https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

लग्नाला चला बघा लग्नाला चला!

लग्नाला चला बघा लग्नाला चला!

एखाद्या गडगज श्रीमंत असलेल्या उद्योगपतीच्या किंवा पाॕवरबाज राजकीय नेत्याच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न एखाद्या पंचतारांकित हॉटेलात किंवा एखाद्या मैदानात तयार केलेल्या राजमहालात असले की सार्वजनिक सभांमधून किंवा टी.व्ही. सारख्या माध्यमांतून एकमेकांवर जबरी टीकेचे आसूड ओढणारी राजकीय मंडळी, मंत्री, संत्री त्यांच्या खास रूबाबात अशा ठिकाणी जमा होतात तेंव्हा या मंडळींचे एकमेकांना आलिंगन देणे, खळखळून हसत एकमेकांशी हातात हात घालून गोड बोलणे, हळूच कानात हसत हसत काहीतरी बोलणे वगैरे गोष्टी खरंच बघण्यासारख्या असतात. सामान्य माणसांना या असल्या राजेशाही थाटाच्या लग्न सोहळ्यासाठी ना कसले निमंत्रण असते ना आत प्रवेश असतो. काही माध्यमांतून अशा सोहळ्याचे दर्शन सामान्यांना घडते आणि त्यांचे डोळे दिपून जातात. डोळे दिपणे म्हणजे थक्क होणे. पण एकमेकांशी तावातावाने भांडणारी ही मंडळी अशा कार्यक्रमात एवढी दिलखुलास कशी होऊ शकतात याचे मात्र फार आश्चर्य वाटते. धर्म, जातपात काय किंवा इतर मुद्दे काय, लोकांच्या मेंदूचा किती भुगा करतात ही मंडळी आणि पुन्हा अशा सोहळ्यात एकत्र येऊन हसतात काय, खिदळतात काय! समाजातील सर्वसामान्य माणसांना वाकुल्या दाखवण्याचाच हा प्रकार नव्हे काय?

पण मी या राजकीय मंडळींना असे नावे ठेवले तर हीच मंडळी वकील म्हणून मला म्हणतील की "तुम्ही वकील मंडळी नाही का तुमच्या अशिलांच्या वतीने न्यायालयात तावातावाने युक्तिवाद करता व पुन्हा कोर्टाच्या कँटिनमध्ये एकमेकांशी हसत खेळत गप्पा मारीत बसता किंवा वकिलांच्या खास मेळाव्यात न्यायाधीश मंडळींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून छान हितगुज करता, अगदी तसेच आमचे आहे". शेवटी ही राजकीय मंडळी आहेत. वेळ आली तर वकिलांचे सुद्धा तोंड बंद करतील मग सामान्य लोकांची तर गोष्टच विसरा. प्रश्न हा आहे की सर्वसामान्य लोकांनी यांचे हे असले विरोधाभासी वागणे निमूटपणे बघून ते सहजपणे घ्यायचे काय आणि ते किती घ्यायचे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा