https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २९ जून, २०२४

वृद्ध शरीर एक बुडते जहाज!

वृद्ध शरीर एक बुडते जहाज!

पृथ्वीवर गुरूत्वाकर्षण आहे म्हणून इथे माणसांसह सगळ्याच पदार्थांना जडत्व प्राप्त होते. इतकेच नव्हे तर पृथ्वीच्या वातावरणातील हवेलाही वजन प्राप्त होते. म्हणजे आम्ही इथे वजनदार का आहोत तर पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळे. अंतराळात हे गुरूत्वाकर्षण नसल्याने माणूस त्या वातावरणात तरंगत राहतो कारण तिथे पृथ्वीवरील त्याचा जडपणा नष्ट होतो. खोल पाण्यावर तरंगत राहण्यासाठी पदार्थाला पाण्याच्या जडपणापेक्षा हलके व्हावे लागते. माणूस खोल पाण्यात पोहताना पाण्याला त्याच्या  पोटाखाली ओढून हलके होत पोहत पुढे सरकतो किंवा शरीर पाण्यापेक्षा हलके करून खोल असलेल्या जड पाण्यावर तरंगूही शकतो.

बालपणी व तरूणपणात सळसळते असलेले रक्त वृद्धापकाळी तसे रहात नाही. त्यामुळे बालपणी व तरूण वयात सहज करता येणाऱ्या गोष्टी वृद्धापकाळी जड, अवघड होतात. वृद्ध शरीरातील वृद्ध मेंदू अधूनमधून जड होतो (याला डोके जड होणे म्हणतात) व त्यामुळे साध्या साध्या गोष्टीही जड होतात. काहीजणांच्या मेंदूला भौतिक जगाची विरक्ती येते. विरक्ती हा प्रकार वृद्धापकाळीच जास्त जाणवतो. हे असे का होते तर मेंदू जड झाल्याने होते. समुद्रातून प्रवास करताना पाण्यापेक्षा हलक्या असलेल्या जहाजात समुद्राचे पाणी शिरले तर ते जहाज जड होऊन समुद्रात बुडते. तीच गत जडत्व आलेल्या वृद्ध शरीराची होत असते.

वृद्धापकाळी शरीराचे अवयव एकेक करून हळूहळू कमकुवत व निकामी होत जातात. असा एकेक कमकुवत अवयव म्हणजे वृद्ध शरीररूपी जहाजाला पडलेली भोके ज्यातून जड समुद्राचे (जड सृष्टीचे) पाणी जहाजात शिरून जहाज सृष्टीरूपी सागरात बुडू लागते. निसर्गाने ही जहाज बुडण्याची क्रिया इतकी अनिवार्य करून ठेवलीय की वृद्ध जहाजाला नीट सावरता येत नाही व इतर तरूण जहाजेही या जड वृद्ध जहाजाला बुडण्यापासून वाचवू शकत नाहीत कारण वृद्ध शरीराला भोकेच इतकी पडलेली असतात की त्यातून जड पाणी आत शिरतच राहते. 

रूग्णालयात वृद्धावस्थेत आजारी पडलेल्या माणसाच्या नाकातोंडाला लावलेल्या प्राणवायूच्या नळ्या म्हणजे वृद्ध जहाजाला पडलेली भोके बुजवण्याचाच प्रकार जो काही काळ जहाज बुडण्याची प्रक्रिया लांबवतो. पण ही तशी वरवरची मलमपट्टी असते. काही वृद्ध जहाजे सत्तरी पार करायच्या आतच जड सृष्टीत (पाण्यात) बुडतात तर काही वृद्ध जहाजे नव्वदी पार करून मग बुडतात, पण बुडतात जरूर!

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा