वृद्धांचे निवृत्त जीवन म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे जीवन!
वृद्धत्व म्हणजे सजीव अवस्थेतून निर्जीव अवस्थेत जाण्याचा अर्थात जीवनाकडून मृत्यूकडे जाण्याचा वेदनादायक प्रवास अर्थात जीवनाचे जहाज खोल समुद्रात बुडतानाची व्याकूळ अवस्था. वृद्धापकाळ हा अनिवार्य परिवर्तनाचा काळ ज्यात सजीव माणसाचे रूपांतर/परिवर्तन निर्जीव मृत शरीरात होते.
या परिवर्तनाच्या काळात माणसाची पुनर्निर्माणाची ताकद संपलेली असते. पुनर्निर्माणात नुसत्या लैंगिक पुनरूत्पादनाचा भाग नसतो तर इतर पदार्थीय उत्पादने काढण्याचाही भाग असतो. पुनर्निर्माणाची ताकद संपल्याने उत्पादन प्रक्रिया थांबलेली असते. जर उत्पादनच नाही तर मग देवाणघेवाणीचा व्यापार कुठून असणार? पुनर्निर्माण/उत्पादन व देवाणघेवाण/व्यापार या दोन्ही गोष्टी उतार वयातील वृद्ध माणसाकडून होत नाहीत कारण दोन्हीची ताकदच उतार वयात संपलेली असते.
वृद्धापकाळात माणसाला सतत सक्रिय ठेवणाऱ्या पुनर्निर्माण व देवाणघेवाण प्रक्रिया एकीकडून थांबलेल्या असतात तर दुसरीकडून माणसाच्या परिवर्तनाची म्हणजे माणसाला जीवनाकडून मृत्यूकडे नेण्याची प्रक्रिया मात्र जोरात किंवा दमदार पावलाने चालू असते. वृद्ध माणसाची ही अवस्था ना घरका ना घाटका अशी असते. ही अवस्था म्हणजे निसर्गाने माणसांसह सर्व सजीवांवर हुकूमशाहीने लादलेली अनिवार्य निवृत्ती असते.
पण वय लांबलेली म्हणजे फक्त सत्तरी नव्हे तर अगदी नव्वदी पार केलेली काही वृद्ध माणसे मात्र उतार वयातही सक्रिय असताना दिसतात. त्यांची मानसिक, बौद्धिक ताकद जोरात काम करीत असते पण तरीही त्यांची शारीरिक ताकद तरूणपणासारखी राहिलेली नसते. पण हातात भरपूर पैसा व सत्ता असली की त्या बाह्य पाठबळाच्या जोरावर ही असाधारण विशेष वृद्ध माणसे सर्वसामान्य वृद्ध माणसांपेक्षा जास्त सक्रिय असलेली दिसतात. पण ही असाधारण माणसे म्हणजे नियम नव्हे. या विशेष वृद्ध माणसांकडे इतर सामान्य वृद्धांनी अपवाद म्हणूनच बघितले पाहिजे. सामान्य वृद्धांनी असाधारण वृद्धांची नकल करण्याचा प्रयत्न करू नये. एकंदरीत काय वृद्धांचे निवृत्त जीवन म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे जीवन!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा