https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ३० जून, २०२४

राजकारण हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे!

राजकारण हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे!

समाज हा माणसांचा संघ असतो. या संघात विविध स्वभावाची व विविध ताकदीची माणसे जगत असतात. या विविधतेत ती किती सांघिक भावनेने व सहकार्याने जगतात हा अभ्यासाचा फार मोठा विषय आहे. मानवी मनांचे प्रकार तरी किती याचा हिशोब नाही. काही प्रकार ते असे. झोपाळू, स्वप्नाळू (काल्पनिक आभासात जगणारी), आळशी मने, जागृत, डोळस (वैज्ञानिक वास्तवात जगणारी), उत्साही मने, अज्ञानी, मूर्ख, विकृत मने, ज्ञानी, व्यवहारी, सुज्ञ मने असे मानवी मनांचे अनेक, विविध प्रकार आहेत. या विविध मन प्रकारातील कोणता प्रकार, वर्ग निवडून त्याची साथसंगत करायची व कोणत्या प्रकारापासून, वर्गापासून दूर रहायचे हा प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न. पण अशी निवड केली तरी प्रत्येक माणसाला विविध मनांच्या माणसांच्या गराड्यात प्रत्यक्ष किंवा  अप्रत्यक्षरीत्या रहावेच लागते.

मानवी मनाच्या विविध प्रकारानुसार माणसांचे विविध वर्ग बनविता येऊ शकतात. पण त्याऐवजी आर्थिक व जातीपातीच्या निकषावर समाजात विविध वर्ग निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ, रेल्वेच्या डब्यात प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी असे पाडलेले वर्ग ज्ञानावर नव्हे तर आर्थिक निकष विचारात घेऊन पाडलेले असतात. तसेच उच्च उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न  गट व अल्प उत्पन्न गट असे राहत्या सोसायट्यांचे तीन वर्ग समाजाने निर्माण केलेत त्याचा आधार काय तर जवळ असलेली आर्थिक ताकद.

माणसाच्या मानसिक जडणघडणीत माणूस कोणत्या वातावरणात वाढतो याला फार महत्व आहे. जातीपातीने निर्माण केलेला सामाजिक वर्ग व आर्थिक निकषाने निर्माण केलेला आर्थिक वर्ग यापैकी कोणत्या वर्गात सुशिक्षित, ज्ञानी माणसांचा वर्ग बसतो हा संशोधनाचा विषय आहे. खरं तर ज्ञानाला जातपात व पैसा चिकटवून ज्ञानाचे मूल्यमापन करणे हे अत्यंत चुकीचे आहे. पण चुकीचा हा पायंडा समाजाकडून पाडला गेलाय ही वस्तुस्थिती आहे. अत्यंत प्रतिकूल कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक परिस्थितीशी सतत संघर्ष करीत एखाद्या गरीब माणसाने उच्च शिक्षण घेतले तरी शेवटी त्याच्या ज्ञानाची, बौद्धिक कष्टाची किंमत समाजात कोण करते तर मूठभर श्रीमंत लोकांचा विशिष्ट वर्गच. ही वस्तुस्थिती व परिस्थिती शैक्षणिक प्रगतीसाठी नैराश्यजनक आहे.

या परिस्थितीत राहून कमी शिक्षण जवळ असूनही (सर्व राजकारणी उच्च शिक्षित नसतात) राजकारणी मंडळी समाजातील विविध वर्गांना एकत्र करून त्या संघावर (राष्ट्र हा सुद्धा एक प्रचंड मोठा संघ आहे) राजकीय मुत्सद्देगिरी करून धूर्तपणे राज्य करतात हे विशेष आहे. कोणाचे व्यक्तित्व कितीही मोठे असो ते कोणालाही संघावर लादता येत नाही कारण संघशक्ती ही व्यक्तीच्या वैयक्तिक शक्तीपेक्षा फार मोठी असते. या संघशक्तीचा समाजाच्या कल्याणासाठी कमी व स्वतःच्या फायद्यासाठी जास्त उपयोग कसा करून घ्यायचा हे गणित धूर्त राजकारणी मंडळींना चांगले ठाऊक असते व त्याचा ते चाणाक्षपणे उपयोग करून घेतात. म्हणून तर यशस्वी राजकारणी मंडळींकडे भरपूर पैसा असतो व ती मंडळी उच्चभ्रू सोसायटीतील लोकांपेक्षाही भारी असलेल्या आलिशान घरांत (बंगल्यात) राहतात व उच्च प्रतीच्या सुखसुविधा उपभोगतात. पण हा उपभोग घेत असताना ही राजकारणी मंडळी झोपडपट्ट्या, चाळी, साध्या सोसायट्यांमधून फिरून तिथल्या लोकांना आपलेसे करून घेतात व श्रीमंत, उच्चभ्रू लोकांनाही जवळ करून त्यांच्याशी छुपी भागीदारी करतात ही गोष्ट आता लपून राहिली नाही. राजकीय गणित हा अत्यंत कठीण विषय आहे जो धूर्त राजकारणी मंडळींना अगदी व्यवस्थित कळतो. म्हणून तर राजकारणी मंडळींच्या या विशेष बुद्धीला व त्यांच्या विशेष नेतृत्व गुणाला जेवढे नमस्कार करावे तेवढे थोडेच. खरंच, राजकारण हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे! 

-©ॲड.बी.एस.मोरे, १.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा