जातीनिहाय आरक्षण व ज्ञातीनिहाय संरक्षण!
जात हा ज्ञात शब्दाचा अपभ्रंश असावा. पिढ्यानपिढ्या ठराविक समाज वर्गाकडे निसर्ग विज्ञानाचे विशिष्ट ज्ञान व त्यातील कौशल्य (विशिष्ट विज्ञान-तंत्रज्ञान) संचयित झाल्याने विशिष्ट ज्ञान कौशल्यावर आधारित व्यवसाय, उद्योगधंदा करणाऱ्या लोकसमूहाचा विशिष्ट समाज वर्ग निर्माण झाला असावा व त्या वर्गाची विशिष्ट जात निर्माण झाली असावी. अशाप्रकारची जात ही ज्ञानाधारित असल्याने तिला जात म्हणण्याऐवजी ज्ञात म्हटले तर समाजातील विविध जाती या ज्ञाती म्हणून दिसू लागतील.
विज्ञानाला धर्माचा रंग देऊन किंवा विज्ञानावर धर्माचा मुलामा चढवून एखाद्या समाज वर्गाने विज्ञानाचा गाभा पिढ्यानपिढ्या स्वतःच्या ताब्यात ठेवून बहुजन समाजाला ज्ञानापासून खरंच पिढ्यानपिढ्या वंचित ठेवले का अर्थात ज्ञानाला सामाजिक दृष्ट्या संकुचित करून ठेवले का हा जातीचा (माझ्या मते ज्ञातीचा) इतिहास अभ्यासण्याचा विषय आहे. यावर डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल संशोधन करून शूद्र पूर्वी कोण होते यावर संशोधनात्मक कारणमीमांसा करीत निष्कर्ष काढला आहे. परंतु ज्याला हे संशोधनात्मक आंबेडकरी साहित्य वाचण्याचा आळस, कंटाळा असेल त्याने स्वतःचा काॕमन सेन्स (सामान्य जाणीव) वापरला तरी समाजातील जातसंघर्षाची कारणे कळतील.
डाॕक्टरांच्या मुलाबाळांनी वैद्यकीय ज्ञान स्वतःकडे एकवटून ठेवून तोच वैद्यकीय व्यवसाय पिढ्यानपिढ्या करायचे ठरवले तर डाॕक्टरांचीही ज्ञानाधारित डॉक्टर जात (ज्ञात) बनेल. वकिलांच्या मुलाबाळांनीही पिढ्यानपिढ्या तेच केले तर वकील वर्गाचीही जात (ज्ञात) बनेल. हेच काय पण पोलीस, लष्कर, उद्योजक व व्यापारी, अर्थकारणी यांच्याही ज्ञानाधारित जाती (ज्ञाती) बनतील. प्रश्न आहे तो सफाई कामगारांचे काय करायचे? त्यांच्या मुलांनीही पिढ्यानपिढ्या सफाई कामगार बनूनच जगायचे का? म्हणजे ज्ञान वंचित राहिल्याने पिढ्यानपिढ्या खालच्या दर्जाची कनिष्ठ कामेच करीत रहायचे का? जन्माने अशी जात (वंचित ज्ञानाधारित वंचित ज्ञात असे वाचावे) त्यांच्यावर उच्च ज्ञान वर्गीय समाजाने लादल्यामुळेच समाजात शूद्र हा समाज वर्ग निर्माण झाला व त्या वर्गातून अनेक शूद्र जाती निर्माण झाल्या हे महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संशोधन वाचल्यास कळेल. जन्माने अशी शूद्र जात विशिष्ट कनिष्ठ वर्गावर उच्च वर्गीय समाजाने लादल्याने शूद्रांचा ज्ञान, अर्थ व राज (सत्ता) विकास होऊ शकला नाही म्हणून भारतीय राज्य घटनेत अशा कनिष्ठ (शूद्र) जातींच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक विकासासाठी जातनिहाय आरक्षण कायद्याने निर्माण करावे लागले, ही मूलभूत गोष्ट लक्षात घ्यायला हवी.
समाजाने जर अशी विशिष्ट जात विशिष्ट समाज वर्गावर जन्माने लादली तर अशी गोष्ट मनुष्याच्या नैसर्गिक स्वातंत्र्य, विकासाच्या आड येते. डॉक्टरच्या मुलाला इंजिनियर होऊ वाटले तर त्याला इंजिनियर होऊ दिले पाहिजे. वकिलाच्या मुलीला जर आंतरराष्ट्रीय कंपनीची व्यवस्थापिका होऊ वाटले तर तिला तशी व्यवस्थापिका होऊ दिले पाहिजे. माझ्या मुलीला मी तेच निवडीचे स्वातंत्र्य दिले व वकील होण्याऐवजी ती आंतरराष्ट्रीय कंपनी व्यवस्थापिका झाली. म्हणजे माझी वकिली माझ्याबरोबरच संपणार. माझे वडील गिरणी कामगार पुढारी होते पण मी कामगारच झालो नाही. कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन वकील झालो तर मग पुढे कामगार पुढारी होण्याचा प्रश्नच उरला नाही. जन्माने माझ्या वडिलांची, माझी व माझ्या मुलीची जात एकच व ती म्हणजे मराठा. पण ज्ञानकर्माने आमच्या एकाच मराठा कुटुंबात तीन जाती (ज्ञाती) निर्माण झाल्या त्या म्हणजे अनुक्रमे कामगार पुढारी, वकील व व्यवस्थापन. आमच्या या तीन जाती आमच्या वैयक्तिक ज्ञानकर्मावर आधारित आहेत. आमचे नातेवाईक केवळ मराठा समाजाचे आहेत या एकाच निकषावर आमचे आमच्या नातेवाईकांशी बौद्धिक, वैचारिक पातळीवर जमेलच असे नाही. तिथे वैचारिक आंतरविरोध व जातसंघर्ष असू शकतो व त्याला मुख्य कारण म्हणजे ज्ञानकर्मावर आधारित निर्माण झालेल्या आपआपल्या कुटुंबातील आमच्या अंतर्गत जाती (ज्ञाती) या वेगवेगळ्या आहेत. त्यात समानता नाही. एवढेच काय एकाच आईबापाच्या पोटी जन्मलेली मुले एकाच जैविक रक्ताची असली तरी ती बौद्धिक, वैचारिक दृष्ट्या पुढे एकसारखी राहतील याची शास्वती देता येत नाही. कारण बौद्धिक कष्ट व कर्म वेगळे असते. हाताची पाच बोटे सारखी नसतात त्यातलाच हा भाग. असे म्हणतात की वेगवेगळी असलेली हाताची ही पाच बोटे एक झाली तर एकजूटीची मूठ बनते व जेवण करणे सोपे जाते. पण एकाच आईबापाच्या पोटी जन्मलेल्या मुलांच्या हातांची नुसती बोटेच वेगळी नसतात तर त्यांच्या मुठीही वेगळ्या असतात ही गोष्ट विसरता कामा नये. एकाच कुटुंबातील अशी सगळीच मुले उच्च शिक्षित झाली तरी अशा उच्च विद्याविभूषित भावाबहिणींमध्ये सुद्धा वैचारिक संघर्ष असू शकतो कारण त्यांच्या वैचारिक जाती (ज्ञाती) वेगवेगळ्या असू शकतात. एकाच धर्मात अनेक पंथ व एकाच जातीत अनेक पोट जाती असतात व त्यांच्यात आंतर विरोध असतो त्यातलाच हा प्रकार. माझ्या मते, शिक्षण, व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यात कौटुंबिक व सामाजिक अडवणूक केल्यानेच आंतरविरोध व जातसंघर्ष निर्माण होतो.
माझ्या या लेखाचा थोडक्यात अर्थ एवढाच आहे की प्रत्येकाची जात (ज्ञात) ही जन्माने नव्हे तर प्रत्येक मनुष्याच्या ज्ञानकर्माने ठरते. हे तत्व समाजमान्य व्हायला हवे तरच जन्माधारित जातीपातींचा अंत होऊन जातसंघर्ष नष्ट होईल व मग आरक्षण या विषयावर कायमचा समाजमान्य तोडगा निघेल. सद्या तरी समाजात जातीनिहाय आरक्षण व ज्ञातीनिहाय संरक्षण हे दोन्ही मुद्दे हे वास्तविक मुद्दे आहेत.
-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा