https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

आध्यात्मिक मार्गावर केव्हा, का, कुठे?

आध्यात्मिक मार्गावर केव्हा, का, कुठे?

मानवी ज्ञानेंद्रियांना सहज कळणारे निसर्गाचे वैज्ञानिक वास्तव भौतिक आहे व म्हणून ते जड आहे. म्हणून विज्ञानाला भौतिक विज्ञान म्हणणे योग्य होईल. पदार्थ विज्ञान, रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र, जीव शास्त्र इतकेच काय मानव समाज शास्त्र या  सर्व भौतिक विज्ञानाच्याच शाखा आहेत. या भौतिक विज्ञानाच्या कुशल वापराला तंत्रज्ञान म्हणतात. म्हणून विशाल अर्थाने मानव समाज शास्त्रीय सामाजिक कायदा हा सुद्धा तंत्रज्ञानाचाच भाग होय असे माझे वैयक्तिक मत आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाला मानवी स्पर्श देणारे समाजमान्य नैतिक तत्वज्ञान हा सुद्धा मानव समाज शास्त्रीय कायद्याचा भाग आहे हेही माझे वैयक्तिक मत आहे. पण मानव स्पर्शी असे नैतिक तत्वज्ञान जर समाजमान्य नसेल तर ते माणसाच्या वैयक्तिक पातळीवरच राहते. मानव स्पर्शी तत्वज्ञान हे मानवी जीवनाला तात्त्विक बैठक व तात्विक दिशा देत मानवी जीवन अर्थपूर्ण करण्याचे काम करते. तत्वज्ञानाने मानवी मनाला काही काळ स्थिरता व शांती लाभत असली तरी ती चिरकाल टिकेल याची शास्वती नसते इतका जड भौतिकतेचा मनावरील प्रभाव शक्तीशाली असतो.

निसर्गाची जड भौतिकता नश्वर देह मृत्यूने नष्ट होईपर्यंत मानवी मनाला घट्ट चिकटलेली असते. हा चिकटा निघता निघत नाही. तो अशाप्रकारे शरीर, मनाला घट्ट चिकटलेला असल्याने पटकन जाणवतो, कळतो व म्हणून तोच वास्तव, मूर्त वाटतो. निसर्गाची भौतिकता गोल चक्रात फिरणारी व परिवर्तनशील आहे. म्हणजे ती पूर्णतः नश्वर नाही. ती एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत परिवर्तित (ट्रान्सफाॕर्म) होते. उदा. मनुष्य मृत्यू पावला की त्याचे सजीव अवस्थेतून निर्जीव अवस्थेत रूपांतर (परिवर्तन) होते. मनुष्याचा सजीव देह अशाप्रकारे नश्वर आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाचा मृत्यू अटळ आहे व माणूस या भौतिक निसर्ग नियमाला अपवाद नाही. मग माणूस हळूहळू विचार करतो की या परिवर्तनशील नश्वर भौतिकतेला, नश्वर भौतिक देहाला किती चिकटून रहायचे. भौतिक देह व या देहाला चिकटलेल्या भौतिक मनाच्या सहाय्याने मिळवलेली भौतिक संपत्ती, नातीगोती सगळे या भौतिक निसर्गातच सोडून जायचे आहे. मग निसर्गाच्या या भौतिक वैज्ञानिक वास्तवाचा विचार करून मनुष्य निसर्गातील मूळ ईश्वर तत्वाचा व सत्वाचा शोध घेण्यास सुरूवात करतो. त्यासाठी निसर्गाच्या मूर्त (काॕन्क्रिट) जड भौतिक वास्तवाच्या आत खोलवर हलके फुलके असे (भौतिक जडत्व नसलेले) ईश्वरी मूलतत्व व सत्व याच जड भौतिक निसर्गात आहे जे अमूर्त म्हणजे अनाकलनीय आहे याची जाणीव मानवी मनाला व्हावी लागते. तशी जाणीव झाली की माणूस त्या मूळ ईश्वरी तत्वाशी व सत्वाशी एकरूप होण्याचा व त्यातून जड भौतिक मनाला आध्यात्मिक आनंद शांती व स्थिरता देण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात तो आध्यात्मिक मार्गावर येतो. या आध्यात्मिक जाणिवेतून त्याच्या मनात भौतिक कर्मे करताना सुद्धा परमेश्वराचा आधार वाटतो.

विज्ञानातले व कायद्यातले सगळंच सगळ्यांना जसं कळत नाही तसं अध्यात्मातले सगळंच सगळ्यांना कळत नाही. आध्यात्मिक बाबतीत माझ्यासारख्या ज्या लोकांना पूर्ण अध्यात्म समजत नाही व ते समजत नसल्याने ज्यांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करता येत नाही अशा वरवर अध्यात्म करणाऱ्या माझ्यासारख्या  सामान्य लोकांसाठी "श्रमिक हो घ्या इथे विश्रांती" म्हणजे काही काळ का असेना पण जड भौतिक मनाला हलक्या फुलक्या आध्यात्मिक अवस्थेत आणून त्या मनाला भौतिक जडत्वापासून मुक्ती द्यायचे ठिकाण म्हणजे ईश्वराचे ध्यान व प्रार्थनास्थळ हाच आध्यात्मिक थांबा असतो व तेवढाच त्या थांब्याचा आध्यात्मिक उद्देश असतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा