https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, ५ जून, २०२४

मला कळलेले अध्यात्म!

शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे, कारण परमात्मा अमर आहे, हे मला कळलेले अध्यात्म!

माझ्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून  निसर्ग किंवा विश्व हे परमात्म्याचे म्हणजे विश्वातील चैतन्यशक्तीचे प्रचंड मोठे पदार्थीय शरीर आहे. या विशाल शरीरातील अलौकिक चैतन्यशक्ती कधीही नष्ट होत नाही. मात्र ही शक्ती परिवर्तनशील असल्याने पदार्थीय निसर्ग किंवा विश्वातील विविध पदार्थांच्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ती परिवर्तीत होत राहते व त्यानुसार निसर्ग/विश्वातील विविध पदार्थ उत्पत्ती, अस्तित्व व लय (सजीव पदार्थांसाठी जन्म, जीवन व मृत्यू) या तीन अवस्थांना पार करीत परिवर्तन चक्रात सतत फिरत राहतात. परमात्म्याच्या आध्यात्मिक ध्यानधारणेने किंवा भक्ती प्रार्थनेने या परिवर्तन चक्रातून माणसासह कोणत्याही पदार्थाला मुक्ती मिळत नाही हे माझे स्पष्ट वैयक्तिक मत आहे. परमात्म्याच्या निसर्ग विज्ञानाला मुळात असली मुक्ती मान्यच नाही असे माझे मत आहे. निसर्गातील हा परमात्मा किंवा ही चैतन्यशक्ती निसर्गातील विविध पदार्थांना परिवर्तन चक्रातून सतत फिरवत राहते. या चैतन्यशक्तीला आध्यात्मिक दृष्टिकोनातून मी परमात्मा असे म्हणतो. निसर्गातील किंवा विश्वातील या चैतन्यशक्तीची अनुभूती म्हणजे अमर परमात्म्याची अनुभूती असे माझे वैयक्तिक मत आहे. तसेच या चैतन्यशक्तीला (परमात्म्याला) मन व बुद्धी असावी जी स्वयंभू असावी कारण मन व बुद्धी नसलेल्या चैतन्य शक्तीकडून (परमात्म्याकडून) विश्व किंवा निसर्ग सृष्टीची रचना होऊच शकली नसती. पण माझा हा तर्कावर आधारित गृहीत अंदाज आहे ज्याला कोणताही ठोस असा वैज्ञानिक पुरावा नाही.

मनुष्य जन्म घेतो म्हणजे परमात्मा सूक्ष्म स्वरूपात मनुष्य शरीर धारण करतो व त्या शरीराला निसर्ग किंवा विश्व रचनेचे फळ भोगायला भाग पाडतो. हे फळ किती गोड व किती कडू असेल हे मानवी मेंदूमन व मेंदूबुद्धीच्या बऱ्यावाईट कर्मावरच अवलंबून नव्हे तर काही अंशी तरी परमात्म्याच्या (चैतन्यशक्तीच्या) अनाकलनीय निर्णयावर (ज्याला नियती, प्रारब्ध, नशीब असे म्हणता येईल) अवलंबून असावे असे मला वाटते. पण असे मानणे हे परमात्मा (चैतन्यशक्ती) ला स्वयंभू मन व बुद्धी असावी या माझ्या तार्किक अंदाजावर आधारित आहे ज्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. अंदाजाने मानणे व प्रत्यक्षात असणे यात फरक असतोच.

मनुष्यच काय पण इतर कोणत्याही सजीव पदार्थातील सूक्ष्म स्वरूपी परमात्म्याला (चैतन्यशक्तीला) त्या सजीव पदार्थाचा आत्मा असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मी तर असे म्हणेल की निसर्ग/विश्वातील परमात्मा (चैतन्यशक्ती) सर्वच पदार्थांत निवास करून असल्याने सर्व सजीव व निर्जीव पदार्थांत आत्मा म्हणजे परमात्म्याचा अंश आहे. पण सजीव पदार्थाला त्याच्या जिवंतपणाची जाणीव असल्याने तो पदार्थ त्याच्या जीवनात निसर्ग/विश्व रचनेचे जे बरेवाईट फळ भोगतो त्याची जाणीव त्या सजीव पदार्थाला त्याच्या मृत्यूपर्यंत होत राहते.

एक अतिशय वासना/भावनाप्रधान व अतिशय बुद्धिमान सजीव पदार्थ म्हणून माणूस त्याच्या जीवनात जन्म ते मृत्यू दरम्यान निसर्ग/विश्व रचनेचे जे बरेवाईट फळ भोगतो ते फळ खरं तर त्याच्या शरीरातील आत्मा (सूक्ष्म चैतन्यशक्ती) भोगत असतो. असे फळ भोगताना मानवी शरीरात असलेल्या परिवर्तनशील आत्म्याच्या सोबतीला शरीराचा राजा म्हणजे मेंदू असतो ज्यात जैविक वासना व उदात्त भावना (वासना-भावना) असलेले मेंदूमन व वासना-भावना यांच्यात संतुलन साधणारी मेंदूबुद्धी असते. म्हणजे मनुष्य शरीरात मन, बुद्धी व आत्मा (दिल, दिमाग और आत्मा) अशा तीन गोष्टी एकत्र नांदत असतात.

माणसाकडून कोणतेही काम किंवा कोणतीही कृती परमात्म्याच्या (चैतन्यशक्तीच्या) सृष्टी रचनेनुसार व सृष्टी कायद्यानुसार (विज्ञानानुसार) व्यवस्थित, नीट होण्यासाठी मानवी मेंदूच्या मेंदूमन व मेंदूबुद्धी या दोन भागांत सतत समन्वय, एकवाक्यता असणे व त्यासाठी मेंदूतील मन व बुद्धी हे दोन भाग सतत एकजीव, एकसंध, एकात्म असणे आवश्यक असते. जर मेंदूतील मन व बुद्धी हे दोन भाग एकमेकांपासून अलग, विलग किंवा विभाजित झाले तर माणसाची मनःस्थिती द्विधा होते. मन व बुद्धीचे हे विभाजन जास्त झाले तर माणूस दुभंगलेल्या मनःस्थितीचा शिकार होतो. अशा विमनस्क मानसिक अवस्थेतला मनुष्य चुकीचे वर्तन करतो.

मानवी शरीरातील आत्मा मानवी शरीराला सोडून जातो तेव्हा मानवी शरीर त्यातील मेंदूच्या मेंदूमन व मेंदूबुद्धी या दोन भागांसह मृत होते. यालाच तर माणसाचा मृत्यू असे म्हणतात. शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे, कारण परमात्मा अमर आहे, हे मला उतार वयात कळलेले अध्यात्म आहे!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा