मनाला छळ छळ छळणाऱ्या उपद्रवी गोष्टी!
जग विविधतेने भरलेले आहे पण त्यातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या प्रत्येक विविधतेशी प्रत्येकाची मैत्री होऊ शकत नाही. त्यातील बऱ्याच गोष्टी दुरून डोंगर साजरे प्रकारातील असतात. निरनिराळे खेळ प्रकार, निरनिराळ्या कलाकृती, राजकारण इतकेच काय कसले ते देवधर्मी अध्यात्म या माझ्यासाठी तरी अशाच दुरून डोंगर साजरे प्रकारातील गोष्टी आहेत. त्यामुळे कदाचित लोक मला निरस, अरसिक म्हणतील पण मला त्याची पर्वा नाही. कारण इतरांसाठी फायद्याच्या असणाऱ्या या गोष्टी त्यांचा खुळा नाद केल्याने मला मात्र उपद्रवी, छळवादी होतात.
जोपर्यंत इतरांची क्रियाशीलता तुमच्या क्रियाशीलतेशी मैत्री संबंध जुळवत नाही तोपर्यंत इतरांची क्रियाशीलता तुमच्यासाठी कायम परकी राहणार. परक्या माणसांना मायाप्रेमाने तुम्ही जवळ करण्याचा प्रयत्न केला तर तुमची फजिती होणार त्यापेक्षा ती गोष्ट टाळलेली बरी.
मूलभूत, आवश्यक गोष्टी कोणत्या व त्यांना पूरक गोष्टी कोणत्या म्हणजे गरजा कोणत्या व चैनी कोणत्या याची यादी प्रत्येकाने करायला हवी. मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून पूरक गोष्टींकडेच जास्त लक्ष दिले तर मनाला पूरक गोष्टींचाच खुळा नाद लागतो. अशा पूरक गोष्टींचीच मनाला सवय लागते, मनाला त्यांचे वेड, व्यसन लागते. त्यामुळे चैनच मनाची गरज बनते. उद्योगधंद्याचे जाहिरात तंत्र (मार्केटिंग) मानवी मनाच्या या वेडावर, व्यसनावर चालते. मनाला चिकटलेली अशी चैन पुढे मनाचा छळ सुरू करते. दारू सिगारेटचे, जुगाराचे व्यसन हे याच छळवादी प्रकारातले. पण याच छळवादी मानसिक वेडावर काही चालू माणसे गडगंज श्रीमंत होतात व व्यसनाधीन माणसे भिकेला लागतात.
स्वतःच्या मनाला उगाच चिकटून घेतलेल्या अशा पूरक चैनीच्या, व्यसनी गोष्टी कोणत्या याची यादी बनवा व त्यांना अती किंमत न देता होता होईल तेवढ्या त्या दूर ठेवा. त्यांची छळवादी सवय जबरदस्तीने मोडून काढता आली नाही तरी ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. या उपद्रवी गोष्टींची किंमत हळूहळू शून्यावर आणा. स्वतःपुढे काय वाढून ठेवलेय हे न बघता जगाचा निष्फळ विचार करणे सोडून द्या. आभासात, कल्पनाविश्वात जगणे सोडून देऊन वास्तवात जगायला शिका. स्वतःच स्वतःचा मानसिक छळ करू नका!
-©ॲड.बी.एस.मोरे, २९.१२.२०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा