https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

माणसांवर राज्य कुणाचे?

माणसांवर राज्य कुणाचे?

माणसाचा जन्म झाला रे झाला की त्याच्या जैविक गरजांचे रडगाणे सुरू होते. जन्मल्याबरोबर आईच्या दुधासाठी बाळाचे रडणे हा हळूहळू वाढत जाणाऱ्या या रडगाण्याचा पहिला भाग. बाळाचे स्तनपान करून दूध पाजणारी बाळाची आई हे जैविक गरजा भागविण्यासाठी बाळाला मिळालेले पहिले साधन.

जैविक गरजा एकीकडे व त्या गरजा भागविण्यासाठी निसर्ग व समाजात असलेली साधने दुसरीकडे अशी परिस्थिती असते. अर्थात एकीकडे  भूक तर दुसरीकडे भूक भागविणारे अन्न यांच्या कचाट्यात माणूस सापडतो. साधनप्राप्ती सहज शक्य होत नाही. त्यासाठी स्पर्धात्मक कष्ट करावे लागतात. अर्थात जैविक गरजा व जैविक साधने यांच्यामध्ये कष्ट असते. जैविक गरजा व जैविक साधने यांच्यात नैसर्गिक आकर्षण निर्माण करून गरजा व साधनांना एकत्र आणायचे काम निसर्गाचा कायदा करतो तर जैविक साधनांच्या  स्पर्धात्मक कष्टाला सामाजिक शिस्त व वळण लावण्याचे काम सामाजिक कायदा करतो.

परमेश्वराची नुसती आध्यात्मिक भक्ती करीत राहिल्याने जैविक भूक नष्ट होत नाही व भुकेचे समाधान करणारी जैविक साधने हातात येत नाहीत. त्यासाठी स्पर्धात्मक कष्ट  करावेच लागते. देवधर्म केल्याने अशा कष्टाला बळ मिळते का व  असे कष्ट सुसह्य होते का हा वादाचा मुद्दा आहे. देवधर्माने कदाचित अशा कष्टाला एक काल्पनिक मानसिक आधार मिळत असेल. पण तो किती हे देवधर्म करणाऱ्या लोकांना माहित असेल. पण सामाजिक कायद्याने स्पर्धात्मक कष्टाला एक सामाजिक शिस्त व वळण लागते हे मात्र खरे आहे.

माणसांवर राज्य कुणाचे या प्रश्नाचे उत्तर काय तर जैविक गरजा व जैविक साधने निर्माण करून त्यांना जोडणाऱ्या नैसर्गिक कायद्याचे व त्यामागे असलेल्या निसर्गाचे एक राज्य आणि साधनांसाठी कराव्या लागणाऱ्या स्पर्धात्मक कष्टाला शिस्त व वळण लावणाऱ्या सामाजिक कायद्याचे व त्यामागे असलेल्या समाजाचे दुसरे राज्य. म्हणजे माणसांसाठी दोन राज्ये आहेत व ती म्हणजे एक निसर्गाचे राज्य व दुसरे समाजाचे राज्य. यात परमेश्वराचा भाग किती हे त्या परमेश्वरालाच माहित!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा