https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

विज्ञानाला जोड धर्म व कायद्याची!

विज्ञानाला जोड धर्म व कायद्याची!

निसर्गधर्माचे वैज्ञानिक निसर्गनियम निसर्गातील सर्व सजीव, निर्जीव पदार्थांना (ज्यात उच्च जैविक व पर्यावरणीय पातळीवरील प्रचंड मोठी बुद्धिमत्ता असलेली माणसेही आली) समसमान लागू नाहीत तर विविध पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांनुसार वेगवेगळ्या नियमांनी लागू आहेत. त्यामुळे माणसाला लागू असलेला वैज्ञानिक निसर्गधर्म कोणता म्हणजे माणसाचे नैसर्गिक वर्तन काय व कसे या प्रश्नापासून मानवी बुद्धीच्या वैचारिक समजेचा आंतर्बाह्य संघर्ष सुरू होतो. याच वैचारिक संघर्षातून निसर्गात देव म्हणजे परमेश्वर आहे की नाही हा विचार पुढे आला. प्राचीन काळी मानवी बुद्धीची वैज्ञानिक समज आताइतकी प्रगल्भ नसल्याने देवाचे अस्तित्व मान्य करून त्या देवाची मनधरणी करणारा आध्यात्मिक धर्म निर्माण झाला. पृथ्वीवरील अनेक प्रदेशांत असे अनेक धर्म निर्माण झाला. यावर वैज्ञानिक चिंतन करून देवाचे अस्तित्व नाकारणारा गौतम बुद्धांचा नास्तिक धम्म (धर्म नव्हे) नंतर निर्माण झाला. आंतरमानवी वैचारिक संघर्षातून आता आस्तिक धर्म विरूद्ध नास्तिक धम्म असे वाद समाजात सुरू आहेत. या वादात निसर्ग पडत नाही की मानलेला देव पडत नाही. कारण हा मानवाच्या वैचारिक संघर्षातून निर्माण झालेला वाद आहे.

पूर्वी जगातील मानवी जीवनशैली धर्माला बांधली होती. पण धर्माने जगात हाहाकार माजवला तेंव्हा मानव समाजाला धर्माऐवजी निसर्ग  विज्ञाननिष्ठ कायद्याची व त्यावर आधारित शासनव्यवस्थेची गरज निर्माण झाली. पण अजूनही कायदा आधारित शासन व्यवस्थेला धर्माच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. म्हणजे पुन्हा ये रे माझ्या मागल्या!

प्रथमतः ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निसर्गाचे विज्ञान व त्याचा प्रत्यक्ष उपयोग करणारे तंत्रज्ञान हीच जगातील मूलभूत गोष्ट आहे. धर्म (किंवा धम्म) व कायदा या दोन्ही गोष्टी मूलभूत विज्ञानाला पूरक गोष्टी आहेत. या पूरक गोष्टी माणसाच्या भावना व बौद्धिक तर्क यावर मुख्यतः आधारित असल्याने  त्या शंभर टक्के वैज्ञानिक असू शकत नाहीत कारण यातील काही गोष्टी केवळ मानवी भावना व तर्क यावर आधारित आहेत. त्यांना वैज्ञानिक पुराव्याचा ठोस आधार नाही. तसे असते तर धर्मावरून वाद निर्माण झाले नसते व कायद्याचा योग्य अर्थ लावण्यासाठी कनिष्ठ न्यायालये ते उच्च न्यायालये ते सर्वोच्च न्यायालय अशी न्यायालयीन उतरंड समाजाला निर्माण करावी लागली नसती.

भावनिक-तार्किक तत्वज्ञान जेंव्हा मूलभूत विज्ञानाला वरचढ होते तेंव्हा मूलभूत विज्ञानाची वाट लागते. मग आभासी कल्पनांची तर गोष्टच नको. भावनिक-तार्किक तत्त्वज्ञान असो की आभासी कल्पना असोत, या गोष्टी मनात घोळत राहिल्याने समोरच्या नैसर्गिक वास्तवावरून वैज्ञानिक दृष्टी (मूळ लक्ष) हटली की अपघात, दुर्घटना होण्याचा धोका असतो.

निसर्गाचे वैज्ञानिक नियम हेच जगाचे मूलभूत सत्य आहे जे धर्म (किंवा धम्म) व कायदा यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, नव्हे ते जगात सर्वश्रेष्ठ आहे. विज्ञानाला पूरक असलेल्या धर्म व कायदाया गोष्टींपासून मानवी जीवनशैली (संस्कृती) आकार घेते. पण या पूरक गोष्टी विज्ञानापासून वेगळ्या केल्या की त्या डोईजड होतात व मानवी जीवन अवघड करून टाकतात. त्यांचे अती लाड अंगाशी येतात. कायदा भ्रष्टाचारी होऊ शकतो व संस्कृती सोयीनुसार बदलते हे सत्य लक्षात ठेवले तरी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा