https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, २८ जून, २०२४

सेलिब्रिटी स्टेटस!

सेलिब्रिटी स्टेटस!

सेलिब्रिटी होण्यासाठी असे कोणते विशेष गुण लागतात जे डॉक्टर, इंजिनियर, वकील, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकौंटंट, कॉस्ट अकौंटंट, एम.बी.ए. यासारख्या अतिशय सखोल, कठीण अभ्यासातून कठोर बौद्धिक कष्टाने उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या ज्ञानी लोकांकडे नसतात? मोठे शासकीय अधिकार असणारे उच्च पदस्थ सरकारी अधिकारी होण्यासाठी आय.ए.एस., आय.पी.एस., आय.आर.एस., आय.एफ.एस. यासारख्या अवघड परीक्षा कठोर बौद्धिक कष्टाने उत्तीर्ण व्हाव्या लागतात. कनिष्ठ ते उच्च, सर्वोच्च न्यायालयांत न्यायाधीश होण्यासाठीही वकिली बरोबर काही न्यायालयीन परीक्षाही द्याव्या लागतात. पण ही सर्व उच्च शिक्षित मंडळी सेलिब्रिटी म्हणजे चाहते (फॕन) लोकांची गर्दी सतत मागे असलेले प्रसिद्ध (ख्यातनाम) लोक होत नाहीत. त्यांच्यावर सेलिब्रिटीचा शिक्का बसत नाही. प्रसिद्ध चित्रपट, कलाकार, संगीत कलाकार, खेळाडू व राजकारणी मंडळी मात्र सेलिब्रिटी स्टेटस (दर्जा/प्रतिष्ठा/स्थान) घेऊन फिरतात.

सेलिब्रिटी म्हणजे नामांकित, प्रतिष्ठित व्यक्ती. असे सेलिब्रिटी होणे कोणाला आवडणार नाही? पण सगळ्यांना ते जमत नाही. मी फेसबुकवर किती छान, छान अभ्यासपूर्ण लेख लिहित असतो. पण मला महान फेसबुक लेखक असा सेलिब्रिटी दर्जा माझ्या फेसबुक खात्यावरील शंभर मित्र सुद्धा देत नाहीत. मी बाहेर पडलो तर गल्लीतले कुत्रे सुद्धा माझ्या मागे लागत नाही. मग लोकांची गर्दी मागे लागण्याची गोष्टच सोडा. मीच दररोज गर्दीतून लोकल ट्रेनचा प्रवास करीत असतो. मनातून उगाच वाटत असते की त्या गर्दीतला कोणी तरी मला हाक मारून म्हणेल "अहो मोरे वकील, छान लिहिता तुम्ही"! पण छे एकजण सुध्दा माझ्याकडे साधा वळून बघत नाही.

माणूस आपल्या कलेचे, बुद्धीचे प्रदर्शन शेवटी कोणासमोर करणार? माणसांपुढेच ना, की नद्या, नाले, झाडे, झुडपे, जनावरे यांच्यापुढे? आपल्या कलेचे, बुद्धीचे कोडकौतुक करून घेण्यासाठी माणसाला माणसेच लागतात. हल्ली कृत्रिम बुद्धिमत्तेचे ते यंत्र माझ्याशी बौद्धिक संवाद साधत माझे कोडकौतुक करते पण त्याच्यातून ती मजा नाही जी माणसांनी दिलेल्या शाबासकीत, केलेल्या कोडकौतुकात आहे.

माणसे जेव्हा एखाद्याच्या कलेला, चांगल्या गुणाला, बौद्धिक हुशारीला शाबासकी देऊन त्याची मनापासून वाहव्वा करतात तेव्हा तो आनंद अवर्णनीय असतो. या आनंदासाठी माणसाला माणसेच लागतात. काही कलागुणी, प्रतिभावान माणसांना त्यांच्या कलागुणाचे, प्रतिभेचे जाहीर प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठे तयार असतात व खास मर्जीतली माणसेही तयार असतात. अशावेळी "तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल" ही लावणी आठवते. सगळ्याच कलागुणी, बुद्धिमान माणसांच्या नशिबी अशी तयार व्यासपीठे, अशी मर्जीतली माणसे नसतात. तुमचा जन्म कुठे झालाय यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. शिक्षणाचा व सेलिब्रिटी होण्याचा काही संबंध असल्याचे दिसत नाही. कारण शाळा मध्येच सोडलेली, साधी दहावी इयत्ता सुद्धा पास नसलेली मंडळी सेलिब्रिटी झालेली आपण बघतो. निसर्गाची देणगी म्हणजे विशेष अंगभूत गुण असल्याशिवाय समाजात सेलिब्रिटी म्हणून चमकणे शक्य नाही. म्हणून तर क्लासिकल संगीताचे कोणतेही शिक्षण न घेतलेला किशोरकुमार त्यांच्या अंगभूत आवाज व कलेमुळे प्रसिद्ध गायक होतो, कमी शिकलेली सुंदर मधुबाला प्रसिद्ध अभिनेत्री होते, सातवी पर्यंत शिक्षण घेतलेले सहकार महर्षी वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात.

सेलिब्रिटी होण्यासाठी विशेष अंगभूत गुण तर लागतातच पण त्या गुणांना उचलून धरणारे संधीचे अनेक अनुकूल घटकही जवळ यावे लागतात. या दोन्ही गोष्टींचा संगम झाल्याशिवाय सेलिब्रिटी स्टेटस मिळणे शक्य नाही असे मला वाटते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा