https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

ओसीडी बाबा की जय!

ओसीडी बाबा की जय!

माझ्या जीवन चक्रातील त्याच त्या जीवन बिंदूंवर मी पुन्हा पुन्हा गोल फिरत येतोय व त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतोय म्हणून मी स्वतःचे उप नामकरण ओसीडी बाबा असे केले आहे. ओसीडी चा इंग्रजी विस्तार आॕब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसआॕर्डर असा आहे व याला मराठीत मंत्रचळ असे म्हणतात. हा एक मानसिक आजार आहे असे वैद्यकीय शास्त्र म्हणते. तसे असेल तर हा आजार हे माझे वास्तव आहे.

थोडक्यात मंत्रचळी जीवनचक्र हे माझे वास्तव आहे व या वास्तवात मी जगतो. आभासी चलनवलनात व भ्रामक कल्पनांत जगण्यापेक्षा मला वास्तविक होऊन वास्तवात जगणे पसंत आहे. आता माझ्या या चक्री वास्तवापेक्षा लोकांचे वास्तव जर वेगळे असेल तर त्यांचे माझे न जुळल्याने ते माझी चेष्टा करीत राहून मला त्यांच्यापासून लांब ठेवणार हे आलेच. हेही माझे एक वास्तव आहे व लहानपणापासूनच मी जगापासून थोडा हटके वागत असल्याने या वास्तवाचा अनुभव लहानपणापासून मी घेत आलो आहे. या वास्तवाचा स्वीकार मी केला आहे.

म्हणून माझी थोडक्यात ओळख लोकांना करून देण्यासाठी मी माझे उपनामकरण ओसीडी बाबा असे केले आहे जेणेकरून लोक त्यांना माझा ओसीडी आजार लागू नये म्हणून मला आणखी लांब ठेवतील. ओसीडी बाबा हे उपनामकरण आध्यात्मिक नसून वास्तविक आहे कारण मंत्रचळी जीवनचक्र हे माझे वास्तव आहे. लोक माझ्यापासून लांब राहिल्याने ओसीडी बाबा म्हणून ते माझा जयजयकार करणार नाहीत. मग त्यांनी मी स्वतःच माझा तसा जयजयकार करण्यापासून मला रोखू नये ही त्यांच्याकडून माझी किमान, माफक अपेक्षा आहे. ओसीडी बाबा की जय!

-©ॲड.बी.एस.मोरे उर्फ ओसीडी बाबा, ८.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा