https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ११ जून, २०२४

प्रेमाची खरी कसोटी कोणत्या नात्यात?

प्रेमाची खरी कसोटी कोणत्या नात्यात?

असे कोणते नाते आहे की जिथे प्रेमाची खरी कसोटी लागते? माझ्या मते कुटुंबातील आईवडील व मुले, भाऊ बहिणी या जैविक रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाची खरी कसोटी जर कोणत्या नात्यात लागत असेल तर ती जैविक रक्ताच्या नात्याचा संबंध नसलेल्या दोन वेगवेगळ्या, परक्या कुटुंबातील असूनही विवाहाच्या माध्यमातून एकत्र येऊन आयुष्यभर एकत्र राहण्याची परीक्षा देणाऱ्या पती पत्नीच्या नात्यात. 

पती पत्नीचे नाते हेच जगातील इतर कोणत्याही नात्यापेक्षा अतिशय संवेदनशील व नाजूक नाते आहे असे माझे स्पष्ट म्हणणे आहे. याचे मूलभूत कारण कोणते असेल तर या नात्यातील प्रेमाला चिकटलेली आगीपेक्षाही दाहक असलेली लैंगिक वासना. ही लैंगिक वासना एका मोहाच्या क्षणी आयुष्यभर जपलेल्या पती पत्नीतील प्रेमाची एका क्षणात वाट लावू शकते.

पती पत्नीच्या नात्यात याच लैंगिक वासनेशी जोडल्या गेलेल्या तीन प्रमुख गोष्टी म्हणजे प्रेम, विश्वास व चारित्र्य. या तीन गोष्टींची खरी कसोटी लागते ती लैंगिक वासनेला विवाह बंधनात मर्यादित ठेवताना. या बंधनातील फक्त एक चूक म्हणजे एका क्षणात पती पत्नीतील प्रेम, विश्वास, चारित्र्य या तीन गोष्टींच्या चिंधड्या व या नात्याला गेलेला कायमचा तडा. जसा काचेचे भांडे तडा गेल्यावर कायमचे बाद होते तसेच पती पत्नीचे नाते विवाह बाह्य लैंगिक संबंधाच्या एका मोहाच्या प्रसंगाने कायमचे बाद होते. मग मुलांच्या मायाप्रेमापोटी व जगाच्या लाजेस्तव असे पती पत्नी पुढे  संसारात मरेपर्यंत एकत्र राहिले तरी एकदा का अशा मोहाच्या प्रसंगाने हे नाते तुटले की ते कायमचे तुटलेच.

पैसा माणसांना जसा जोडतो तसा तोडतोही असे म्हणतात. पण या पैशापेक्षाही दोन जिवांना जोडणारी व तोडणारी जगातील सर्वात मोठी आव्हानात्मक गोष्ट कोणती असेल तर पती पत्नीच्या वैवाहिक नात्यात बंदिस्त केलेली लैंगिक वासना. ही लैंगिक वासना पती पत्नीने एखाद्या मोहाच्या क्षणी बाहेर जरा जरी मोकळी केली तरी विवाहबाह्य लैंगिक संबंधाचा तो एक क्षण एका क्षणात खूप काळजीने, खूप प्रेमाने जपलेल्या पती पत्नीच्या नात्याची व त्यांच्या संसाराची राखरांगोळी करतो. म्हणून माझ्या मते, लैंगिक वासना दोघांपुरतीच मर्यादित ठेवून पती पत्नी म्हणून आयुष्यभर एकत्र राहणे हेच जगातील सर्वात मोठे आव्हान असून या आव्हानातच प्रेमाची खरी कसोटी लागते.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा