https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १३ जून, २०२४

जाणिवेतला परमेश्वर!

जाणिवेतला परमेश्वर!

निसर्ग त्यातील पदार्थांसह हालचाल करतोय. ही हालचाल आपोआप होत असल्याचे दिसत असले तरी या हालचालीला सतत पुढे ढकलणारी कोणती तरी प्रेरणा व उर्जा निसर्गात असल्याची जाणीव मानवी मनाला सातत्याने होत रहाते. पण मानवी मनाची ही जाणीव जाणिवेपुरतीच मर्यादित रहाते. मनाच्या जाणिवेला जाणिवेपलिकडे जाऊन निसर्गातील प्रेरणेचा व उर्जेचा स्त्रोत शोधता येत नाही. हा प्रेरणा व उर्जा स्त्रोत मानवी मनाला कायम अनाकलनीय राहिला आहे. मानवी बुद्धीला तो सतत वाकुल्या दाखवत राहिलाय. मला सतत अशी जाणीव होत राहते की हा न सापडणारा स्त्रोत हाच निसर्गाचा परम आत्मा (परमात्मा) असावा. पण या परमात्म्याचे माझे देवधार्मिक अध्यात्म हे फक्त माझ्या जाणिवेपुरतेच मर्यादित राहते. त्या पलिकडे ते जातच नाही. माझ्या मते विज्ञान हे निसर्गाच्या पदार्थीय शरीराचे ज्ञान होय. हे विज्ञान मानवी मनाच्या जाणिवेतही आहे व प्रत्यक्ष ज्ञानातही आहे व त्यामुळे ते प्रत्यक्ष व्यवहारात आणता येते. पण निसर्ग शरीरातील परम आत्म्याची फक्त जाणीव होते. तिचे ज्ञानच होत नाही. ज्या गोष्टीचे ज्ञानच नाही ती गोष्ट व्यवहारात कशी आणता येईल? म्हणून परम आत्म्याचे देवधार्मिक अध्यात्म हे फक्त आणि फक्त जाणिवेपुरतेच मर्यादित राहिले आहे. ते प्रत्यक्ष व्यवहारात आणताच येत नाही व जोपर्यंत निसर्गातील परम आत्मा (प्रेरणा व उर्जा स्त्रोत) अनाकलनीय राहील तोपर्यंत त्या परमात्म्याचे ते अध्यात्म व्यवहारात आणताच येणार नाही असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत आहे. म्हणून परमात्मा, परमेश्वराला वैयक्तिक जाणिवेतच राहू द्यावे. त्याचा धार्मिक बाजार मांडू नये असे मला वाटते.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा