https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

वकिलीतून निवृत्त झालो हो!

वकिलीतून निवृत्त झालो हो!

काही माणसे गर्विष्ठ, वर्चस्ववादी असतात तशीच काही राष्ट्रेही. शीत युद्धात सोव्हिएट रशिया अमेरिकाला भारी पडू लागली म्हणून अमेरिकेने रशियाविरूद्ध चीनला वापरून घेतले. अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री किसिंजर हे जितके बुद्धिमान तितके कुटील व निर्दयीही. आणि मग चीनने अमेरिकन मैत्रीचा फायदा उठवून पूर्वीच्या बलवान रशियाची जागा घेतली तेंव्हा मात्र वर्चस्ववादी अमेरिकेला चांगलेच झोंबले व तिला आता भारताला जवळ करावे असे वाटू लागले. भारताला चीनविरूद्ध वापरून घेण्याची अमेरिकेची ही कुटील चाल तर नव्हे ना? अहो, मी शेवटी वकील आहे ना म्हणून ही रास्त शंका. भारताने अशा कुटील कारस्थानी अमेरिकेपासून सावध रहायला हवे. मानवी स्वभाव  मुळातच हा असा महास्वार्थी, कुटील व कारस्थानी आहे. त्या स्वभावाला परमेश्वराचे अध्यात्म व धर्म विरूद्ध अधर्म यातील संघर्षाचे तत्वज्ञान सांगणारे धर्मग्रंथ काय ताळ्यावर आणणार? यावर उपाय म्हणून लकडीशिवाय मकडी वळत नाही या न्यायाने अधर्माला (अन्यायी वर्तन) शिक्षेची भीती दाखवणारा कायदा बुद्धिमान माणसांनी बनवला आणि त्यासाठी कायद्याचे राज्य प्रस्थापित केले. पण हे कायद्याचे राज्य शेवटी चालवतेय कोण तर महास्वार्थी, कुटील, कारस्थानी राजकीय मंडळी. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी न्याययंत्रणा निर्माण केली गेली तरी ती या कुटील, कारस्थानी राजकीय मंडळी बरोबर किती संघर्ष करीत राहणार? तिलाही तिच्या मर्यादा आहेतच ना! या असल्या कुटील कारस्थानी जगात माझ्यासारख्या सरळमार्गी, प्रामाणिक वकिलाची काय डाळ शिजणार?अमेरिका कशी इतर राष्ट्रांना वापरून घेते तसेच मला म्हणजे माझ्या स्वकष्टार्जित ज्ञानाला श्रीमंतांनी चांगलेच वापरून घेतले. माझी वकिली कसली तर कमी फी मध्ये स्वतःचे शोषण करून घेत श्रीमंतांना कायद्याच्या ज्ञानाची मदत करून श्रीमंतांना आणखी श्रीमंत करण्याची वकिली. मी गरीब कुटुंबात जन्माला आलेला एक गरीब वकील. मी गरिबांची कसली वकिली करणार? माझीच खायची पंचाईत आणि गरिबांकडून फी ची अपेक्षा करून माझी वकिली किती आणि कशी चालणार? मग वापरू दिले श्रीमंतांना काही दिवस माझ्या त्या मौल्यवान ज्ञानाला. आता मात्र या चालू लोकांचा उबग आला. म्हणून काय केले तर दिली वकिली सोडून म्हणजे वकिलीतून निवृत्त झालो हो!

-©ॲड.बी.एस.मोरे, ३.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा