https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३

आत्ममित्र (सोलमेट)!

आत्ममित्र (सोलमेट)!

माणसाला आयुष्यात निदान एक तरी आत्ममित्र (सोलमेट) असावा आणि तो माणूस असावा, कुत्रा वगैरे प्राणी नव्हे. मित्र या शब्दात मैत्रीण आली. अशी व्यक्ती सोलमेट तेंव्हाच होते जेंव्हा तिचे तुमच्याशी वैचारिक सूर जुळतात. जर बुद्धीचे सूर जुळले नाहीत तर भावनेशी कसे जुळतील?  वैचारिक जवळीक हा भावनिक जवळीकीचा पाया आहे.

बाहेरच्या व्यावहारिक जगात वापरा आणि फेका हा हिशोब असतो. तिथे बुद्धीचेच जास्त काम असते. तिथे सोलमेट मिळणे हा प्रकार फारच दुर्मिळ असतो. राजकीय नेत्यांचे असंख्य अनुयायी असतात पण ते कामापुरते असतात. हे अनुयायी राजकीय नेत्यांचे खरंच सोलमेट असतात का? तसे असते तर या  नेत्यांनी व त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी इकडून तिकडे पक्षांतरी कोलांट उड्या मारल्याच नसत्या. असतील शिते जर जमतील भुते!

सोलमेट हा शब्द खाजगी आयुष्यात वैयक्तिक असतो. आता प्रश्न हा की नवरा बायकोच्या संसारी नात्यात ते दोघे एकमेकांचे सोलमेटस असतात का? बरं ते जाऊद्या, दोघांनी ज्या मुलांना जन्माला घातले ती मुले तरी त्यांच्या आईवडिलांची सोलमेटस असतात का? जर सर्वांची वैचारिक पातळीच सामान्य व समान असली तर मग हा सोलमेटचा प्रश्नच तिथे निर्माण होत नाही. असे खरंच असते का? तसे असते तर कुटुंबात कधी भांडणतंटाच झाला नसता. संसारात समंजस तडजोड हा वेगळा भाग आहे. तडजोडीत सोलमेट हा प्रकार नसतो.

आता पुढे प्रश्न येतो तो देवधर्माचा? अध्यात्म या शब्दात आत्मा व परमात्मा हे दोन्ही शब्द समाविष्ट आहेत. अर्थात स्वतःच्या आत्म्याशी स्वतःचीच मैत्री व मग परमात्म्याशी मैत्री हा आत्ममित्र (सोलमेट) प्रकार अध्यात्मात असतो. स्वतःच्या आत्म्याशी मैत्री होऊ शकते म्हणजे माणूस स्वतःच स्वतःचा आत्ममित्र (सोलमेट) होऊ शकतो. पण मग परम्यात्म्याच्या मैत्रीचे काय? जगात परमेश्वराविषयी अनेक चमत्कार मिश्रित गोष्टी सांगणारे अनेक धर्म आहेत व अनेक प्रेषित, देवावतार, देवदेवता व साधुसंतही आहेत. त्यातला नेमका आपला आत्ममित्र (सोलमेट) कोणता आणि ज्या परमेश्वराशी कधी प्रत्यक्ष संपर्क साधताच येत नाही (खरं तर या आध्यात्मिक बाबतीत आपलेच मन आपल्याशी बोलत असते) तो आपला आत्ममित्र (सोलमेट) होऊ शकतो का? की इतर लोक करतात म्हणून मनाला वरवरचे मानसिक समाधान म्हणून आपणही तेच करायचे?

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा