अतिरेकी प्रेम, हिंसा व नेभळट समाज!
दिनांक १९.६.२०२४ च्या लोकसत्ता दैनिकातील या दोन बातम्या म्हणजे अतिरेकी प्रेमाची दोन उदाहरणे. एका उदाहरणात एक तरूण त्याला त्याची प्रेयसी साथ देत नाही म्हणून अतिरेकी प्रेमाच्या रागातून वसईत त्या प्रेयसीची दिवसाढवळ्या भर रस्त्यात हत्या करतोय, तर दुसऱ्या उदाहरणात एक पुरूष पत्नीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने पत्नी विरहाच्या नैराश्येतून डोंबिवलीत आत्महत्या करतोय. प्रेम व हिंसा या दोन्ही गोष्टी दोन्ही उदाहरणात आहेत. फरक एवढाच की पहिल्या उदाहरणात अतिरेकी प्रेमातून माणूस दुसऱ्या व्यक्तीची हिंसक हत्या करतोय तर दुसऱ्या उदाहरणात माणूस अतिरेकी प्रेमातून स्वतःच स्वतःची हिंसक आत्महत्या करतोय. मानवी जीवन एवढे का स्वस्त झालेय?
पहिल्या उदाहरणात तर असहाय्य तरूणीची हत्या होत असताना जमाव नुसती बघ्याची भूमिका घेत त्या भयानक घटनेची मोबाईल मधून व्हिडिओग्राफी करताना दिसतोय. खरंच असल्या जमावाला बघून किळस आली. पोलीस सर्व ठिकाणी पोहचू शकत नाहीत. मग अशावेळी लोक एखाद्या असहाय्य व्यक्तीला हिंमत करून वाचवायला का पुढे येत नाहीत? इतकी का नेभळट झालीय जनता? त्या जमावातून एकाने त्या मारेकऱ्याला अडवण्याची हिंमत केली पण त्याला साथ द्यायला त्या जमावातून कोणी पुढे आले नाही. सगळे मोबाईल वरून चित्रफीत काढण्यात दंग होते. या असल्या नेभळट लोकांमुळेच एखादा माणूस अशा प्रसंगात हिंमतीने पुढे येण्यास कचरतो. त्या मारेकऱ्याच्या हातात बंदूक असती तर घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुढे न येणे हे आपण समजू शकतो पण त्या मारेकऱ्याच्या हातात लोखंडी पाना होता. जमावातील काहीजणांनी जरी हिंमत केली असती तरी तो पाना त्याच्याकडून हिसकावून घेऊन त्या मारेकऱ्याला बदड बदड बदडून पोलिसांच्या ताब्यात देता आले असते. पण तशी हिंमत जमावाने केली नाही व त्या तरूणीचा जीव मात्र सर्वांसमोर गेला.
कोणत्या समाजात आम्ही जगत आहोत? आपण निर्मनुष्य ठिकाणी जाण्याचे टाळतो का तर माणसांच्या गर्दीत आपले एखाद्या संकटापासून संरक्षण होईल म्हणून. आता या भ्रमात राहण्यात काही अर्थ नाही. नेभळटांच्या गर्दीत स्वतःला सुरक्षित समजण्याचे काही कारण नाही. समाज माध्यमातून देशप्रेमावर मोठमोठया गप्पा मारणारे लोक अशा प्रसंगात चिडीचूप होतात. शेवटी देशप्रेम म्हणजे तरी काय? आपला देश हे एक कुटुंब आहे हे स्वीकारून या कुटुंबातील कुटुंब सदस्यांचे संरक्षण करणे यालाच तर देशप्रेम म्हणतात ना! कबूल आहे की त्यासाठी पोलीस व लष्कर या दोन कायद्याच्या यंत्रणा आपणच निर्माण केल्या आहेत. सीमेवर देशाचे लष्कर डोळ्यात तेल घालून उभे असते पण देशातंर्गत काय? पोलीस गलोगल्ली तैनात आहेत का? म्हणून तर फौजदारी कायद्यात स्वसंरक्षणाच्या (सेल्फ डिफेन्स) कायद्याची तरतूद आहे ना! पण या तरतूदीचा नेभळट समाजासाठी काही उपयोग नाही. हा समाज सर्व काही पोलिसांवर टाकून मोकळा राहतो.
पत्नी विरहातून पतीने आत्महत्या करणे हे सुद्धा बरोबर नाही असे मला वाटते. आत्महत्या करणाऱ्या पतीचे इतर कुटुंबीय आहेत असे बातमीतून कळते. मग आपल्या मुलाबाळांसाठी का जगू नये व मुले नसतील तर स्वतःसाठी का जगू नये? जीवनसाथी मध्येच अचानक गेल्यावर मागे एकट्याने जगणे हे खूप कठीण असते हे मान्य पण त्यावर आत्महत्या हा उपाय नव्हे.
वरील दोन्ही उदाहरणातून मानवी मन किती रागीट व किती कोमल असू शकते हे कळते. पण अतिरेक हा कधीही वाईटच मग तो सत्ता, संपत्तीचा असो की प्रेमाचा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा