https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ९ जून, २०२४

सुज्ञ मानवी विवेकबुद्धी हे निसर्गाचे मोठे आश्चर्य!

मानवी वासना व भावना यांना लगाम घालणारी सुज्ञ मानवी विवेकबुद्धी हे निसर्गाचे मोठे आश्चर्य!

निर्जीव पदार्थांचे रासायनिक गुणधर्म व सजीव पदार्थांचे जैविक गुणधर्म हे एकमेकांशी संलग्न असले तरी त्या गुणधर्मांत खूप फरक आहे. दोन्ही पदार्थांचे हे रासायनिक व जैविक गुणधर्म वेगळे असले तरी ते दोन्हीही गुणधर्म निसर्गाच्या पदार्थीय विश्वाचे भौतिक गुणधर्मच होत. अर्थात निसर्गाची भौतिकता रासायनिक व जैविक अशा दोन्ही प्रकारची आहे.

मनुष्य हा निसर्गाने उत्क्रांत केलेला उच्च पातळीचा जैविक गुणधर्माचा सजीव पदार्थ आहे. या पदार्थाला अन्नाची भूक, लैंगिक भूक, झोप इ. मूलभूत जैविक वासना आहेत तशा मायाप्रेम, करूणा, परोपकार इ. पूरक नैतिक/सकारात्मक भावनाही आहेत व त्याचबरोबर भय, राग, लोभ, मोह, मद, मत्सर यासारख्या उपद्रवी अनैतिक/नकारात्मक भावनाही आहेत ज्या नकारात्मक भावनांच्या अतिरेकाचे रूपांतर हिंसा या विध्वंसक लक्षणात होते.

जैविक वासना, सकारात्मक नैतिक भावना व नकारात्मक अनैतिक भावना यांचे अत्यंत किचकट मिश्रण म्हणजे मानवी मन. या मनात जर निसर्गाने सुज्ञ विवेकबुद्धी घातली नसती तर मनुष्याने स्वतःबरोबर निसर्गाची पुरती वाट लावली असती. ही सुज्ञ मानवी विवेकबुद्धी मनुष्याच्या जैविक वासना व नैतिक भावना यांच्यात संतुलन साधण्याचा व मनुष्याच्या अनैतिक भावनांना नियंत्रित ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहते. जैविक वासना आततायी असतात, नैतिक भावना नम्र असतात तर अनैतिक भावना आक्रमक असतात. मानवी मनाच्या या तिन्ही कार्यप्रेरणा जशा नैसर्गिक आहेत तशी त्यांच्यात संतुलन साधणारी व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी मानवी मनाची सुज्ञ विवेकबुद्धी ही सुद्धा नैसर्गिक आहे. निसर्गाने केलेली मानवी मेंदूची रचनाच अशाप्रकारे खूप किचकट आहे. मनुष्याच्या वासना व भावना यांच्यावर अंकुश ठेवून त्यांना लगाम घालणारी मानवी मेंदूमनाची सुज्ञ विवेकबुद्धी हे निसर्गाचे मोठे आश्चर्य होय.

जैविक वासना व नैतिक/अनैतिक भावना यांचा मानवी मेंदूमनावरील दबाव प्रचंड मोठा असतो. तिन्ही बाजूंनी येणाऱ्या या दबावांना न जुमानता त्यांच्यात संतुलन साधणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे ही साधी गोष्ट नाही. ही असाधारण गोष्ट सुज्ञ मानवी विवेकबुद्धीला साध्य करावी लागते. मानवी विवेकबुद्धीचे हेच आद्य नैसर्गिक कर्तव्य आहे ज्या मूलभूत बौद्धिक कर्तव्याचा समावेश मानवनिर्मित सामाजिक कायद्यात केला गेला आहे. या कायद्यानुसार मानवी विवेकबुद्धीने जैविक वासना, नैतिक भावना व अनैतिक भावना यांच्यापैकी कोणालाही झुकते माप देऊ नये हे अपेक्षित आहे. या आद्य नैसर्गिक कर्तव्याला मानवी बुद्धी सुज्ञपणाने, विवेकाने जागेल अशी अपेक्षा करूया!

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा