https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ११ जून, २०२४

समाज माध्यमावर एकमेकांशी सौजन्याने, नम्रतेने वागा!

समाज माध्यमावर एकमेकांशी सौजन्याने, नम्रतेने वागा!

मी परवा एक छोटीशी पोस्ट शेअर केली होती जिचा सार असा होता की गुन्हेगारांच्या मनात परमेश्वराच्या भीतीपेक्षा कायद्याची भीती घाला कारण गुन्हेगार परमेश्वराला नाही तर थोडे तरी कायद्याला घाबरतात. ही एक सरळसाधी, वास्तव पोस्ट होती. पण लगेच या पोस्टमधील गर्भितार्थ नीट समजून घेता फेसबुक वरील काही जणांनी मला "तू नास्तिक असलास तर तुझी नास्तिकता तुझ्या  जवळ ठेव" अशा अर्थाच्या काही असभ्य भाषेत अर्थहीन प्रतिक्रिया दिल्या. या प्रतिक्रिया देताना माझे वय काय, शिक्षण काय, अभ्यास काय याचा जराही विचार न करता या पोस्टवरून मी नास्तिक आहे असा सरळ निष्कर्ष काढून असल्या प्रतिक्रिया दिल्या.

या समाज माध्यमावर आपले विचार मांडणारे आपण सर्वजण सामान्य माणसे आहोत व त्यामुळे आपल्या सर्वांच्या वेदना, सर्वांची सुखदुःखे जवळजवळ सारखी आहेत हे प्रथम ध्यानात घ्या. आपण कोणी टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी सारख्या अती श्रीमंत उद्योजकांच्या कुटुंबात किंवा पिढीजात मोठा राजकीय वारसा असलेल्या मोठ्या राजकीय घराण्यात जन्माला आलो आहोत का? आपल्यापैकी तसे कोण असेल तर कृपया तशी स्पष्ट ओळख द्या म्हणजे मी अधिक सावध होईन. या मोठ्या लोकांच्या कळपात आपण जाऊ शकत नाही की राहू शकत नाही. आपण सर्वसामान्य माणसे एकाच जीवन बोटीतून प्रवास करीत असल्याने आपली एकमेकांना भीती वाटता कामा नये. तेव्हा मतमतांतरे काहीही असोत समाज माध्यमावर एकमेकांशी सौजन्याने, नम्रतेने वागा ही नम्र विनंती.

परमेश्वर व कायदा यावरील माझी पोस्ट नीट समजून घेण्यासाठी काल दिनांक १० जून, २०२४ ची दैनिक लोकसत्तातील बातमी नीट वाचा. जम्मू काश्मीर मध्ये वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार झाले अशी ती बातमी आहे. जम्मू काश्मिर मधील वैष्णोदेवीच्या या निष्पाप यात्रेकरूंवर असा भ्याड हल्ला करताना या दहशतवाद्यांना परमेश्वराची भीती का वाटली नाही? या गुन्हेगारांना असे भयंकर गुन्हे करताना जर परमेश्वराची भीतीच वाटणार नसेल तर मग त्यांच्या मनात मानवनिर्मित सामाजिक  कायद्याची भीती निर्माण करावी की नको?

माझ्या अशा काही स्पष्ट वक्तव्यातून मी नास्तिक आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. मी आस्तिकच आहे. मी निसर्गातील परमेश्वराला मानतो. पण त्या परमेश्वराकडे मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघतो. जसा निसर्ग तसा परमेश्वर. निसर्गातील अनाकलनीय चैतन्यशक्ती हा माझा परमेश्वर. हा परमेश्वर निसर्गापासून वेगळा कसा असेल? त्याचा धर्म निसर्ग विज्ञानापासून वेगळा कसा असेल? आणि हिंदू देवदेवतांकडून आपण काय शिकायचे? कित्येक देवदेवतांच्या हातात शस्त्रे असतात ती का असतात? दुष्टांचे, अन्याय करणाऱ्यांचे निर्दालन करण्यासाठीच ना! आणि भगवद् गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले आहे? नुसती माझी आराधना, माझी पूजा, माझा धावा करीत बस असे सांगितले की हातात शस्त्र घेऊन अन्याय करणाऱ्या समोरच्या शत्रूचा नाश कर असे सांगितले. मग धार्मिक अध्यात्मात, निसर्ग विज्ञानात व सामाजिक कायद्यात काही फरक जाणवतो का? धर्म, विज्ञान, कायदा सगळं एकच आहे, निसर्ग व त्यातील परमेश्वर एकच आहे, फक्त आपली बौद्धिक समज वेगळी आहे.

समाज माध्यमावरील मित्र मैत्रिणींनो गोष्टी जरा नीट समजून घ्या व मगच एखाद्या अभ्यासू लेखकाच्या सुज्ञ लिखाणावर प्रतिक्रिया द्या. समाज माध्यमावर एकमेकांशी सौजन्याने, नम्रतेने वागा!

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा