांच्यासाठी राजकारणाची कार्यशाळा खुली असते व इतर काही अल्पशिक्षितांना कला, क्रीडा या कार्यशाळा खुल्या असतात. विशेष म्हणजे जवळ उच्च शिक्षण नसले तरीही राजकारण, कला व क्रीडा या कार्यशाळेतील माणसे इतर उच्च शिक्षितांच्या तुलनेत पैसा, रूबाब, मानसन्मान याबाबतीत फार पुढे असतात. अशी विशेष माणसे  सेलिब्रिटी म्हणून चमकत असतात. उद्योगधंदा करून श्रीमंत, अती श्रीमंत होण्यासाठीही तशी उच्च शिक्षणाची फार आवश्यकता नसते. जवळ पिढीजात पैसा, संपत्तीचे भांडवल असले की उद्योग, व्यापार, धंद्यासाठी उत्तमच!

ही माणसे विविध कार्यशाळेतून दोन गोष्टी प्रामुख्याने मिळवत असतात. एक म्हणजे अनुभवी ज्ञानार्जन व जगण्यासाठी अर्थार्जन. राजकारणी मंडळी या दोन गोष्टींसोबत सत्ताही मिळवतात. पण कोणताही माणूस सर्व गोष्टींचे ज्ञान मिळवून सर्व ज्ञान शाखांत पारंगत होऊ शकत नाही. ही मर्यादा निसर्गानेच माणसावर घातली आहे. लोकांची समज व आकलन एकसारखे नसल्याने बहुतेक सर्वच माणसे अर्धवट ज्ञानावस्थेत व अपूर्ण कार्यावस्थेत काही तथ्ये व काही मिथके यांच्या संगतीत जन्मापासून मरेपर्यंत जगत असतात. माणसे येतात व जातात पण त्यांच्या ज्ञानशाळा व कार्यशाळा कायम तशाच अबाधित राहतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा